Monday, 27 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांचा आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद
Ø  राज्यातल्या टाळेबंदीबाबत तीन मे नंतर परिस्थिती पाहून निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Ø  राज्याला एक लाख कोटी रुपयांचं विशेष अर्थसहाय्य देण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची पंतप्रधानांकडे मागणी
Ø  राज्यात आणखी ४४० कोरोना विषाणू बाधित रूग्ण; १९ जणांचा मृत्यू
Ø  औरंगाबाद शहरात चार तर नांदेडमध्येही कोरोना विषाणूचा एक नवीन रूग्ण; प्रादुर्भावाचं प्रमाण कमी करण्यासाठी टाळेबंदी अधिक कडक करण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना
आणि
Ø  वाधवान बंधूं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात
****

 सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोविड -१९ चा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणासह येत्या तीन मे नंतर टाळेबंदी टप्प्या टप्प्यानं कशी मागे घेता येईल, याबाबत यावेळी चर्चा होण्याची  शक्यता आहे. देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान तिसऱ्यांदा संवाद साधणार आहेत.
****

 कोरोना विषाणू विरूद्धची लढाई देशाची जनता लढत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकार आणि प्रशासनाच्या मदतीनं जनतेची ही लढाई सुरू असल्याचं ते म्हणाले. आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाचा प्रत्येक नागरीक या लढाईत सैनिक असून या जनताच या लढाईचं नेतृत्व करीत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या लढाईत हिरहिरीने सहभागी झाल्याबद्दल तसंच एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांची प्रशंसा केली.

 रमजानच्या पवित्र महिन्याला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवण्याची आपल्यासमोर संधी आहे, असं ते म्हणाले. ईदपर्यंत संपूर्ण जग कोरोना विषाणू पासून मुक्त होईल आणि आपण आधीसारखेच उत्साहानं ईद साजरी करू शकू, अशी प्रार्थना करू या, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. त्याचवेळी रमजानच्या या दिवसांत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत रस्त्यांवर, बाजारांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करावं, असंही ते म्हणाले.
****

 कोरोना विषाणूच्या संकटामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ५० वर्षं करण्याचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होत असलेल्या या बातमीचं खंडन करत, हे वृत्त निराधार असल्याचं कार्मिक विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्रसिंग यांनी म्हटलं आहे. तसंच, फाईव्ह-जी या मोबाईल नेटवर्क सेवेमुळे कोरोनाची लागण होत नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय आयकर दात्यांना आपल्या उत्पन्नाचा १८ टक्के हिस्सा देणं अनिवार्य करणारा कायदा सरकार आणणार असल्याचं वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं ट्विटरद्वारे सांगितलं आहे. आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीच्या डॉक्टरांना कोविड - १९च्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली नसल्याचं स्पष्टीकरणही पत्र सूचना कार्यालयानं दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर या बाबतची पोस्ट व्हायरल होत आहे.
****

 राज्यातल्या टाळेबंदीबाबत तीन मे नंतर त्या त्या भागातली परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमांद्वारे त्यांनी राज्यातल्या जनतेशी काल संवाद साधला. यावेळी जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील असं त्यांनी सांगितलं, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल, असंही ते म्हणाले.

 राज्यातल्या जिल्ह्यांच्या सीमा सध्या बंद आहेत. त्या खुल्या करण्याबद्दल आणि मोकळीक देण्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले...

 आपण जिल्ह्याच्या वेशी उघडत नाही आहोत. पण जिल्ह्यांतर्गत काही उद्योग आणि इतर काही हलचालींना आपण सुरूवात केली आहे. त्याचा रोजचा रिपोर्ट माझ्याकडे येतो आहे.पुन्हा एकदा मी याचा आढावा घेतो आहे. आणि मग तीन तारखेनंतर काय करायचं आणखीन किती मुभा देता येईल. आणखीन किती मोकळीक देता येईल हे आपल्याला पाहावं लागेल.

 राज्यातल्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून, हॉटस्पॉटची तसंच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना विषाणू नसलेल्या रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, असं आवाहन करताना त्यांनी केले. या रूग्णांना औषधोपचारांची गरज असल्याचं सांगतांना ते म्हणाले...

 ज्यांना खासकरून मधुमेह असेल, कारडीयॉक प्राब्लेम असेल, स्थूलपणा असेल, किडनीचे विकार असतील, त्यांना आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे. त्याचं कारण हा जो विषाणू आहे. हा आता पर्यंतच्या आपल्या निरीक्षणात ह्या प्रकारच्या व्यक्तींवरती जास्त गंभीर असा दुष्परिणाम करतो. या व्याधीग्रस्तांसाठी आपण आपआपले दवाखाने सुरू करा.

 महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातल्या कामगार-मजूरांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणं हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
****

 राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासह अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी, राज्याला एक लाख कोटी रुपयांचं विशेष अर्थसहाय्य देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांना पत्राद्वारे केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पानुसार अपेक्षित महसुलात सध्या मोठी तूआहे. त्यामुळे अर्थ पुरवठ्यात पोकळी निर्माण झाली असून राज्याचा भांडवली खर्च भागवण्यासाठी अशी मदत देणं आवश्यक असल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. 
****

 राज्यात काल ४४० नवीन कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या आठ हजार ६८ झाली आहे. काल ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात एक हजार १८८ रुग्ण या आजारातून बरे झाले असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात काल १९ बाधितांचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ३४२ झाला आहे.
****

 औरंगाबादमध्ये काल कोरोना विषाणूचे आणखी चार नवे रुग्ण आढळून आले. यात आसेफिया कॉलनीतल्या दोन महिला, समतानगर भागातली एक ६५ वर्षीय महिला आणि दौलताबादमधल्या एका ५३ वर्षीय महिलेचा समावेश असल्याची आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रानं दिली. यासह आता औरंगाबादमधल्या एकूण रुग्णांची संख्या ५ इतकी झाली आहे.
****

 नांदेड शहरातही काल आणखी एक ४४ वर्षीय व्यक्ती बाधित असल्याचं आढळून आलं. व्यवसायाने चालक असलेला हा व्यक्ती पंजाबमध्ये जाऊन आला होता. नांदेड शहरात यापूर्वीही एक जण विषाणू बाधित सापडला होता.
****

 वाशिम जिल्ह्याकामरगांवच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीलाही या विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. २ एप्रिल रोजी हे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना तांदूळ वाटपासाठी शाळेत गेले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले  शिक्षक, २०० पालक आणि अन्य नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी पाच जणांना दक्षता म्हणून वाशिमच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
***

 जालना जिल्हा रुग्णालातल्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोना विषाणू बाधित महिलांचे सलग दोन अहवाल नकारात्मक आल्यामुळे जालना जिल्हा सद्य स्थितीत कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी काल ही माहिती दिली. नकारात्मक अहवाल आलेल्या शहरातल्या दु:खीनगर भागातल्या महिलेला अन्य आजारही असल्यानं प्रकृती काहीशी गंभीर असून, परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथल्या ३९ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं डॉ. राठोड यांनी सांगितलं.

 दरम्यान, जिल्हा रुग्णालयात अन्य आजारानं मृत्यू झालेल्या तिघांसह इतर २३ जणांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत.
****

 यवतमाळ जिल्ह्यात काल आणखी १६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ५० झाली आहे.
****

 धुळे इथं काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २४ झाली आहे.
****

 कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातल्या उचत इथला कोरोना विषाणू बाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला काल जिल्हा प्रशासनानं वाजत गाजत घरी पाठवलं.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल तीन जण कोरोना मुक्त झाले. मालेगावात आतापर्यंत पाच जण या आजारातून बरे झाले आहेत.
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं काल कोरोना विषाणूचे तीन नवे रुग्ण आढळून आले. जामखेड शहरातल्या बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे, तर जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या ४३ झाली आहे.
****

 कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या राज्यातल्या २० पोलिस अधिकारी आणि ८७ कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. यापैकी, मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
****

 औरंगाबाद शहरातल्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी करण्यासाठी सुरू असलेली टाळेबंदी अधिक कडक करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या विषाणूचा प्रादुर्भाव नाही, ही चांगली गोष्ट असल्याचं ते म्हणाले. शहरात सध्या नियंत्रण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षा उपकरणाच्या -पी पी ई किट्स  अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

  कोरोना विषाणूला घाबरुन न जाता नागरिकांनी त्या विरोधात लढण्याचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे त्यांनी काल संघ स्वयंसेवक आणि जनतेशी संवाद साधला. ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकायची असल्यानं टाळेबंदी आणि एकमेकांमध्ये अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करा, असं त्यांनी सांगितलं. या काळात कार्यक्रम घेणं शक्य नाही, मात्र सेवा हेच आपलं मुख्य कार्य असल्याचं भागवत यांनी स्वयंसेवकांना सांगितलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात आतापर्यंत सुमारे ७२ हजार ७०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या काळात झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं गृह विभागानं प्रसिद्धी पत्रकामार्फत सांगितलं आहे.

 पोलिसांवर हल्ला होण्याच्या राज्यभरातल्या १५० घटनांची नोंद झाली असून, यात ४८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार ९२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४७ हजार ७८२ वाहनं जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा नियमाचे उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.
****

 कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे.  तसंच उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजूर कामगार आणि गरिब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच वाटप केल आहे.

 १३ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात जिल्ह्यातले कारखानदार, साखर कारखाने, बँका, पतसंस्था, दानशूर व्यक्तींनी ६४ लाख ४६ हजार बावीस रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे. तर जिल्ह्यातले रोजंदारी कामगार, गोरगरीब मजूरांना २४ हजार ३५५ जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचं वाटप करण्यात आलं आहे.
****

 परभणी इथं तोंडाला मास्क न लावता फिरणारे, किराणा दुकानांवर भावफलक न लावणारे, विनाकारण फिरणारे, रस्त्यावर थुंकणारे आदींच्या विरोधात दंडात्मक कारवाई करुन दहा हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यानंतर अशा व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करतांनाच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असं मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितलं.
****

 कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या देशातल्या अनेक उद्योग कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्थलांतरित उद्योगांना औरंगाबाद औद्योगिक वसाहत ऑरिक सिटीमध्ये आणण्यासाठी शासनानं प्रयत्न करावेत, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
****

 कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन जनजागृती करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांना स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात काल केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी हे प्रशिक्षण घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****

 परभणी इथल्या भारतीय जैन संघटना आणि पी.डी.जैन होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्या वतीनं डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ काल झाला. या मोहिमेअंतर्गत विनामूल्य तपासणी आणि मोफत औषधी वितरण करण्यात येआहे. काल शहरातल्या संत गाडगेबाबा नगर इथल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोनपेठ इथल्या आर्य वैश्य समाजाच्या वतीनं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या चारशे सरकारी कर्मचारी आणि गोरगरिबांना दररोज जेवणाचं वाटप केलं जात आहे.
****

 नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार अमरनाथ राजुरकर यांच्या वतीनं गावागावातून वृतपत्र वितरण करणारे वितरक आणि वार्ताहरांना जीवनावशक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. हिमायतनगर इथं आर्य वैश्य समाज संघटनेनं परमेश्वर मंदिराच्या पाकशाळेत विलगीकरणात असलेल्या रूग्णांशिवाय, पोलिस, आरोग्य, महसूल आदी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातल्या दगडगाव इथं काल आमदार मोहन हंबर्डे यांनी स्वखर्चातून अपंग व्यक्ती आणि गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. मुखेड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती निवारण सेवा समितीच्या वतीनं मागील महिनाभरापासून दररोज अन्नदान केलं जात आहे.
****

 कोरोना विषाणूपासून बचावासाठी सुरू असलेल्या टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करणाऱ्या वाधवान बंधूंना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल ही माहिती दिली. ते म्हणाले….

 धिरज वाधवान आणि कपिल वाधवान या दोघांनाही सी.बी.आय च्या ताब्यात दिलं. बाकी त्यांचा जो परिवार आहे, त्यांना होम क्वारंटाइन  मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच बरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता हे आमचे प्रिसिपल सेक्रेटरी आहेत. त्यांनी जे पत्र वाधवान परिवाराला दिलं होत त्याच्या बद्दल इनक्वायरीचा रिपोट प्राप्त झालेला आहे. आणि या रिपोट नुसार हे जे पत्र अमिताभ गुप्ता यांनी वाधवान परिवाराला देण्यासाठी दिलं होत ते पत्र अमिताभ गुप्त  यांनी स्वतः दिल्याचं कबूल केलेला आहे.

 कोरोना विषाणुच्या संसर्गानं मृत्यू पावलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या परीवाराला आर्थिक मदत सरकार करणार असल्याचं सांगताना गृहमंत्री देशमुख म्हणाले...

 आमच्या दोन्ही पोलिस शिपाईचा मृत्यू झाला. महाराष्ट्र शासन या संपूर्ण परिवाराच्या ठामपणे पाठीशी आहे. या परिवाराला राज्य शासनाच्या माध्यमातंन पन्नास लाख रुपये त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबातील जे असतील त्यांना नोकरी देण्यात येईल. बाकी जी मदत त्यांना सुद्धा संपूर्ण मदत या संपूर्ण परिवाराला करण्यात येईल.
****

 लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. या प्रयोगशाळेत प्रत्येक दिवशी एकुण ९० व्यक्तींच्या लाळेच्या नमुन्यांची दोन पाळीमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केल्यानंतर सहा तासामध्ये अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीठाकूर यांनी दिली.
****

 आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथा लिहिणाऱ्या तुपे यांची 'झुलवा' ही कादंबरी खूप गाजली. त्यांच्या 'आंदण' या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, तर 'काट्यावरची पोटं' या आत्मकथेला आणि 'झुलवा' कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता.

 झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनानं माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्रानं गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुपे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
****

 साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण काल देशभरात कुठंही सार्वजनिक कार्यक्रम न घेता घरोघरी साजरा करण्यात आला.

 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या श्री तुळजा भवानी मंदीरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीची अलंकार पूजा करण्यात आली. यावेळी देवीच्या मूर्तीला उत्कृष्ट दागदागिन्यांचा पेहराव करण्यात आला. टाळेबंदी असल्यामुळे भाविकांसाठी मंदीर बंद असलं तरी देवीचे सण उत्सव परंपरेप्रमाणे साजरे केले जात असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

 सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काल मोगऱ्याच्या फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. पण कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी मात्र बंदच ठेवण्यात आलं आहे.

 लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिऊर इथं काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह झालेल्या एका दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा  २५ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला. सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह सोहळ्यावर होणारा खर्च या जोडप्यानं वाचवला. 

 सोलापूर इथल्याही एका जोडप्यानं देखील काल आपला विवाह साधेपणात साजरा करून लग्न सोहळ्याचा खर्च पीएम केअर्स निधीत जमा  केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अक्षय्य तृतीयेनिमित्त जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातल्या अन्य भागात नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे एकमेकांतलं अंतर पाळलं गेलं नाही. विक्रेते आणि ग्राहक यांनी सर्वच नियम मोडत गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 महात्मा बसवेश्वर यांनी मांडलेल्या क्रांतिकारक संकल्पना आजच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या  संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करतांना, बसवेश्वर हे कृतिशील समाजसुधारक होते, असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, मंत्रालयात परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

 परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

 विवाह सोहळ्यांच्या अनुषंगानं विविध व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांवर टाळेबंदीच्या काळात उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
****

 लातूरच्या जागृती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या सुचनेनुसार कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले सभासद आणि बिगर उस उत्पादक सभासदासाठी उस विकास योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी दहा मे पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन कारखान्याच्या वतीनं करण्यात आलं आहे
****

 जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या दाभाडी शिवारात काल अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या धडक कारवाईत दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.
*****
***

No comments: