Wednesday, 29 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.04.2020....Evening Bulletin



Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
·      केंद्र सरकारने कोणाचंही कर्ज माफ केलेलं नाही; कर्जबुडव्यांविरोधात कारवाई सुरूच
·      सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षा कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती निवळताच प्रथम प्राधान्यानं घेतल्या जाणार.
·      राजस्थानात कोटा इथं अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ७० बसेस रवाना.
आणि
·      औरंगाबाद इथं दिवसभरात एकोणीस रूग्ण; एकूण रुग्णसंख्या १२८ वर.
****
केंद्र सरकारने कोणाचंही कर्ज माफ केलेलं नसून, कर्जबुडव्यांविरोधात कारवाई केली जात असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. वसूल न झालेल्या कर्जाच्या रकमा एका ठराविक कालमर्यादेनंतर बँकांकडून ताळेबंदातून निर्लेखित केल्या जातात. मात्र याचा अर्थ ते कर्ज माफ केलं असा होत नाही. निरव मोदी तसंच विजय मल्ल्या यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. त्यांच्या थकबाकीचा एक मोठा हिस्सा वसूल झालेला आहे आणि उर्वरित रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बारा कोटी नागरिकांच्या वेतन आणि मजुरीसाठी सरकारनं एक योजना जाहीर करावी, अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. नवी दिल्लीत दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीही सरकारनं आर्थिक पॅकेज जाहीर करावं, असं चिदंबरम यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****
केंद्र सरकारच्या सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेतू ॲप तत्काळ डाऊनलोड करावं, आणि या ॲपद्वारे सुरक्षित असल्याचं सांगितल्यावरच कार्यालयात यावं, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. मात्र या ॲपने जर मध्यम किंवा अति धोका असल्याचे संकेत दिले, तर संबंधितांनी कार्यालयात न येता, पुढचे चौदा दिवस घरीच विलगीकरणात राहावं, असं या बातमीत म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या राहिलेल्या परीक्षा कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती निवळताच प्रथम प्राधान्यानं घेतल्या जातील, असं सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे. दहावी बारावीच्या एकूण २९ विषयांच्या परीक्षा घेण्याची तयारी मंडळानं केली असून, परीक्षा झालेल्या विषयांच्या उत्तर पत्रिकांचं मूल्यांकन पूर्ण करण्याची सूचना, केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं मंडळाला केली आहे.
****
टाळेबंदीमुळे राजस्थानात कोटा इथं अडकून पडलेल्या राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून आज ७० बस रवाना करण्यात आल्या. राज्यातले सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटा शहरात अडकले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र शासन आणि राजस्थान सरकार सोबत चर्चा करुन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून ७० बस रवाना केल्या.
****
राज्यशासन तीन मे नंतर टाळेबंदीचा कालावधी वाढवणार असेल तर इतर जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, शिक्षकांबाबत शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी या मागणीचं निवदेन केलं आहे. पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी तसंच राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांमध्ये हजारो शिक्षक स्वत:च्या मूळ जिल्ह्यांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर अडकून पडले आहेत. अशा विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांना २ दिवसांचा वेळ देवून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही सतीश चव्हाण यांनी केली आहे.
****
कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला असल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून, आता दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन, तो कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र ही पद्धत कोरोनाग्रस्तावर उपचारासाठी वापरावी, याचा अद्यापतरी काहीही ठोस पुरावा नसल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरात आज दुपारी आणखी आठ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये आसेफिया कॉलनी तसंच नूर कॉलनीतील प्रत्येकी तीन आणि किलेअर्क परिसरातील दोन रुग्णांचा समावेश असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. शहरात आज दिवसभरात एकोणीस रुग्ण आढळले असून, एकूण रुग्ण संख्या १२८ वर पोहोचली आहे.
शहरातल्या बायजीपुरा इथल्या कोरोना विषाणू बाधित महिलेची काही दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती, या महिलेला तसंच तिच्या बाळाला आज घरी सोडण्यात आलं. शहरात आतापर्यंत एकूण २४ रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. 
दरम्यान, नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी शहरातल्या सिटीचौक पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीचाही कोरोना विषाणू बाधितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यातील २० कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, या सर्वांच्या लाळेच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येत असल्याचं पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात एका बेकरीतल्या कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त खोटं आहे. याबाबत सामाजिक संपर्क माध्यमावरून चुकीची बातमी फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी याबाबत एक पत्र जारी करून, हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
जालना जिल्हा रुग्णालयात १६ दिवस उपचार घेतल्यानंतर, परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथल्या महिलेला आज कोरोनामुक्त झाल्यावर सुट्टी देण्यात आली. कोरोना विलगीकरण कक्षातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर, परिचारिकांनी या महिलेचं टाळ्या वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. योग्य उपचार तसंच डॉक्टर, परिचारिकांनी धीर दिल्यानं आपण कोरोनाविरुध्दची ही लढाई जिंकल्याची भावना या महिलेनं व्यक्त केली. दरम्यान, दु:खीनगर भागातल्या कोरोनामुक्त झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी पाठवण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी सांगितलं.
****
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या कोरोना उपचार कक्षात कार्यरत असलेली महिला कर्मचारी तसंच कराड तालुक्यातल्या एका युवकाला कोरोना विषाणुची बाधा झाल्याचं आज समोर आलं आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या ४३ इतकी झाली आहे.
****
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्र्वभूमीवर राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी दोन हजार रुपये आर्थिक अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे. यानुसार नांदेड जिल्ह्यात भोकर नगर परिषदेच्यावतीनं शहरातल्या १०४ लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. बँक खाते नसलेल्या ७० लाभार्थींना प्रत्येकी २००० रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
****
लातुर जिल्ह्यात नाम फांऊडेशनच्या वतीनं सहाशे गरजुंना किराणा सामानाच्या सहाशे पाकिटांचं वाटप करण्यात आलं. नाम फांऊडेशनचे प्रमुख नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, राजाभाऊ शेळके, यांच्या माध्यमातून या साहित्याची व्यवस्था करण्यात आली.
परभणी जिल्ह्यात मानवत शहरातील हमालवाडी परिसरातही नाम फाउंडेशन आणि ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं १२० कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आलं.
****
हिंगोली इथल्या ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं पंतप्रधान सहाय्य्ता निधीला पाच लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख अशी दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या रकमेचा धनादेश अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.
****
कोरोना विषाणु संक्रमणाच्या काळातही जीवाची पर्वा न करता वार्तांकन करणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या भोकर शहरातील पत्रकारांचा जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. भोकर नगर परिषदेच्या वतीनं सुरक्षित सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम घेतला.
****
केंद्रीय कापूस निगम- सीसीआयमार्फत कापूस खरेदीसाठी परभणी जिल्ह्यात आतपर्यंत ४६ हजार ७७६ कापूस उत्पादकाची नोंदणी करण्यात आली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...