आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० एप्रिल २०२० सकाळी ११.००
वाजता
****
हिंदी चित्रपट सृष्टीतले
प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते.
कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ते गेल्या सप्टेंबर महिन्यातच ते भारतात परतले होते.
ऋषी कपूर यांनी बॉबी, सागर, प्रेमरोग, चांदनी, अग्निपथ, 101 नॉट ऑऊट, अशा अनेक हिंदी
चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या, शानदार या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार, बॉबी या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कार
याशिवाय फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल
समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
राज्यात गेल्या २४ तासात
५९७ कोरोना विषाणू बाधितांची वाढ झाली असून
यात मुंबईत सर्वाधिक २७० रुग्ण आढळले आहेत. या वाढीव रुग्णांमुळे राज्यातली रुग्णसंख्या
९ हजार ९९७ एवढी झाली आहे. राज्यात २०५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून
१ हजार ५९३ रुग्ण बरे झाले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात आज सकाळी
१४ जणांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. या नवीन रुग्णांपैकी अकरा
जण पूर्वीच्याच बाधित क्षेत्रातले असून, प्रत्येकी एक रुग्ण कैलासनगर, चिकलठाणा आणि
सावरकर नगर भागातला आहे. औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या
आता १४४ झाली आहे.
****
अकोला शहरात सलग दुसऱ्या
दिवशी आणखी पाच जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे अकोल्यातली
एकूण रुग्णसंख्या २७ झाली आहे. यातील चौघे एकाच कुटुंबातील आहेत तर एका महिलेचा मृत्यू
झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
****
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना खासगी वाहनातून सांगली जिल्ह्यात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी
मुंबईतील एका पोलिस उपनिरीक्षकासह चौघांविरोधात कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला. कुठलाही अधिकृत परवाना नसतांना मुंबईहून सांगलीकडे निघालेलं हे खाजगी
वाहन पोलिसांनी अडवल्यावर देखील थांबलं नाही, त्यामुळे पोलीसांनी पाठलाग करत हे वाहन थांबवून कारवाई केली.
****
No comments:
Post a Comment