Sunday, 26 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या  ग्रामीण भागात अटी शर्तींसह दुकानं सुरु करण्याचा राज्यात अद्याप निर्णय नाही- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं  स्पष्‍टीकरण
Ø कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी
Ø राज्यात ८११ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण; २२ जणांचा मृत्यू
Ø लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी; औरंगाबाद शहरातही पाच नवे रुग्ण; हिंगोलीत आणखी एक पोलिस दलाचा जवान बाधित 
आणि
Ø  विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळणी समित्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर
****

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात अटी शर्तींसह दुकानं सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असला, तरीही राज्यात दुकानं उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर ही दुकानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, ग्रामीण भागातली दुकानं, ज्या शहरात हॉटस्पॉट नाही अशा रहीवाशी भागातली दुकानं, सुरु करण्यात येणार आहेत. मात्र बाजारपेठेतली दुकानं, मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट यांची दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, सलून उघडणार नसल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारं आपल्या अधिकारात दुकानं सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची दुकानं सध्या तरी सुरु होणार नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

 दरम्यान, कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं निदान करण्यासाठी राज्यात आतापर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून एक लाखांवर चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक चाचण्या करणारं राज्य ठरलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****

 कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढत आहे. महिनाभरापूर्वी देशात टाळेबंदी लागू केली तेव्हा एकूण ६०६ बाधितांपैकी ४३ रग्ण बरे झाले होते. त्यावेळी हे प्रमा ७ टक्के होतं. आता देशभरात कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार ५०६ वर पोचली असून, त्यापैकी ५ हजार ६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यानुसार कोरोना विषाणू मुक्त होणाऱ्यांचं प्रमाण साडे वीस टक्के झालं आहे. तर अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधे एकही रुग्ण नसल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
****

 देशातल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रीय मंत्रीगटानं काल आढावा घेतला. देशात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी नऊ दिवसांपेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती देण्यात आली. देशात एकशे चार कारखान्यांमध्ये दररोज एक लाख पीपीई किट तयार होत असल्याचं तसचं याच प्रमाणात मास्क तयार होत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी देशभरात एक कोटी २४ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा तयार केला असून त्यातल्या १० लाख लोकांना प्रशिक्षण दिलं असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
****

 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कार्य करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना या आजाराचा संसर्ग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोज घालणं अनिवार्य असून, प्रत्येक कार्यालयात साबण, हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं. कार्यालयात आल्यावर काम सुरु करण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवून हातमोजे घालावे, तोंडाला स्पर्श करु नये, दोन कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी एक मीटरचं अंतर असावं, प्रत्येक विभागानं कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्याच्या किटचं वाटप करावं, असे निर्देश या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारनं दिले आहेत.

 कर्मचाऱ्यांनी चेहरा, डोळे, नाक, आणि तोंडाला स्पर्श करू नये, हातमोजे खिशात ठेऊ नये, दरवाजाचे हॅण्डल प्रत्येक दोन ते तासांनी सॅनिटायझरने विषाणूरहित करावे, मोबाईल दूरध्वनीवर बोलताना चेहऱ्याशी संपर्क टाळण्यासाठी स्पीकर मोडचा वापर करावा, कार्यालयात स्नानाची व्यवस्था नसल्यास घरी गेल्यानंतर तात्काळ साबणीचा वापर करून स्नान करावे, स्वच्छता, आरोग्य आणि पोलिस खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणाचा वापर करावा, एकमेकांचे मोबाईल, हातरूमाल, पाण्याची बॉटल, चष्मा यासारख्या वस्तू वापरू नयेत असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.
****

 राज्यात काल ८११ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा सात हजार ६२८ झाला आहे. काल या आजारानं २२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३२३ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात ११९ जण या आजारातून बरे होऊन घरी परतले असून, कोरोना विषाणू मुक्त झालेल्यांची संख्या एक हजार ७६ आहे.
****

 लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. उदगीर इथं काल एका ७० वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितलं. ही महिला विषाणू बाधित असल्याचा अहवाल काल दुपारीच आला होता. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्या या महिलेला प्रकृती खालावल्यानं काल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं, असं ते म्हणाले.
****

 औरंगाबाद शहरातही काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे औरंगाबाद शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
 औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असली, तरी २२ जण आतापर्यंत या आजारातून मुक्त झाले आहेत. काल शहरात आढळलेल्या पाच रूग्णांमध्ये शहरातल्या हिलाल कॉलनीतल्या एकाच घरातील तीन महिलांचा समावेश आहे, टाऊन हॉल परीसरातील एक तर अन्य एकजण हा किलेअर्क भागातल्या रहिवाशी आहे. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात १८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत चार अशा एकूण २२ कोरोना विषाणूबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत आढळलेले कोरोना विषाणू बाधित सर्व रूग्ण हे बाधितांच्या एकमेकांच्या संपर्कातले आणि त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या आजाराचे शहरात रूग्ण जरी वाढत असले तरी प्रादुर्भाव मात्र मर्यादित स्वरूपात आहे.
रविकुमार कांबळे, आकाशवाणी, औरंगाबाद
****

 राज्य राखीव पोलिस दलाचा आणखी एक जवान कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळूल आलं आहे. हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या जवानांसोबत मालेगावहून आलेला हा जवान जालन्यात उतरला होता. त्यानंतर तो हिंगोली तालुक्यातल्या हिवरा बेल या आपल्या गावी गेला होता. हिंगोलीतल्या काही जवान बाधित असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांच्यासोबतच्या सर्व जवानांची चाचणी करण्यात आली, यात गावी आलेल्या या जवानाचीही चाचणी करण्यात आली आहे. विषाणू बाधित असल्याचं आढळल्यानंतर या जवानाच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

 दरम्यान, यापूर्वी आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित सहा जवानांच्या संपर्कातल्या काही जवानांना एस आर पी एफ कॅम्पमध्ये तर काहींना तिरुमला मंगल कार्यालयात विलगीकरणात ठेवलं आहे. हिंगोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत काल एस आर पी एफ परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलं.
****

 नांदेड शहरातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
****

 परभणी शहरातल्या एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा उपचारानंतरचा दुसरा अहवाल नकारात्मक आला आहे. त्याची आणखी एकदा तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये काल आणखी आठ जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्यानं मालेगावमधल्या रुग्णांची संख़्या आता १२४ झाली आहे.
****

 वाशिम जिल्ह्यात आढळलेला एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****

 राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींसाठी हातमोजे, सॅनिटायझर तसंच मास्क खरेदीसाठी एकूण दोन कोटी ७० लाख रुपयांचा निधी जागतिक बँक प्रोत्साहन अनुदानाअंतर्गत देण्यात आला आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. या वस्तू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायतींची निवड करताना कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायतीबरोबरच त्यांच्या नजिकच्या ग्रामपंचायतींची निवड करावी, असं ते म्हणाले.
****

 टाळेबंदीच्या काळात मद्याची दुकानं सुरु करु नये, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मद्याची दुकानं बंद असल्यानं अनेकांचं व्यसन सुटलं असून, पुन्हा ही दुकानं सुरु करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरेल, असं आठवले यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महसूल वाढीसाठी मद्याची दुकानं सुरु करण्याची मागणी केली आहे, मात्र आठवले यांनी याला विरोध केला आहे. 
****

 स्वस्त धान्य दुकानात तांदळासोबत डाळही उपलब्ध करुन देण्याचा विचार सरकार करत असल्याचं अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी सरकार शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य उपलब्ध करुन देत आहे.
****

 केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना- मनरेगा आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विकास कामांना गती देऊन अकुशल कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक काम करता येईल, असं रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांनी काल विविध राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागातल्या विकास कामांना खीळ बसू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली, त्यावेळी भुमरे यांनी ही मागणी केली.
****

 बँक उद्योगाला देण्यात आलेला सार्वजनिक उपयुक्तता सेवेचा दर्जा २१ ऑक्टोबरपर्यंत राहणार असून या काळात त्याला औद्योगिक विवाद कायद्याच्या तरतुदी लागू राहतील असं कामगार मंत्रालयांनं घोषित केलं आहे. परिणामी या काळात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा संप करता येणार नाही. आर्थिक घडामोडींवर कोरोना विषाणू उद्रेकाचा होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आली आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६४ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 लातूर महानगरपालिकेनं शहरात प्रवेश करणारे जवळपास ३० रस्ते बंदिस्त केले आहेत. लातूर शहरात कोरोना विषाणूची लागण झालेली नसली तरीही खबरदारी म्हणून शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हे रस्ते बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  लातूर जिल्ह्याच्या सीमाही पूर्णपणे बंद करुन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
****

 नांदेड शहरात टँकरच्या टाकीत बसून आलेल्या १८ जणांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. आंध्र प्रदेशातले हे नागरिक जालन्याहून निघाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****

 परभणीत दोन दिवसांच्या संचारबंदीनतर काल सकाळी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. किराणा तसंच भाजीपाला घेण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. या काळात परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यातं आलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या किनवट- माहूर सारख्या दुर्गम आदिवासी भागात कोरोना विषाणू संसर्गा विरूध्द लढण्यासाठी प्रशासनानं विविध उपाय योजना केल्या आहेत. याविषयी माहिती देताना सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले…….

 प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक-एक अंटी कोरोना टिम नोडल अधिकारी अंतर्गत बनवलेली आहे. आज दोन्ही केंद्रांमध्ये माहूर मध्ये मिळून जवळपास सहा हजार लोकांना आपण होमक्वांरनटाईन केले आहे. या भागामध्ये काही एक कोरोनाचा पेशंन्ट आला नाही किंवा संक्रमण सुद्धा झाले नाही.  सर्व बॉर्डर सिल केलं आहे , ३-४ चेक पांईट केलेल आहे. त्याच्यात पोलिस आणि फोरेस्टचे लोक आपण लावलेले आहेत. दहा-दहा लोकांची एक वेगळी टिम तयार केली आहे. त्याला आपण लोकल टिम्स म्हणू. त्याच्या मध्ये आपण काही युवकांची, काही व्हेलंटीअर घेतलेले आहे. त्यांचे काम आहे की बॉर्डर वरून कोणी माणूस इकडे आला तर  त्याला गावामध्ये स्टॉप करणार आणि त्यांना येथे येण्याचा जो संपर्क आहे तो थोडासा थांबणार.

 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी कालपासून मदत नव्हे कर्तव्य'  या उपक्रमांतर्गत  स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीनं ३५ गावातल्या गरजुंना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ केला.

 नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वतीनं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या महापालिकेच्या रूग्णालयातल्या परिचारिका, अंगणवाडी सेविका यांना आमदार हंबर्डे आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं.
****

 नांदेड इथं परशुराम ब्राम्हण कर्मचारी महासंघाच्या वतीनं २५० गरजु कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचं तर हिंगोलीच्या विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीनं २५० गरजुंना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं.
****

 परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात सर्व दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तुंचे भावफलक आपल्या दुकानासमोर लावले आहेत. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हे आदेश दिले होते. जे दुकानदार भावफलक लावणार नाही, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा पारधी यांनी दिला आहे.
****

 हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थाननं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून पाच लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा धनादेश अप्पर निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला.
****

 नांदेड जिल्ह्यात धर्माबादचे उद्योगपती सुबोध काकाणी हे गेल्या एक महिन्यापासून गरजुंना २० ते २२ हजार अन्नाची पाकिटं वाटप करत आहेत. या सेवेत गावातले नागरिकही सहभागी झाले आहेत. 
****

 टाळेबंदीच्या काळात औरंगाबाद शहरात शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कृषी विभागानं सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

 टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन येत कृषी विभागानं शेतकरी तसंच शेतकरी  गटामार्फत २९ मार्चपासून आतापर्यंत 96  लाख  87  हजार रूपयांचा भाजीपाला आणि फळ विक्री केली आहे. दीड लाख किलोग्रॅम भाजीपाला तर जवळपास अडीच लाख किलोग्रॅम फळांची विक्री याकाळात करण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण ६४ शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन शहरातल्या विविध भागातल्या ग्राहकांच्या थेट दारापर्यंत हा भाजीपाला आणि फळं पोहाचवली. या उपक्रमामध्ये मध्यस्थ कोणीच नसल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही याचा मोठा लाभ झाला.
रवीकुमार कांबळे, आकाशवाणी औरंगाबाद
****

 टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं नेमलेल्या दोन समित्यांनी काल आपापले अहवाल केंद्र सरकारला सादर केले. देशातल्या उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांचं आगामी शैक्षणिक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरु करावं अशी शिफारस एका समितीनं केली आहे, तर आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी टाळेबंदी संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही, असं दुसऱ्या समितीनं आपल्या शिफारशीत म्हटलं आहे. या शिफारशींचा अभ्यास करुन दिशानिर्देश जारी होतील, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं.
****

 जालना जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा काल मृत्यू झाला. एकाच दिवशी ठराविक अंतरानं तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांचे  नातेवाईक आक्रमक झाल्यानं जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मेंदूज्वर, मुत्रपिंड विकार आणि कर्करोग आदी आजार असलेले हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या तिन्ही रुग्णांचे मृत्यू कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेले नाहीत, तरीही खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितलं.
****

 महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लिंगायत समाजाने घरात राहुनच जयंती साजरी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन लातूरचे उपमहापौर चंद्रकांबिराजदार यांनी केलं आहे. लातूर महानगरपालिका प्रथेप्रमाणे बसवेश्वर जयंती साजरी करणार असल्याचं ते म्हणाले.
****

 नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीत दररोज हळदीची मोठी आवक होत आहे. काल नांदेडच्या बाजारात तीन हजार पोते हळद आवक झाली तर भोकरच्या बाजारातही हळद खरेदीला दोन दिवसापासून सुरूवात झाली आहे. हळदीला काल पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 रम्यान, हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद विकण्याची घाई  न करता  आवश्यकतेनुसार टप्प्या टप्प्यानं हाळद विक्री करावी असं आवाहन शेतकरी नेते शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केलं आहे. सध्या हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक असल्यानं भाव कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाळेबंदी उठेपर्यंत संयम ठेन हळद विक्री करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात रमजानच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी संचारबंदीतून सूट देऊन फळांची दुकानं सुरु करावी अशी मागणी जमियत ए उलेमा ए हिंद च्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या पेठशिवणी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेलं काम बंद करण्यात आलं असून, हे काम सुरु करुन पावसाळ्या गोदर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. डास अळी उत्पती झाल्यास हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया त्यादी आजाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेनं खरबरदारी घ्यावी असं आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख माजीद शेख यांनी केलं. नांदेडमध्येही जिल्हा हिवताप कार्यालयात हिवतापाचे संशोधक सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामाजिक अंतर पाळून हिवताप दिन साजरा करण्यात आला.
****

 मुंबईतल्या एका विशेष न्यायालयानं एल्गार परिषद - माओवाद्यांशी संबंधांप्रकरणी काल नागरी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांचा अंतरीम जामीन अर्ज फेटाळताना त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांनी कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. आपण श्र्वसनासंबंधी विकारानं ग्रस्त असून तुरुंगात कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका असल्यानं जामीन मिळावा, असं तेलतुंबडे यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं.
****

 अहमदनगरमध्ये बेकायदेशिररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांना पारनेर इथल्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. दिल्लीच्या मरकजसाठी आलेले हे २६ परदेशी नागरिक कायद्याचं उल्लंघन करून अहमदनगरमध्ये राहत होते.
****

 नाशिक शहरातल्या भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातल्या झोपडपट्टीला काल सकाळी लागलेल्या आगीत सुमारे दिडशे झोपड्या खाक झाल्या. अग्नीशमन दलाचे एक जवान आग विझवताना जखमी झाल्यानंतर  त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. घरगुती उपयोगाच्या सातपेक्षा अधिक सिलेंडरचा या आगीत स्फोट झाल्यामुळे आगीनं भीषण रुप धारण केलं होतं.
*****
***

No comments: