Saturday, 25 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø कोरोना विषाणूचा प्रसार नसलेल्या ग्रामीण भागातली दुकानं सुरू करण्यास परवानगी; महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात फक्त निवासी भागातील दुकानं सुरू होणार, मात्र मॉल्सवरची बंदी कायम
Ø कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यामध्ये ग्रामीण भारतानं दिलेल्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
Ø राज्यात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपीच्या उपचाराला केंद्र सरकारची मान्यता
Ø राज्यात आणखी ३९४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; १८ जणांचा मृत्यू, औरंगाबाद शहरात चार जणांना लागण
Ø विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन पपरीक्षेसंदर्भात निर्णय घेणार -उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण
आणि
Ø मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान महिन्यातले रोजे आज पहाटे सेहरीनं सुरू
****

 कोरोना विषाणूचा प्रसार नसलेल्या आणि दुकान आणि प्रतिष्ठान अधिनियमाअंतर्गत नोंद असलेली काही भागातली दुकानं उघडण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. हॉटस्पॉट अथवा नियंत्रण क्षेत्र- कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित नाही, अशा महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रा बाहेरच्या बाजार परिसरात असलेल्या दुकानांना टाळेबंदीच्या नियमातून सूट देत ही दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या हिवाशी भागातली दुकानंही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांमध्ये टाळेबंदीचे अन्य नियम पाळून ५० टक्के कर्मचारीच ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातले मॉल्स मात्र तीन मे पर्यंत बंदराहतील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****

 कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यामध्ये ग्रामीण भारतानं दिलेल्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. राष्‍ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त देशभरातल्या सरपंचांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 'दोन हात लांब' राहण्याचा ग्रामीण भागातल्या जनतेनं  दिलेला मंत्र प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटानं आत्‍मनिर्भरतेच्या आवश्‍यकतेची जाणिव करून दिली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्ह्यानं आपल्या मूलभूत गरजांसाठी आत्‍मनिर्भर होणं आवश्यक असल्याचं, त्यांनी नमूद केलं. एकीकृत ई-ग्राम स्‍वराज पोर्टल आणि मोबाइल ॲपचा यावेळी पंतप्रधानांनी शुभारंभ केला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले,

 ई - ग्राम स्वराज्य याने Simplified work based Accounting Application for Panchayti Raj यह एक प्रकार से ग्रामपंचायतों के संपूर्ण डिजीटीलीकरण के तरफ एक बडा कदम है। यह भविष्य में ग्रामपंचायत के अलग अलग कामों का लेखाजोखा रखने वाला सिंगल प्लॅटफॉर्म बनेगा। इस के जरिए गाव का कोई भी नागरिक अपनी ग्रामपंचायत में क्या चल रहा है। क्या काम काज हो रहा है. काम कहां तक पहुंचा है। सारी चीजें अपने मोबाईल परसे जानकारी रख पाएगा।

 याशिवाय सहा राज्यात प्रायोगिक स्तरावर स्‍वामित्‍व योजनेचा शुभारंही पंतप्रधानाच्या हस्ते झाला. यामध्ये नवीन सर्वेक्षण पद्धत आणि ड्रोनचा उपयोग करून ग्रामीण भागातल्या जमिनीचं मानचित्रण करता येईल. यामुळे ग्रामीण भागात नियोजन आणि महसूल वसुल करण सुलभ होईल, त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्कामध्ये स्पष्टता येऊन जमिनीचे विवाद कमी होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले.

 दरम्यान, येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत. टाळेबंदीच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची हा तिसरा संवाद असणार आहे.

 पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६४वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****

 कोरोना विषाणूवर उपचारासाठी राज्यात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून मान्यता मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल देशातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांशी आणि सचिवांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यांवेळी ही मान्यता दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या बैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर आणि एक्सरे चाचणीच्या मदतीनं कोरोना रुग्णाचं लवकर निदान करणं शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचं निर्जंतुकीकरण करून त्याचा पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचवण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****

 राज्यात काल ३९४ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या सहा हजार ८१७ झाली आहे. काल ११७ जण या आजारातून बरे झाले असून, त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ९५७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूमुळे काल १८ जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांचा आकडा ३०१ झाला आहे.
****

 औरंगाबाद शहरात काल आणखी चार व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं. समतानगर मधले दोन, तर असेफिया कॉलनी आणि भीमनगर भावसिंगपुरा मधल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. हे चौघंही पूर्वीच्या कोरोना विषाणू बधितांच्या संपर्कात आलेले आहेत.
****

 जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथल्या कोरोना विषाणूग्रस्त महिलेच्या निकट संपर्कातल्या ६४ जणांचा अहवाल नकारात्मक आला आहे. जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात काल १९ नवीन कोरोना विषाणू संशयित रुग्णांची भरती झाली असून, दोन दिवसात भरती झालेल्या ११० रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****

 हिंगोली शहराच्या राज्य राखीव पोलीस दलातल्या सहा कोरोना विषाणू बाधित जवानांची प्रकृती स्थीर असून, आरोग्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात नागरीकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 दरम्यान, जिल्ह्याच्या वसमत इथल्या विलगीकरणात असलेल्या ४४ संशयित रुग्णांचे अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सर्वांना पुढचे १४ दिवस त्यांच्या गावात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यातले दोन मालेगावमधले, तर येवला आणि नाशिक मधला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
****

 वाशिम जिल्ह्यातल्या एकमेव कोरोना विषाणु बाधित व्यक्तीचे २० दिवसानंतरचे दोन्ही अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे या व्यक्तीला काल रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 दरम्यान, जिल्ह्यात कालही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम काढण्यासाठी लाभार्थ्यांनी रांगा लावल्याचं दिसून आलं.
****

 टाळेबंदीमुळे राज्यातल्या ९४४ निवारागृहामंध्ये स्थलांतरीत मजुरांचं मानसिक समुपदेशन करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आतापर्यंत राज्यातल्या ४७ हजार स्थलांतरित मजुरांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांचं संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलं आहे त्यांचंही समुपदेशन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्य विभागाच्या अखत्यारितल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये यासंदर्भातल्या सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क करण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड १९ ही महामारी घोषित करण्यात आली आहे, राज्यात या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.

 दरम्यान, लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आता कोरोना विषाणू चाचणी होणार आहे. यासंदर्भात काल आयसीएमआरकडून मान्यता मिळाल्याचं देशमुख यांनी सांगितलं. मराठवाड्यात आता औरंगाबाद, नांदेड, अंबाजोगाई आणि लातूर अशी चार चाचणी केंद्र आहेत.    
****

 कोविड १९ च्या साथीच्या काळात इतर रुग्णांना उपचार नाकारले जाऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करणं शासनाचं कर्तव्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नसल्याबद्दल तीन याचिका न्यायमूर्ती के आर श्रीराम यांच्यासमोर दाखल झाल्या आहेत. त्यांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आणि याचिकेवर येत्या २९ एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सामंत यांनी काल सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला आणि विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं ते म्हणाले. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून, ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसंच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****

 टाळेबंदीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीचं साहित्य परदेशातून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे ही प्रयोग शाळा सुरू होण्यासाठी अजून एक महिना लागणार असल्याचं कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काल स्पष्ट केलं. दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्रातही कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचं कुलगुरु येवले यांनी यावेळी सांगितलं.
****

 औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूच्या अनुषंगानं प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. व्हेंटीलेटर उपलब्धता, रास्त दुकानदारांच्या तक्रारी आणि केलेली कारवाई, शिवभोजन थाळीची तत्काळ पूर्तता, रमजानच्या अनुषंगानं पोलिस विभागानं घ्यावयाची खबरदारी आणि कार्यवाही, आदींबाबत देसाई यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेत सूचना केल्या. सारी या आजाराबाबतही पालकमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. जिल्ह्यात सारीचा आजार नियंत्रणात असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी यावेळी सांगितलं.
****

 टाळेबंदीच्या काळात सरकारने काही अटी शिथिल केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातल्या उद्योजकांनी स्वत:च्या जबाबदारीवर उद्योग सुरु करण्यावर भर दिला आहे. वाळूज औद्यागिक वसाहतीतल्या काही कंपन्या कालपासून सुरु झाल्या. बजाज, व्हेरॉक, एंन्ड्यूरन्स, बडवे इंजिनिअंरिंग या कपंन्या सुरु झाल्या असून, त्यांना महापालिका हद्दीबाहेरच्या कर्मचाऱ्यांना कामावर ने आण करण्यास वाहनांची परवानगी देण्यात आली आहे.
****

 तेलंगणा राज्यात भद्रादी कुतोगडम जिल्ह्याच्या झुलेपाड गावात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या ७१ कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शेवडी तांडा या ठिकाणचे हे कामगार असून मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात ते गेले होते. यात ५६ महिला असून टाळेबंदीमुळे ते सगळे तिथेच अडकल्याचं हंबर्डे यांनी म्हटलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आज सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणारी आणि वेळोवेळी टाळेबंदीमधून सुट दिलेली दुकानं चालू राहतील. तसंच जिल्ह्यातले मेडिकल आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना चोवीस तास सुरु राहतील असं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी एका आदेशाद्वारे कळवलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्याभोकर शहरातल्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख एक हजार रुपयांची मदत केली आहे. या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार या निधीत दिला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण यांनी दिली आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यातुळजापूर इथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं एक लाख २१ हजार रुपये, तर नांदेडच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यानं ११ हजार रुपये काल मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आले आहेत. शहरातल्या जैन समाजानं डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय या दोन्ही संस्थांना प्रत्येकी एक असे दोन बेसिक व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत.
****

 लातूरच्या कॉलेज ऑफ फिजिशियन ॲन्ड सर्जन या संस्थेनं एक कोटी रुपये, तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर यांनी स्वत: पाच लाख रुपयांचा निधी पंतप्रधान सहायता निधीस दिला आहे.
****

 टाळेबंदीमुळे नांदेड शहरात अडकलेल्या शिख बांधवांना त्यांच्या राज्यात ट्रॅव्हल्स बसने पाठवण्यात आलं आहे. विविध राज्यातून आलेले हे भाविक १० बसमधून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी इथल्या हरिओम मदत केंद्राचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांनी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना जिवनावश्यक किटचं वाटप केलं. सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचालित साधन केंद्र आणि नवजीवन सेवाभावी संसथेच्या वतीनं सोनपेठ शहर आणि तालुक्यातल्या तीन गावांमध्ये धान्य बँक सुरू करण्यात आली आहे. अन्नदात्यांनी या बँकेत येऊन धान्य जमा करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****

 टाळेबंदीच्या काळात इतर ठिकाणी कामावर असलेल्या आणि आपल्या गावात परत आलेल्या मराठवाड्यातल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामं देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या बोरीच्या ग्रामीण रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक कीटचं काल वाटप करण्यात आलं.
****

 धार्मिक भावना दुखावतील असा मजकुर सामाजिक माध्यमांवर टाकणाऱ्या एका व्यक्तीला काल औरंगाबाद पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. शहरातल्या पुंडलीक नगरमध्ये राहणारा प्रकाश बाताडे असं या व्यक्तीचं नाव आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणीही सामाजिक माध्यमाद्वारे आक्षेपार्ह विधाने करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं आवाहन औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाद्वारे जनतेला करण्यात आलं आहे.

 औरंगाबाद शहरातल्या चेलीपुरा भागात काल एका इसमाला नशेच्या गोळ्या विक्री करताना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चार हजार ७७० रूपयांच्या १७७० गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
****

 टाळेबंदीच्या काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावा. तसंच नियमीत चाचणी परीक्षा सोडवावी यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक माध्यमांवरील प्रयोगाला संपूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात माहिती देतांना पाटेकर म्हणाल्या..

या चाचण्यांमध्ये गणित भाषा, विज्ञान आणि इंग्रजी या चार विषयांचे आम्ही व्हाट्सअप ग्रुप शिक्षकांचे तयार केले. आणि जे तज्ञ आहेत त्या विषयामधील त्या सर्व शिक्षकांना एकत्रित करून, दररोज चाचण्या  तयार करतात.  वेळापत्रकानुसार शिक्षकांपर्यंत आम्ही ते पोहचवतो. शिक्षक पालकांच्या  व्हाट्सअप ग्रुपला सकाळी साडे आठच्या सुमारास पोहोचोतात. कारण बरेच पालक शेतीच्या कामाला जातात. त्यामुळे या वेळेचा आम्ही सदउपयोग करून मुले सकाळच्या  वेळेत चाचणी सोडवतात. अतिशय छान प्रतिसाद हा मुलांचा आहे.
****

 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातले रोजे- उपवास आज पहाटे सेहरी करून सुरू झाले. काल सायंकाळी चंद्र दर्शनानंतर तरावीह नमाज अदा करण्यात आली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा रमजानच्या महिन्यात सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावं आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****

 औरंगाबादमध्ये इफ्तारसाठी खाद्य पदार्थ, फळ खरेदी करण्यासाठी महानगरपालिकेनं  २४ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केली आहेत. दुपारी तीन ते साडे पाच या वेळेत ही खरेदी करता येणार आहे.

 जिल्ह्यातल्या घाटनांद्रा आणि वडोद बाजार पोलीस ठाण्यात पवित्र रमजान महिन्याच्या सुरूवातीच्या पूर्व संध्येला काल मशिदीतल्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली. मुस्लीम बांधवांना सामाजिक अंतर, मशिदीत तीन पेक्षा जास्त बांधवांनी येऊ नये, फळांच्या गाडीवर गर्दी नये अशा सूचना देण्यात आल्या.
****

 जालना जिल्ह्यात बि-बियाणं तसचं खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे रास्तभावानं मिळतील याची दक्षता घ्यावी, पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकावर कारवाई करावी, त्याचबरोबर पाणी टंचाईबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात एकही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जालन्यात उभारण्यात आलेल्या १५० खाटांच्या स्वतंत्र कोरोना रुग्णालयातल्या सोयी-सुविधांची टोपे यांनी काल पाहणी केली.
****

 परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या डिग्रस उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून नांदेडच्या विष्णुपुरी धरणात फक्त दहा दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सोडण्यात यावं अशी मागणी गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या डिग्रसच्या बंधाऱ्यात ३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या बंधाऱ्यातून विष्णुपुरी धरणात २५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची प्रशासनानं तयारी केली आहे. यामुळे डिग्रस बंधाऱ्यातला पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बागायती पिकाचंही मोठं नुकसान होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीते काल बोलत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेण्यात यावी, असं ते म्हणाले.
****

 लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीनसह अधिक उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. खरीप हंगामाच्या अनुषंगानं लातूर जिल्ह्याला आवश्यक असलेला विविध प्रकारच्या खतांचा पुरवठा वेळेत व्हावा तसचं आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रत्येक मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी पंपासाठी वीज जोडणी तात्काळ देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या भोकरच्या बाजारात काल एक हजार हळद पोत्यांची आवक झाली. पाच हजार तीनशे तेहतीस रूपये प्रति क्विंटल असा या हळदीला भाव मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या ३६ हजार २६३ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. कापूस विक्रीसाठी घेऊन येतांना आणि विक्री प्रक्रियेत सहभागी होतांना सर्व शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर पाळण्यासह अन्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

 लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनीही कापूस विक्रीसाठी २८ एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शासकीय खरेदी केंद्र या कापसाची खरेदी करणार आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं अवैध गौण खनिज आणि उत्खनन करणाऱ्या पाच वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात लाख ५० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचं उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर यांनी सांगितलं. 
****

 लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारास काल जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी भेट देऊन आडत बाजाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतमालाच्या आवकसंदर्भात माहिती घेतली. बाजार समितीनं सामाजिक अंतर ठेऊन जिवनावश्यक अन्नधान्यांचे व्यवहार सुरु केले आहेत.
****

 परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खतांचा तांत्रिक तुटवडा निर्माण होऊ नये अशी विंनती माजी आमदार विजय भांबळे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरवर्षीच्या मागणीचा अंदाज घेऊन सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...