Wednesday, 22 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22.04.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 
औरंगाबाद इथं आज आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे.  शहरातल्या समता नगर इथं ५१ वर्षाची एक व्यक्ती आणि २५ वर्षीय युवक या दोघांचेही कोरोनाचे अहवाल सकारात्मक आले असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. दरम्यान शहरात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ झाली आहे, यापैकी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआर ने आतापर्यंत देशभरात चार लाख ६२ हजार ६२१ संशयितांच्या घशातल्या स्रावाची तपासणी केली असून, काल दिवसभरात २६ हजार ८४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. देशभरात आतापर्यंत २१७ सरकारी तर ८७ खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणू संसर्ग चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे,
दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे एक हजार ३८३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या १९ हजार ९८४ झाली आहे. यापैकी ६४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये गेल्या चोवीस तासात दगावलेल्या ५० लोकांचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत तीन हजार ८७० रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्यानं, त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
****
कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकानं आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प, क्वारंटाईन सुविधेची पाहणी त्यांनी केली. विलगीकरणाची सुविधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भारतीय चिकित्सक संघ - आयएमएच्या डॉक्टरांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. डॉक्टरांच्या कार्याचं कौतुक करत शहा यांनी, डॉक्टरांना सर्व सुरक्षा सुविधा पुरवण्याबाबत आश्वासन दिलं,चं, त्यानंतर आयएमएने लाक्षणिक विरोधाचा इशारा मागे घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात अनेक महिला, नागरीक ही पुढाकार घेत आहेत. परभणी शहरातील शिवरामनगरातील शिवानी रत्नपारखी आणि स्नेहल सुवर्णकार या दोन सासुसुना भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. या दोघींनी सादर केलेले भारूड सामाजिक संपर्क माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे.
****
लातूर शहरात काल दिवसाभरात ५०४ वाहनधारकांकडून तब्बल एक लाख ८१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. संचारबंदीचे नियम न पाळल्यामुळे ४० दुचाकी  आणि चार चाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत. पोलिस उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी ही माहिती दिली. विनापरवाना दुकाने उघडलेल्या अशा सहा दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या अल्प मुदतीचं पीक कर्ज आणि त्वरित परतफेड प्रोत्साहन लाभाची मुदत येत्या ३१ मे पर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक शेतकरी लॉकडाऊन मुळे परतफेडीसाठी बँकामध्ये येवू शकत नसल्यामुळे बँकांनी परतफेडीवर कोणतही विलंब शुल्क आकारू नये असंही बँकेनं म्हटलं आहे.यासोबतच कोणत्याही प्रकारच्या कर्जावरही शुल्क न लावण्याबाबतही बँकेनं सूचित केलं आहे.
****
शहरी क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी राहत असलेल्या व्यक्ती, प्रीपेड मोबाईल रिचार्ज केंद्र तसंच अन्नधान्याशी संबधित प्रक्रिया केंद्रांना लॉकडाऊन मधून सूट देण्यात आली असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. गृहमंत्रालयानं या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. यात ब्रेड उत्पादन करणाऱ्या कंपन्या, दुग्ध प्रक्रिया संयंत्र, पीठं आणि डाळ मिल यांचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्ह्टल आहे.
****
सहकारी संस्थांच्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने वार्षिक अहवाल पाठवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता अहवाल छपाईच्या अडचणी आणि खर्चाला फाटा देण्यासाठी ही मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं. या मागणीला थोरात यांनी अनुकूलता दर्शवल्याचं, देशमुख यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जागतिक वसुंधरा दिन आज पाळला जात आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालनपोषण आणि कनवाळूपणाबद्दल पृथ्वीचे आभार मानले आहेत. यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी पृथ्वीला अधिक स्वच्छ, अधिक निरोगी आणि अधिक समृद्ध करण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. कोविड १९ चा पराभव करण्यासाठी भरभरून योगदान देत असलेल्या सर्वांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे.
*****

No comments: