Thursday, 30 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  देशात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण अकरा दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक १९ शतांश टक्के
Ø  कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत- मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश
Ø  दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार
आणि 
Ø  औरंगाबाद शहरात आज दुपारपर्यंत २१ नवीन कोरोना बाधित रुग्ण
****

  देशात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण अकरा दिवसांवर गेलं असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक १९ शतांश टक्के एवढं झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या चोवीस तासात देशभरात एक हजार ७१८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, सध्या देशभरात २३ हजार ६५१ रुग्ण विविध रुग्णालयांमधून उपचार घेत आहेत. गेल्या चोवीस तासात ६३० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत आठ हजार ३२४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.
 ****

 कोविड १९ च्या उपचार पद्धतीत बदल करण्यासंदर्भात निर्देश जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यवस्थ रुग्णांवरच्या उपचारात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि प्रतिजैविकांचा वापर घातक असू शकतो, यामुळे या उपचारावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आज सुनावणीस आली. न्यायालय या संदर्भात तज्ज्ञ नसल्याने, काहीही निर्देश देऊ शकत नसल्याचं, तीन न्यायमूर्तींच्या पीठानं सांगितलं. या आजारावर सध्या कोणतीही ठोस उपचार पद्धत ज्ञात नसल्यामुळे, डॉक्टरांकडून विविध प्रकारे उपचारांचा प्रयत्न केला आहे. उपचाराबाबतचा आपला सल्ला, भारतीय वैद्यक संशोधन परिषद - आयसीएमआर कडे नोंदवावा, अशी सूचना न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केली आहे.
        ****

 कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. अनेक खासगी दवाखाने तसंच सुश्रुषा गृहांकडून रुग्णांना निदान तसंच उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जे दवाखाने रुग्णांना उपचार नाकारतील, त्यांच्याविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दोन मे नंतर याबाबतचे आदेश लागू होणार असल्याचं, मेहता यांनी सांगितलं.
         ****

 लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसंच इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य सरकारनं कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसंच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार आहे. सर्व यंत्रणांनी जबाबदारीने यासंदर्भात अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या अडकलेल्या व्यक्तींची यादी संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी दोन्ही राज्यांनी समन्वयानं वाहतुकीचा निर्णय घ्यावा, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अधिकृत पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोविड आजाराची लक्षणं असल्यास वाहतुकीची परवानगी दिली जाणार नाही, तसंच इतर राज्यांतून येणाऱ्यां सर्वांना चौदा दिवसांचा विलगीकरण अवधी पाळावा लागेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
       ****

 दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कपूर कुटुंबातल्या सदस्यांसह उद्योजक अनिल अंबानी, अभिनेता अभिषेक बच्चन, सैफ अली खान तसंच चित्रपटसृष्टीतल्या मोजक्या कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून, ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप दिला. कपूर यांचं आज सकाळी मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या निधनाने आपण एका गुणी कलावंताला मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
    ****

        हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
    ****

 महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत आहे. औरंगाबाद इथं उद्या महाराष्ट्र दिनाचं शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हे ध्वजारोहण होणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंमामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.
  ****

 खरीप हंगामापूर्वी बीड जिल्ह्यात विद्युत दुरुस्ती आणि रोहित्र वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, तसंच मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामं त्वरित सुरू करावीत, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. वीज वाहतूक आणि वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कामं त्वरित करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी राऊत यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
   ****

 विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीने विद्यापीठांच्या परीक्षांबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठांना दिल्या असून त्याअनुषंगानं स्थापन केलेल्या कुलगुरुंच्या समितीची उद्या बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीपाठोपाठ परवा होणाऱ्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर  परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा एक ते १५ जुलै पर्यंत संपवाव्यात आणि बारावीनंतरचं नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर पासून सुरु करावं अशा सूचना यूजीसीने दिल्या असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
 ****

 तूर खरेदीची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्याची मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात संचारबंदी लागू आहे. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेऊन ही मुदतवाढ द्यावी, असं ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यात तूर खरेदीची मुदत आज ३० एप्रिलला संपते आहे.
  ****

 औरंगाबाद शहरात आज दुपारपर्यंत २१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील नूर कॉलनी, कैलासनगर, चिकलठाणा, सावरकर नगर, किल्लेअर्क, जय भीमनगर, आसेफिया कॉलनी,  बेगमपुरा या परिसरातले हे रुग्ण असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबाद शहरातली एकूण रुग्णसंख्या आता १५१ झाली आहे.

 दरम्यान, औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघानं शहरातला जुना आणि नवा मोंढा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ही माहिती दिली आहे. या तीन दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर निर्जंतूक करण्यात येणार असून दुकानांचे मालक, कर्मचारी आणि हमाल बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं.
****

 कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी उद्या १ मेच्या सुट्टीच्या दिवशीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले सर्व बाजार व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी ही माहिती दिली.
****

 नांदेड शहरातील पीरबुऱ्हाणनगर भागातला रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय कोरोनाग्रस्त रूग्णाचा आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णावर २२ एप्रिल पासून उपचार सुरू होते. मधुमेह, अस्थमा यासह अनेक आजार असल्याने रूग्णाची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 धुळे इथं आज आणखी दोन रुग्णांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात २८ वर्षीय तरुणाचा, आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
****

 अहमदनगर इथं एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचे १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २५ झाली आहे.
****

 अमरावती शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनानं जिल्ह्यातल्या सरकारी आणि खासगी संस्थांच्या तेवीस इमारती ताब्यात घेतल्या असून या इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
****

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आलं. कुलगुरू डॉ उध्दव भोसले यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

 लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सुरेन्द्र अनंतराव पाठक यांचं आज सकाळी लातूर इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव, तसंच सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहात होते.
****

 नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातले कर्मचारी वैजनाथ दांडगे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रूपयांचा निधी दिला आहे. आज त्यांनी आपला धनादेश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
****

 चंद्रपूर महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ जणांविरूद्ध तसंच मास्क न वापरणाऱ्या ३८६ नागरिकांवर कारवाई केली आहे. या नागरिकांकडून ७८ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला नसून जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.
*****
***

No comments: