Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
·
औरंगाबादमधे कोरोना विषाणूचे नवे
तेवीस रुग्ण.
·
राज्यातील १३ हजार ४४८ उद्योगांना
काम सुरू करण्याची परवानगी.
·
टाळेबंदीची पाहाणी करण्यासाठी
केंद्र सरकारची पथकं राज्यांना रवाना.
आणि
·
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देणार.
****
औरंगाबाद शहरात आज कोरोना विषाणूची
लागण झालेले नवे २३ रुग्ण आढळले आहेत. सकाळच्या सत्रात तेरा नवे रुग्ण आढळल्यानंतर
दुपारच्या सत्रात दहा रुग्ण आढळल्याची माहिती, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी
यांनी दिली आहे. औरंगाबादमधे याची लागण झालेल्यांची संख्या आता १०५ झाली आहे. शहरातल्या
पैठण गेट परिसरात चार, संजयनगर मुकुंदवाडी परिसरात दोन तर किले अर्क, भीमनगर, बडा तकिया
मशीद सिल्लेखाना तसंच दौलताबाद परिसरात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे. औरंगाबाद
शहरात कालही एकाच दिवसात एकोणतीस नवे रुग्ण आढळले होते.
औरंगाबाद इथं काल किले अर्क परिसरात
मरण एका ७० वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली होती, असं आज प्राप्त झालेल्या
अहवालांनंतर स्पष्ट झालं आहे. औरंगाबादमधील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या
सात झाली आहे.
****
राज्यातील १३ हजार ४४८ उद्योगांनी
काम सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज
ही माहिती दिली. गेल्या वीस एप्रिलनंतर कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू टाळेबंदीमुळे
राज्यातील उद्योग बंद असून केंद्र सरकारनं त्यांना पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच अन्य मुख्यमंत्र्यांदरम्यान
काल झालेल्या दूरदृष्य प्रणाली संवादावेळी या संबंधी चर्चा झाली होती. उद्योगांना सुरू
करण्यासंदर्भात अटींवर राज्यांनी निर्णय घ्यावा, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. राज्य
औद्योगिक महामंडळ- एमआयडीसीतर्फे उद्योगांच्या स्वयंघोषित माहितीनुसार उद्योग सुरू
करण्याची परवानगी दिली जात असल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी या बाबत दिली आहे.
उद्योग पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महामंडळाकडे आतापर्यंत पंचवीस हजारांहून अधिक अर्ज
आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्योगांना पुन्हा काम सुरू करताना सुरक्षित
सामाजिक अंतर, कर्मचाऱ्यांना तात्पुरता निवारा तसंच निर्जंतुकीकरण उपलब्ध करून देणं
बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणुच्या प्रादूर्भावामुळे
लागू टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारची पथकं विविध राज्यांमध्ये पाहाणीसाठी
रवाना झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सूरत, अहमदाबादमधील
पाहाणी पूर्ण झाली असून पथकाला काही ठिकाणी टाळेबंदीचं पालन होत नसल्याचं आढळल्याचं
आरोग्य मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेमधे स्पष्ट केलं. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर
बरे होणाऱ्यांचं प्रमाण सध्या २३ पूर्णांक ३ टक्के असून गेल्या चोवीस तासांमध्ये ६८४
रुग्ण बरे झाले आहेत. देशातील या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता २९ हजार ४३५
झाली असून गृह अलगीकरणाचे दिशा निर्देश देण्यात आले आहेत. घरांमध्ये तिहेरी मास्कचा
उपयोग केला जावा, ज्येष्ठांना स्वतंत्र ठेवण्यात यावं, अशा सूचना यात आहेत. या विषाणूच्या
संसर्गावर ‘प्लाझ्मा थेरपी’ मुळे नुकसान होऊ शकतं, असा इशारा आरोग्य मंत्रालयानं यावेळी
दिला.
****
विद्यापीठ अनुदान आयोग कोरोना
विषाणूमुळं स्थगित झालेल्या परीक्षांच्या नव्या तारखा आणि पुढील शैक्षणिक वर्षा संदर्भात
पुढील आठवड्यात दिशा निर्देश जारी करण्याची शक्यता आहे. आयोगान यासाठी दोन समित्यांची
स्थापना केली होती. या समित्यांनी गेल्या २४ एप्रिलला आपला अहवाल आयोगाकडे सादर केला
असून त्यानुसार या दिशा निर्देशांना जारी केलं जाणार असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं
कळवलं आहे.
****
देशात सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या
पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला तात्पुरत्या स्वरूपात ‘एक राष्ट्र
एक शिधा पत्र’ योजना राबवण्यासंदर्भात विचार करायला सांगितलं आहे. टाळेबंदीच्या कालावधीत
प्रवासी कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावं,
हा यामागचा उद्देश आहे. केंद्र सरकारची ही योजना येत्या जूनमध्ये सुरू होणार होती.
न्यायमूर्ती एन. वी. रमन्ना, एस. के. कौल, आणि बी. आर. गवई यांच्या पीठानं जारी केलेल्या
आदेशात सध्याच्या स्थितीत ही योजना लागू करणं व्यवहार्य आहे का नाही याचा विचार केंद्रानं
करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
केंद्र आणि राज्य सरकारांना टाळेबंदी
एकत्रितरित्या टप्प्याटप्प्यानं उठवण्याची विनंती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून संवाद साधताना केली आहे.
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोरोना विषाणू नसलेल्या अथवा अत्यल्प असलेल्या भागांमध्ये
याची अंमलबजावणी करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. हे आपलं वैयक्तिक मत असून असे निर्णय
गडबडीत घेतले जाऊ नयेत, लष्कराच्या शिस्तीमध्ये सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन व्हावं,
अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. टाळेबंदीचा दुकानदार, उद्योजक, लघू तसंच मोठ्या
व्यावसायिक फटका बसला असून या सद्यस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याची गरज
असल्याचं खासदार सुळे यांनी म्हटलं आहे.
****
टिकटॉक इंडीया कंपनीतर्फे कोरोना
विषाणू विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे पाच
कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी टिकटॉक
कंपनीला मनापासून धन्यवाद दिले आहेत. टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात
मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना विषाणूविरुद्ध त्यांच्या लढ्याची माहिती
कळवली आहे. राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी टिकटॉक कंपनीनं गृहविभागाला एक लाख मास्क
उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रूपये
देणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांशी
दुरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेऊन या संदर्भातील निर्णय जाहीर
केला आहे. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय झाला असून विद्यापीठाच्या आपत्कालीन निधीतून
हा निधी देण्यात येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं
वेतन कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं आहे. नऊ लाख
७५ हजार १३६ रुपये या वेतनातून जमा झाले असून हा धनादेश कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
****
औरंगाबाद शहरात वाढत चाललेल्या
कोरोना विषाणू रूग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण यांनी आज राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद
प्रशासनानं आता सावध नाही तर कठोर भूमिका घ्यावी असं आमदार चव्हाण यांनी यावेळी सूचित
केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. शहरात कोरोना विषाणूची लागण
झालेल्यांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक असून पोलिस, प्रशासनानं यावर नियंत्रणासाठी
कठोर पावलं उचलावीत अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.
****
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विधिज्ज्ञ
अपर्णा रामतीर्थकर यांचं आज सकाळी सोलापूर इथं निधन झालं. पक्षाघाताचा झटका आल्यानं
गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूर इथल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. त्या
६५ वर्षांच्या होत्या. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रामतीर्थकर यांनी २००८ पासून
`चला नाती जपू या` `आईच्या जबाबदाऱ्या` आदी विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्यानं
दिली होती. सोलापूरमधील अनेक संस्थामधे त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी
उद्या आणि परवा असे दोन दिवस मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. सामान्य प्रशासन
विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या बारा ते
पंधरा गावांना आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. काल रात्रीही वसमत, कळमनुरी
आणि औंढा तालुक्यातील बारा ते पंधरा गावांना भूकंपाचे धक्के बसले होते. या पार्श्वभूमीवर
आज सकाळी अकरा वाजता कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र
वाघमारे, आमदार संतोष बांगर यांनी बऊर, बोथीसह
भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या गावांना भेटी देऊन घाबरलेल्या नागरिकांना दिलासा दिला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात
आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वसमत
तालुक्यातल्या कुरूंदा, कौठा इथं गारांचा तर कडोळी, सवना, गिरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह
पाऊस झाला. अनेक घरांवरचे पत्रे उडाले तर हळद काढणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल झाले. नांदेड
जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातही आज दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळं
केळीच्या बागांचं नुकसान झालं. वाशीम जिल्ह्याच्या काही भागातही आज हलक्या सरी कोसळल्या
आहेत.
****
लातूर इथल्या विलास सहकारी साखर
कारखान्यानं आजपासून गळीत हंगाम २०२०-२१ सुरू करण्याच्या दृष्टीन कारखान्याची यंत्र
आणि दुरूस्तीची काम अंशतः सुरू केली असल्याचं संचालक वैशाली देशमुख यांनी कळवलं आहे.
केंद्र तसंच राज्य सरकार आणि साखर आयुक्ताच्या निर्देशानुसार टाळेबंदीच्या नियमांचं
पालन करून हे काम सुरू करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment