Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****
·
राज्यातल्या टाळेबंदीबाबत तीन मे नंतर परिस्थिती
पाहून निर्णय घेणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·
कोरोनाच्या संकटामुळे शासकीय
कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय ५० वर्षं करण्याचा
कुठलाही विचार नाही.
केंद्र सरकारचं स्पष्टीकरण.
·
टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन
केल्याप्रकरणी राज्यभरात सुमारे
७२ हजार ७०० गुन्हे दाखल. गृह विभागाची माहिती.
आणि
·
प्रसिद्ध साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचं पुण्यात दीर्घ आजारानं निधन.
****
राज्यातील
टाळेबंदीबाबत तीन मे नंतर त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमांद्वारे त्यांनी राज्यातल्या
जनतेशी आज संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्या दूरदृष्य प्रणालीद्वारे
होणाऱ्या बैठकीत या दृष्टीने चर्चा होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी
यावेळी राज्यातल्या जनतेला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर यांनाही
त्यांनी जयंती निमित्ताने अभिवादन केलं.
राज्यातल्या
मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान मासारंभाच्या शुभेच्छा देतानाच, या काळात रस्त्यावर,
मशिदीत एकत्र प्रार्थना न करता ती घरातल्या घरात करण्याचं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी
केलं.
राज्यातल्या
जिल्ह्यांच्या सीमा सध्या बंद आहेत. त्या खुल्या करण्याबद्दल आणि मोकळीक देण्याबद्दल
उद्धव ठाकरे म्हणाले...
आपण
जिल्ह्याच्या वेशी उघडत नाही आहोत. पण जिल्ह्यांतर्गत काही उद्योग आणि इतर काही हलचालींना
आपण सुरूवात केली आहे. त्याचा रोजचा रिपोर्ट माझ्याकडे येतो आहे.पुन्हा एकदा मी याचा
आढावा घेतो आहे. आणि मग तीन तारखेनंतर काय करायचं आणखीन किती मुभा देता येईल. आणखीन
किती मोकळीक देता येईल हे आपल्याला पाहावं लागेल.
कोरोना
नसलेल्या रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, असं आवाहन करताना
मुख्यमंत्री म्हणाले...
ज्यांना
खासकरून मधुमेह असेल, कारडीयॉक प्राब्लेम असेल, स्थूलपणा असेल, किडनीचे विकार असतील,
त्यांना आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे. त्याचं कारण हा जो विषाणू आहे. हा आता पर्यंतच्या
आपल्या निरीक्षणात ह्या प्रकारच्या व्यक्तींवरती जास्त गंभीर असा दुष्परिणाम करतो.
या व्याधीग्रस्तांसाठी आपण आपआपले दवाखाने सुरू करा.
****
कोरोना विषाणूच्या संकटामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं
वय ५० वर्षं करण्याचा कुठलाही
विचार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होत असलेल्या
या बातमीचं खंडन करत, हे वृत्त निराधार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. तसंच, फाईव्ह - जी या मोबाईल नेटवर्क सेवेमुळे कोरोनाची लागण होत नाही, असंही
सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय आयकर दात्यांना आपल्या उत्पन्नाचा १८ टक्के हिस्सा
देणं अनिवार्य करणारा कायदा सरकार आणणार असल्याचं वृत्तही खोटं
असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
****
कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी संक्रमित लोकांचा
शोध घेणं आणि तपासणी करणं
महत्वाचं आहे, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी
आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटाविषयी आणि उपाययोजनांविषयी चर्चा
केली, त्यावेळी मनमोहन सिंग बोलत होते. रुग्णांच्या तपासणीसाठी पुरेशी सोय नसणं ही
फार मोठी समस्या असल्याचं मत मनमोहन सिंग यांनी यावेळी व्यक्त केलं. स्थलांतरित मजुरांच्या
संरक्षणासाठी काँग्रेस पक्षानंही एक रुपरेषा आखली पाहिजे, असं मत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त
केलं.
****
आसाम सरकारनं अन्य राज्यात असलेल्या एक लाख ६० हजार आसामी नागरिकांच्या
बँक खात्यात आसाम केअर्स योजनेअंतर्गत
प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. याशिवाय दुसऱ्या राज्यात असलेल्या
आसामच्या ज्या नागरिकांना कर्करोग, हृदयरोग आणि मूत्रपिंडाचे आजार आहेत, अशा रुग्णांसाठी आसाम सरकारनं
प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत दिली आहे.
****
टाळेबंदीत २३ मार्च ते २४ एप्रिल या
महिन्यातल्या
१७ दिवसांच्या कामकाजात सर्वोच्च न्यायालयानं दूरदृष्य प्रणालीद्वारे ५९३ प्रकरणांची सुनावणी केली.
त्यापैकी २१५ प्रकरणांवर निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात एका महिन्यात जवळपास साडे तीन
हजार प्रकरणांची सुनावणी केली जाते.
****
कोरोनापासून बचावासाठी सुरू असलेल्या टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करून खंडाळा ते महाबळेश्वर
असा प्रवास करणाऱ्या वाधवान बंधूंना गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं ताब्यात घेतलं असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी दिली आहे. या दोघांनाही मुंबईत आणलं जात असून, त्यासाठी सातारा पोलिसांनी नियमाप्रमाणे सुरक्षा व्यवस्थाही पुरवल्याची माहिती
देशमुख यांनी दिली. वाधवान बंधूंनी केलेल्या प्रवासासाठी, त्यांना पत्र देणारे गृहमंत्रालयाचे
विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या भूमिकेबद्दल अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी केलेल्या
चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसांत मिळेल, असंही देशमुख यांनी सांगितलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात
आतापर्यंत सुमारे ७२ हजार ७०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या काळात झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी दोन कोटी ७४ लाख ४३ हजार
३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती राज्याच्या गृह विभागानं प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या राज्यभरातल्या १५० घटनांची नोंद झाली असून, यात ४८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या
काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार ९२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४७ हजार ७८२ वाहनं जप्त करण्यात आली आहेत. परदेशी नागरिकांकडून
व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.
****
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या राज्यातल्या २०
पोलिस अधिकारी आणि ८७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी, तीन अधिकारी
आणि चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून, अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचं राज्य शासनानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
दरम्यान,
कोरोनामुळे मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत एका ५७ वर्षीय आणि संरक्षण शाखेत कार्यरत एका ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि मुंबई पोलिसांनी
या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारे प्रसिद्ध
साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचं आज पुण्यात
दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. १६
कादंबऱ्यांसह अनेक लघुकथा लिहिणाऱ्या तुपे यांची 'झुलवा' ही
कादंबरी खूप गाजली. त्यांच्या 'आंदण'
या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, तर 'काट्यावरची
पोटं' या आत्मकथेला आणि 'झुलवा' कादंबरीला महाराष्ट्र
शासनाचा पुरस्कार मिळाला होता.
झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनानं माती आणि
माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्रानं
गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी आपली शोकभावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही तुपे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
****
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण आज देशभरात कुठंही सार्वजनिक कार्यक्रम न घेता घरोघर साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातल्या
पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज मोगऱ्याच्या फुलांची
आरास करण्यात आली होती. मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. पण कोरोनामुळे
मंदिर भाविकांना दर्शनासाठी मात्र बंदच ठेवण्यात आलं आहे.
****
महात्मा बसवेश्वर यांनी मांडलेल्या क्रांतिकारक संकल्पना आजच्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी
प्रेरणादायी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महात्मा बसवेश्वर
यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना, बसवेश्वर हे कृतिशील समाजसुधारक होते, असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे. दरम्यान, मंत्रालयात परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केलं.
***
अक्षय्य तृतीयेनिमित्त जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातल्या
अन्य भागात नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे एकमेकांतलं अंतर पाळलं गेलं नाही. विक्रेते आणि ग्राहक यांनी सर्वच नियम मोडत गर्दी केल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोनाची
बाधा झाल्याचं समोर आलं आहे. या नऊ जणांसह आज
दिवसभरात जिल्ह्यात १६ रुग्ण आढळून आले असून, एकूण बाधितांची संख्या ५० झाली आहे. आणखी
२६४ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं आज कोरोनाचे तीन नवे
रुग्ण आढळून आले. यामध्ये दोन ४५
आणि ५० वर्षीय पुरुष, तर एका ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे जामखेड
शहरातल्या बाधित रुग्णांची
संख्या आता १७ झाली आहे, तर जिल्ह्यातल्या
बाधितांची
संख्या ४३ झाली आहे.
//************//
No comments:
Post a Comment