Friday, 24 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      कोरोना विषाणूच्या संकटात ग्रामीण भारताच्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा; एकीकृत ई-ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाइल ॲपचा शुभारंभ.

·      देशात चोविस तासांत एक हजार सहाशे चौऱ्यांएशी नविन कोरोना विषाणू बाधित रुग्ण.

·      औरंगाबाद शहरात आणखी दोन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित.

आणि

·      विद्यापीठांच्या परीक्षांविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही- कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचं स्पष्टीकरण.

****

कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यामध्ये ग्रामीण भारतानं दिलेल्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशभरातल्या सरपंचांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातल्या जनतेनं एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर राहण्याचा दिलेला मंत्र प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटानं आत्मनिर्भरतेच्या आवश्यकतेची जाणीव करून दिली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्ह्यानं आपल्या मूलभूत गरजांसाठी आत्मनिर्भर होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी एकीकृत ई-ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाइल ॲपचा शुभारंभ केला. याबाबत माहिती देताना पंतप्रधान म्हणाले -

ई - ग्राम स्वराज्य याने Simplified work based Accounting Application for Panchayti Raj यह एक प्रकार से ग्रामपंचायतों के संपूर्ण डिजीटीलीकरण के तरफ एक बडा कदम है। यह भविष्य में ग्रामपंचायत के अलग अलग कामों का लेखाजोखा रखने वाला सिंगल प्लॅटफॉर्म बनेगा। इस के जरिए गाव का कोई भी नागरिक अपनी ग्रामपंचायत में क्या चल रहा है। क्या काम काज हो रहा है. काम कहां तक पहुंचा है। सारी चीजें अपने मोबाईल परसे जानकारी रख पाएगा।

याशिवाय सहा राज्यात प्रायोगिक स्तरावर स्वामित्व योजनेचा शुभारंही पंतप्रधानांनी यावेळी केला. यामध्ये नवीन सर्वेक्षण पद्धत आणि ड्रोनचा उपयोग करून ग्रामीण भागातल्या जमिनीचं मानचित्रण करता येईल. यामुळे ग्रामीण भागात नियोजन आणि महसूल वसूल करण सुलभ होईल, त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्कामध्ये स्पष्टता येऊन जमिनीचे विवाद कमी होण्यास मदत होईल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत. टाळेबंदीच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक असणार आहे.

****

देशात गेल्या चोवीस तासांत एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून, देशात उपचारानंतर कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वीस टक्के असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

राज्यात एकाच दिवसात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या सातशे अठ्ठ्यात्तर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह, संक्रमित रूग्णांची एकूण संख्या सहा हजार चारशे सत्तावीसवर गेली आहे. या नवीन रुग्णांपैकी ५२२ मुंबईतले आहेत. राज्यात एका दिवसात कोरोना विषाणुच्या संसर्गाची नोंद झालेल्या प्रकरणात आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे.

****

औरंगाबाद शहरात आणखी दोन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे. दोघेही पूर्वीच्या कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे शहरातल्या बाधितांची संख्या आता ४२ झाली असल्याचं जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं. शहरातल्या असेफिया कॉलनीतील ३८ वर्षीय व्यक्ती आणि भीमनगर भावसिंगपुरा मधील २७ वर्षीय तरुणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं ते म्हणाले. आतापर्यंत २२ व्यक्तीं कोरोना संसर्गातून मुक्त झाल्या आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला असून सध्या १५ व्यक्तींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या आणखी सहा जणांना कोरोना विषाणुची बाधा झाली आहे. सर्व जण संगमेश्वर भागातले रहिवासी असून ते पूर्वीच्या कोरोना विषाणू बाधिताच्या कुटुंबातले सदस्य आहेत.

****

नागपूर इथंही आज पुन्हा दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. या दोन व्यक्तींसह शहरातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे. हे दोघेजण यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना आधीचं विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

****

अमरावतीतही आणखी दोघे जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची संख्या दहा झाली आहे. यापैकी चार जण पूर्णपणे बरे झाल्यांनं त्यांना रूग्णालयातून आज घरी सोडण्यात आलं. तर चार जणांचा यापूर्वीच मृत्यु झाला आहे.

****

टाळेबंदीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षांविषयी अजून कुठलाही निर्णय झाला नसल्याचं कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी आज स्पष्ट केलं आहे. त्यांनी आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला. परीक्षांसंदर्भात तीन प्रकारचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसारचं परीक्षांबाबतीत निर्णय होणार असल्याचं ते म्हणाले. विद्यापीठात कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीचं साहित्य परदेशातून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे ही प्रयोग शाळा सुरू होण्यासाठी अजून एक महिना लागणार असल्याचं ते म्हणाले. विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्रातही कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनसह अधिक उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. खरीप हंगामाच्या अनुषंगानं लातूर जिल्ह्याला आवश्यक असलेला विविध प्रकारच्या खतांचा पुरवठा वेळेत व्हावा तसचं आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रत्येक मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज जोडणी तात्काळ देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेवडी तांडाचे ७१ कामगार टाळेबंदीमुळे तेलंगणा राज्यातल्या भद्रादी कुतोगडम जिल्ह्यातल्या झुलेपाड अडकले आहेत. यात ५६ महिला आहेत.  मिरची काढणीच्या कामासाठी हे कामगार गेले होते. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

****

धुळे जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या रूग्णांची संख्या १९ झाली आहे. यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यु झाला आहे.

****

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील मुस्लिम बहुल भागात घरी राहूनच प्रार्थना करावी तसचं नमाज आणि इफ्तारसाठी घराच्या बाहेर पडू नये याविषयी मुस्लिम मौलवी आणि धर्मगुरू घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातल्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख एक हजार रुपयांची मदत केली आहे. यासर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार या निधीत दिला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांनी दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महानगर टेलिफोन निगम कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादितनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली आहे. लोकसभा खासदार अरविंद सावंत यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव, पतपेढीचे सचिव संजय ढोलम, कोषाध्यक्ष मधुकर घाडी हे उपस्थित होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकरच्या बाजारात आज एक हजार हळद पोत्यांची आवक झाली. पाच हजार तीनशे तेहतीस रूपये प्रति क्विंटल असा या हळदीला भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: