Sunday, 26 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.04.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 

 रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. या रमजानला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवण्याची आपल्यासमोर संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते. ईदपर्यंत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आपण आधीसारखेच उत्साहानं ईद साजरी करू शकू, अशी प्रार्थना करूया, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. त्याचवेळी रमजानच्या या दिवसांत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत रस्त्यांवर, बाजारांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, शारीरिक अंतराचं पालन करावं, असंही ते म्हणाले.

 देशासाठी आपल्या आवडी आणि वेळेप्रमाणे, काही करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सरकारनं कोविड्स वॉरिअर्स डॉट जीओव्ही डॉट इन हा डिजिटल मंच तयार केला आहे. या मंचाच्या माध्यमातनं सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, नागरी समाजाचे प्रतिनिधी, आणि स्थानिक प्रशासन असे, सव्वा कोटी लोक जोडले गेल्याचंही पंतप्रधान सांगितलं.

 अक्षय्य तृतीया आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचं स्मरणही नरेंद्र मोदी यांनी केलं.
****

 देशभरात कोरोनाबाधितांची संख्या साडे सव्वीस हजारांच्या जवळपास पोहोचली आहे, तर आतापर्यंत ८२४ जण मरण पावले आहेत. ५ हजार ८०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर एक जण भारतात उपचार घेऊन बरा होऊन परदेशात गेला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. देशात सर्वाधिक ७ हजार ८०० रुग्ण महाराष्ट्रातले असून, राज्यात आतापर्यंत ३२३ जण कोरोनामुळे मरण पावले आहेत.

 दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत २ लाखांहून अधिक  लोक मरण पावले आहेत, तर २८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ७ लाख ७२ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 मुंबईत गेल्या २४ तासांत १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर २८१ नवे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासा देणारी आहे. दिवसभरात १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत ७६२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे.
****

 नवी मुंबईतल्या गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून, पंधरा जणांना विगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 औरंगाबादमध्ये आज सकाळी कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात आसेफिया कॉलनीतील एका ३५ वर्षीय, तर समतानगर भागातल्या एका ६५ वर्षीय महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

 यासह आता औरंगाबादमधल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एकूण ५१ इतकी झाली आहे. यातले २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 यवतमाळ इथं संस्थात्मक विगीकरणात असलेल्या ७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. जिल्ह्यातल्या ३१७ जणांच्या लाळेचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठवले असून, त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 ज अक्षय्य तृतीयेचा सण देशभर साजरा होत आहे. मात्र, कोरोनामुळे कुठेही सार्वजनिकरित्या एकत्रित धार्मिक कार्यक्रम होत नसून, नागरिकांनी घरोघर पूजन आणि पूर्वजांचं स्मरण केलं. टाळेबंदीमुळे सराफ बाजारातही सोने खरेदी करता येणार नसल्यामुळे गुढीपाडव्यानंतर आता हा सणही व्यापारी वर्गासाठी यंदा लाभदायक ठरलेला नाही. काही सराफा व्यापाऱ्यांनी ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय ग्राहकांसाठी खुला केला असल्याचं वृत्त आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या श्री तुळजा भवानी मंदीरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीची अलंकार पूजा करण्यात आली. यावेळी देवीच्या मूर्तीला उत्कृष्ट दागदागिन्यांचा पेहराव करण्यात आला. कोरोनामुळे १७ मार्चपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे यावर्षी गुढीपाडवा आणि चैत्री यात्रेलाही इथं भाविकांना येता आलं नव्हतं. पण देवीचे सण उत्सव परंपरेप्रमाणे साजरे केले जात असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

*****
***

No comments: