Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
Ø डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर
अजामीनपात्र गुन्हा
दाखल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
Ø इलेक्ट्रॉनिक तसंच मुद्रीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी
वार्तांकन करताना
आवश्यक खबरदारी घेण्याचं माहिती प्रसारण मंत्रालयाचं
आवाहन
Ø गेल्या २४ तासात राज्यात
कोरोना बाधित ५५३ नवे रूग्ण
आणि
Ø स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या प्रयोगशाळेत
कोरोना विषाणू
संसर्ग चाचण्या करण्यास परवागनी
****
डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर
अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्रीय
मंत्रिमंडळानं साथरोग नियंत्रण कायद्यात सुधारणा करून याबाबतचा अध्यादेश आज जारी केला.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. देशभरात हा आदेश लागू
राहील. हल्लेखोरांना पन्नास हजार ते दोन लाख रुपये दंड तसंच सहा महिने ते सात वर्ष
कारावासाची शिक्षेची तरतूद या अध्यादेशात करण्यात आली आहे. हल्ल्याची तीव्रता पाहून
कारावास तसंच दंडाची रक्कम निश्चित होईल, असं जावडेकर यांनी सांगितलं. हल्लेखोरांनी
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनाचं किंवा रुग्णालयाचं नुकसान केल्यास, बाजार मूल्याच्या
दुप्पट दंड वसूल केला जाईल, असा इशाराही सरकारनं दिला आहे.
देशभरात गेल्या तीन महिन्यात आरोग्य सेवांचा विस्तार
करण्यात आला असून, सध्या सातशे २३ रुग्णालयातून सुमारे दोन लाख विलगीकरण खाटांची व्यवस्था
करण्यात आली आहे. देशभरात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण १९ पूर्णांक
३६ शतांश टक्के एवढं आहे.
****
इलेक्ट्रॉनिक तसंच मुद्रीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी
वार्तांकन करताना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन माहिती प्रसारण मंत्रालयानं केलं आहे.
देशाच्या काही भागात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या
पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. सर्व माध्यमगृहांनी आपल्या वार्तांकन करणाऱ्या
पत्रकारांना तसंच कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य
उपलब्ध करून देण्याची सूचना माहिती प्रसारण विभागाने केली आहे.
****
देशात
औषधं, खतं आणि संक्रमण रोखणाऱ्या रसायनांचा मुबलक साठा असावा यासाठी सरकार आवश्यक
ते सर्व उपाय करत असल्याचं खतं आणि रसायन मंत्री डी.बी सदानंद गौडा यांनी म्हटलं आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुरेशा खतांचा पुरवठा व्हावा यासाठी मंत्रालय पूर्ण क्षमतेनं
काम करत असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
****
लॉकडाऊनच्या
काळात अनेक स्थलांतरित कामगार राज्यातल्या विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे. या
नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न
पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. या नागरिकांकडे शिधापत्रिका
नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नाही, मात्र राज्य सरकारकडून
नियमित लाभार्थींना अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर राहिलेलं पाच टक्के धान्य या
नागरिकांना देण्याची मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे पासवान यांच्याकडे केली आहे.
****
टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण
झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं राज्यात सर्वच ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या
कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेनं शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन
रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी केलं आहे.
****
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री,
साहित्य तसंच औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राज्यातल्या विभागीय
आयुक्तांना आतापर्यंत १७१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी
कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वडेट्टीवार यांनी आज, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी
आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्तांना
तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, या महिन्यात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यासंदर्भात सदरील नुकसानीचे
पंचनामे करून अहवाल शासनास पाठवण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आले आहेत.
****
केंद्र सरकार कोरोना
विषाणूच्या लक्षणांसदर्भात टेलीफोनवरून जन सर्वेक्षण करणार आहे. आरोग्य मंत्रालयानं
कोरोनाच्या लक्षणांची माहिती व्हावी यासाठी जनतेला या सर्वेक्षणात सहभागी होण्याचं
आवाहन केलं आहे. नागरिकांना राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अथवा १९२१ या क्रमांकावरून
संपर्क साधता येईल.
****
गेल्या
२४ तासात राज्यात कोरोना बाधित ५५३ नवे रूग्ण आढळले आहेत त्यामुळे राज्यात आता कोरोनाबाधितांची
संख्या पाच हजार २२९ झाली आहे. यातले ७२२ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत, गेल्या २४
तासात राज्यात १९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या २५१ झाली आहे.
****
नवी मुंबईतल्या एमआयडीसी महापे इथं असणाऱ्या एका
आयटी कंपनीमधील १९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यामधील ७ जण
नवी मुंबईत राहतात तर इतर जण ठाणे, मुंबई, सांगली, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथले रहिवासी
आहेत. या सर्वांवर महापालिकेच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही
कंपनी सील करण्यात आली आहे.
दरम्यान, कारखाना किंवा
आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध
गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य शासनाने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे
स्पष्ट केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू संसर्ग चाचण्या
करण्यास परवागनी मिळाली आहे. या प्रयोगशाळेत दररोज अडीचशे चाचण्या होऊ शकणार असल्याचं,
विद्यापीठानं जारी केलेल्या पत्रातून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबादच्या किराडपुरा
इथल्या कोरोना बाधित एका व्यक्तिचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना आज सुट्टी देण्यात
आली. कोरोना बाधित एकूण १५ जणांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान, आज आणखी दोन
जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं त्यामुळे औरंगाबाद इथं आता कोरोनाबाधित
रुग्णांची संख्या ३८ झाली आहे, यापैकी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा
तालुक्यातल्या ब्राह्मणे गावात कोरोना विषाणू रुग्ण आढळून आला आहे, त्यानंतर हे गावातले
सर्व व्यवहार पूर्ण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान धुळे शहरातही
कोरोना विषाणू बाधित रुग्णाची संख्या आठ वर पोहोचली असल्याने शहरातले रस्ते आज सकाळपासून
बंद करण्यात आले आहेत. शहरात ९८ जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. घराबाहेर
पडणाऱ्यांवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन कोरोनाबाधितांचे १४ दिवसानंतरचे
दोन्ही अहवाल नकारात्मक आले आहेत. लोणी आणि मुकुंदनगर इथले हे दोन्ही रूग्ण आहेत. असं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहेत.
*****
लातूर
जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या शिवूर इथल्या सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकर
बिराजदार यांनी आपल्या मुलाच्या विवाह प्रसंगी गावजेवण देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
त्यांनी गावजेवण देण्याचा बेत रद्द करून गावातल्या ३७० लाभार्थ्यांना स्वखर्चाने
तीन महिन्याच्या धान्याचं मोफत वाटप केलं
****
औरंगाबाद
शहरात कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना शिवसेनेच्या वतीनं अन्नधान्य
आणि किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह
अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्यातल्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्ह्यातल्या
महत्त्वाचे असलेल्या रस्ते बांधकामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कामे गुणवत्तापूर्वक,
वेळेवर पूर्ण करावीत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
****
सोलापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली
आहे. तशा प्रकारचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अन्शु सिन्हा यांनी जारी
केला आहे.
****
लातूर
कृषी उत्पन्न बाजार समितीनं सोयाबीनचा सौदा गुळ मार्केट आवारात काढण्याचा निर्णय घेतला
आहे. उद्यापासून दररोज सकाळी ९ वाजता या सौद्याला सुरूवात होईल, यासाठी ५० शेतकरी वाहनांना
प्रवेश देण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी या सौद्यासाठी नाव नोंदणी करण्याचं आवाहन लातूर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात
आलं आहे
****
जालना
जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथली ३९ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून
आल्यानंतर या महिलेच्या निकट संपर्कातील १९ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं असून,
त्यांच्या घशातल्या स्रावाचे नमुने घेण्याचं काम सुरू आहे. बाधित महिला परतूर इथं वास्तव्यास
असलेला परिसरही पोलिसांनी सील केला आहे.
****
लॉकडाऊन
असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जालना पोलिसांनी आज शहरातल्या
विविध भागात कारवाई केली. सामाजिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्या दहा
दुकानदारांकडून नगरपालिकेच्या पथकानं आज १४ हजार रुपये दंड वसूल केला.
****
हिंगोली
इथं सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवणारे ३८ नागरिक, चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल
न बांधणारे ३७ नागरिक, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका नागरिकाविरुद्ध दंडात्मक
कारवाई करण्यात आली आहे. किराणा दुकानावर दर फलक न लावणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्धही
कारवाई करण्यात आली आहे. या एकूण ८२ जणांकडून ५७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आली
असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment