Tuesday, 21 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.04.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  देशात ६१ जिल्ह्यांमध्ये चौदा दिवसांपासून एकही नवीन रुग्ण नाही; लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्याचा समावेश
Ø  कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची माहिती देण्यासाठी सरकारची दोन संकेतस्थळं
Ø  औरंगाबाद इथे तीन नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण; जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३५
आणि
Ø  लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मराठवाड्यात स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपायांची अंमलबजावणी
****

 देशातल्या ६१ जिल्ह्यांमध्ये गेल्या चौदा दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आज दुपारी संपलेल्या २४ तासांत देशभरात एक हजार ३३६ रुग्ण आढळले असून, देशभरातल्या रुग्णांची संख्या आता १४ हजार ७५९ झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात ७०५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले, आतापर्यंत देशभरात तीन हजार २५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण १७ पूर्णांक ४८ शतांश टक्के एवढं असल्याचं, अग्रवाल यांनी सांगितलं.

 देशभरात मनरेगा तसंच रस्तेबांधणीसह अनेक ठिकाणी विविध प्रकारची कामं सुरू करण्यात आली असून, स्थलांतरित कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून यावेळी देण्यात आली. लॉकडाऊनच्या नियमांचं नागरिकांनी काटेकोर पालन करण्याचं आवाहन गृहमंत्रालयाकडून करण्यात आलं.

 कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची माहिती देण्यासाठी सरकारने दोन संकेतस्थळ तयार केले असून, त्यावर कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी लढणारे सव्वा कोटी कोविड वॉरियर्स तसंच देशभरातल्या २०१ सरकारी रुग्णालयांची माहिती देण्यात आली आहे. आयजीओटी डॉट जीओव्ही डॉट इन, कोविड वॉरियर्स डॉट जीओव्ही डॉट इन  या संकेतस्थळावर याबाबत माहिती घेता येणार आहे.
****

 औरंगाबाद इथे आज कोरोना विषाणू बाधित तीन नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३५ झाली असल्याचं जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं. या रूग्णांसह एकूण १५ कोरोना बाधित रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये आज एकूण ४७ रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी २४ जणांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या ३६ जणांच्या लाळेच्या नमुन्यापैकी ३१ जणांचे नमुने नकारात्मक आले आहेत. तर सात जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचं डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं. देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या २८ जणांचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
****

 जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या २० कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने आज तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात सध्या चार न्युमोनियाग्रस्त आणि एका क्षयरोगग्रस्त रुग्णावर उपचार सुरू असून, या सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे.

 दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आज २७ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात सात ठिकाणी असलेल्या संस्थात्मक विलगीकरणातल्या व्यक्तींची संख्या आता ३०२ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****

 हिंगोली शहरातील नगरपालिका मदत केंद्राच्या वतीने शहरातील अत्यंत गरजू अशा ९४७ कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल साहित्याच्या किटचे वाटप घरपोच करण्यात आलं. नगरपालिका मदत केंद्रात शहरातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी दिलेल्या देणगीतून ही मदत वाटप केल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितलं.
****

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटपास प्रारंभ झाला असून प्रतिलाभार्थी पाच किलो तांदूळ देण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्हयात १ लाख ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे.
****

 लातूरच्या गरजू, मजूर, कष्टकऱ्यांच्या दोन हजार कुटुंबांना नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी स्वखर्चानं धान्य वाटप केलं आहे. ज्या केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांनी किराणा दुकानामार्फत धान्य घेतले आहे, अशा परिवारांनी हे धान्य न स्वीकारता, ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहचवण्यामध्ये मदत करावी, असं आवाहन नगरसेवक अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मराठवाड्यात स्थानिक प्रशासनाच्यावतीनं अनेक उपायांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांही नियमवाली तयार करुन आज बाजार समितीत बाजार भरवायला सुरुवात केली आहे. एका दिवशी फक्त पन्नास वाहने, एकाच वाणाची खरेदी विक्री, आणि एका वाहनात एकच चालक आणि एकाच शेतकऱ्याला बाजार समितीच्या आवारात येण्याची परवानगी या मुद्यांचा या नियमावलीत समावेश आहे. नियम पाळून बाजार समिती सुरु ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीला सहकार्य करण्याच आवाहन बाजार समितीचे सभापती ललित शहा यांनी केलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण, नागरी आणि औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले होते. मात्र हा कालावधी आता ३ मे  पर्यंत वाढण्यात आला आहे. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसंच  भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करण्यात येईल असं पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलं आहे.

 दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाकडून शेती नियोजनासाठी मार्गदर्शक सूचना देखील करण्यात आल्या आहे.
****

 हिंगोली शहरातील संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीनं केवळ चार मुख्य रस्ते आणि १८ उपरस्ते रहदारीसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. बाकी सर्व रस्ते रहदारीसाठी बंद करण्यात आले असून यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नांदापूर शाखेत नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी सामाजिक अंतर पाळलं गेलं नसल्याच दिसून आलं.
****

जालना जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सहा परमीट रुम आणि दोन देशी मद्यविक्री दुकानांचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केले आहेत. शिवाय अवैध मद्यविक्री प्रकरणी ६० गुन्हे नोंदवण्यात आले असून, जिल्हाभरात केलेल्या कारवायांमध्ये १० लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचं या विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितलं आहे.
****

जालना शहरासह तालुक्याच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील दूध, भाजीपाला,   फळे, किराणा, पेट्रोलपंप, घरगुती वापराचा गॅस आणि औषधी दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी परवानगी दिली आहे. या शिवाय अन्य सर्व स्थापना बंद राहणार आहेत.
****

 बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत नवयुवक गणेश मंडळ तसंच नगरसेवक मनोज लखेरा मित्र मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात एकूण ३५ रक्त दात्यांनी रक्तदान केलं.
****

नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये शेतमालाची वाहतूक करण्यासाठी सरकारने  परवानगी दिली आहे. मात्र शेतीतला मालाची काढणी आणि पॅकिंग करणाऱ्या मजुरांना कामावर येण्यास अडचणी येत असल्यानं शेतकऱ्याची आर्थिक कोंडी  होत आहे. या मजुरांना ओळखपत्र देऊन शेतकऱ्यांची आर्थिक हानी टाळावी अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी आज जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे केली आहे.
****

लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयानं देशभरातील स्वायत्त शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये ९२ वा नंबर मिळवला आहे. दिल्लीच्या सेंटर फॉर फोरकास्टींग अँड रिसर्च या संस्थेतर्फे देशभरातील स्वायत्त महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेचे २०२०-२१ साठी मानांकन जाहीर करण्यात आले. असं मानांकन मिळवणारं  मराठवाड्यातलं हे एकमेव महाविद्यालय असून राज्यात या महाविद्यालयाला २९ वा क्रमांक मिळाला आहे.

*****
***

No comments: