Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९
एप्रिल
२०२० दुपारी १.०० वा.
****
प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं
आज सकाळी मुंबईत निधन झालं, ते ५४ वर्षांचे होते. दूरदर्शनवरील विविध मालिकांसह अनेक
हिंदी इंग्रजी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारलेले इरफान खान यांना, पानसिंग
तोमर या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
२०१८ साली कर्करोगावर उपचारासाठी ते विदेशात रवाना झाले होते, उपचारानंतर भारतात परतल्यावर
प्रदर्शित झालेला अंग्रेजी मिडियम हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. काल प्रकृती बिघडल्यानं,
त्यांना मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांचं
निधन झालं.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी
इरफान खान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. एका हरहुन्नरी कलाकाराला आपण मुकलो,
असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
देशभरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३१
हजार ३३२ झाली आहे. यापैकी २२ हजार ६२९ रुग्ण
सध्या देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, ७ हजार ६९५ रुग्ण उपचारानंतर
पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एक हजार सात जणांचा आतापर्यंत या आजाराने मृत्यू
झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे. काल संध्याकाळपासून देशभरात ७० रुग्णांचा मृत्यू झाला, यामध्ये महाराष्ट्रातल्या
सर्वाधिक ३१ मृतांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातील ग्रामीण भाग पुढचे दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस
अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत. ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक
सेवा वगळता कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या
नागरिकांवर कडक कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू
नये यासाठी रस्त्यावर न येता, पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक
मोक्षदा पाटील यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज आणखी दोन नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
त्यापैकी एक विशेष राखीव पोलिस दलाचा जवान असून, दुसरा रुग्ण बार्शी इथून आलेला आणि वसमत इथं विलगीकरण कक्षात असलेला २१ वर्षीय तरुण आहे. आज सकाळी या
दोघांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे आता जिल्ह्यात
कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन मे पर्यंत जिल्हातली सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
धुळे इथल्या भाऊसाहेब
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात दाखल साक्री इथल्या ८०
वर्षीय वृद्धाचं आज पहाटे निधन झालं. त्यांचा कोरोना विषाणू चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह
आला होता. या व्यक्तीला हृदय विकाराचाही त्रास होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
****
नवी मुंबई इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या धान्य
बाजारामध्ये आज कोरोना विषाणूची बाधा झालेले
चार रूग्ण आढळून आलेत. यापैकी ३ जण नवी मुंबईत तर एक मुंबईत राहणारी व्यक्ती आहे. या
भागात एकूण १० जणांना
आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं हा भाग प्रतिबंधित केला आहे.
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंत्रालय
आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतल्या कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी, मंत्रालयाचं कामकाज आज आणि उद्या बंद राहणार आहे, सामान्य
प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही
माहिती दिली आहे. केंद्र शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक
ठिकाणं तसंच कार्यालयांच्या
निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीर इथल्या
शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी
मारले गेले. शोपिया जिल्ह्यातल्या मेलाहोरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर,
सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरु केली होती. त्यावेळी झालेल्या कारवाईत हे दोन दहशतवादी
मारले गेले, या कारवाई दरम्यान, एका महिलेसह तीन नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी
रुग्णालयात दाखलं करण्यात आलं असल्याचं, सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment