Friday, 24 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.04.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 
स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कोरोना सारख्या संकटांचा सामना करता येणं कठीण असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पंचायती राज्य दिवस आज पाळला जात आहे. या निमित्तानं दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशभरातल्या ग्रामपंचायतींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. गावं, जिल्हे आणि देशानं मूलभूत गरजांसाठी स्वयंपूर्ण होण्याची गरज नमूद करताना, आपल्या किमान गरजांसाठी कोणावर अवलंबून असे नये, हीच शिकवण या परिस्थितीने दिली, पंचायत व्यवस्था बळकट असल्यास,लोकशाही बळकट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातल्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांच्यासह देशभरातल्या अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी संवाद साधून, कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व ग्रामपंचायतींनी केलेलं काम कौतुकास्पद असल्याचं सांगत, पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, सरपंच, तसंच ग्रामस्थांचं अभिनंदन केलं
एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आपापल्या विकास योजना तयार करणं तसंच त्या कार्यान्वीत करणं शक्य होणार आहे. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात आली. मालमत्तेसंदर्भात असलेले संभ्रम या योजनेमुळे दूर होतील. या संपत्तीच्या आधारे बँकेतून कर्ज घेणं सोपं होईल. महाराष्ट्रासह सहा राज्यात ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून चालवली जाणार आहे, त्यात आवश्यक सुधारणा झाल्यावर संपूर्ण देशभरात ही योजना लागू केली जाईल.
दरम्यान, पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत.  कोविड १९ च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक असेल.

पंतप्रधान परवा रविवारी २६ तारखेला मन की बात या आकाशवाणी वरच्या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६४ वा भाग असेल.
****
वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोना विषाणु बाधित व्यक्तीचे २० दिवसानंतरचे दोन्ही अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे या व्यक्तीला आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना विषाणु बाधित व्यक्ती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळत असलेली रक्क्म काढण्यासाठी नागरिकांनी बँकांसमोर आज सकाळपासून रांगा लावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गरीब कुटूंबाना या योजनेअंतर्गत मिळत असलेल्या लाभाचा फायदा घेण्यासाठी ही गर्दी होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयातल्या सहा कोरोना विषाणु बाधित रूग्णांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे औरंगाबाद मध्ये कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या आता २२ झाली आहे.  जिल्हा सामान्य रूग्णालयात १७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सहा जणांचा चौदा दिवसांचा उपचार कालावधी पूर्ण झाला असून त्यांचे अहवाल नकारात्मक आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी सर्वसामान्य घरगुती वीजग्राहक आणि शेतकरी यांचं मार्च ते जून महिन्यात येणारं संपूर्ण वीज देयक माफ करावं, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीचं निवेदन त्यांनी सादर केलं आहे. टाळेबंदी दरम्यान, बंद असणाऱ्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांचे वीज देयक पुढील तीन महिन्यासाठी स्थगित केलं आहे. मात्र, गरीब वीजग्राहक, शेतकरी आणि कामगार कुटूंब टाळेबंदी नंतरही वीज देयक भरू शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य,गरीब वीजग्राहक आणि शेतकऱ्यांकडील वीज देयक माफ करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.
****
धुळे जिल्ह्यातील अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून अन्न धान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे. वाटप करण्यासाठी हजारो पाकिट धान्य आणि किराणा वस्तू विविध गावात रवाना करण्यात आल्या.
****
राज्यातल्या प्रलंबित रेल्वे मार्गांना गती देण्याची ग्वाही रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली आहे. वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे घेण्यात आलेल्या, ‘कोरोना नंतरचा भारत: आव्हान आणि संधी’ या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते.
****


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...