Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल
२०२० दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं आजपासून महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतली दुकानं सुरू
ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, जोपर्यंत याबाबत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई
महापालिकेकडून स्पष्ट निर्देश येत नाहीत, तोपर्यंत दुकानं उघडली जाणार नसल्याची भूमिका
मुंबईतल्या दुकानदारांनी घेतली आहे. याबाबत किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेनं
स्थानिक प्रशासनाकडून स्पष्टता येईपर्यंत दुकानं
उघडण्याची घाई करू नये, असं आवाहन सदस्यांना केलं
आहे. पन्नास टक्के मनुष्यबळ, शारीरिक अंतराचं पालन, मास्क आणि हात मोज्यांचा
वापर अशा अटींसह महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात निवासी भागातील दुकानं
उघडी ठेवण्याची मुभा केंद्र सरकारनं दिली आहे.
****
बँक उद्योग येत्या
२१ ऑक्टोबर पर्यंत सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून गणला जाईल आणि त्याला औद्योगिक
विवाद कायद्यातल्या तरतुदी लागू होतील अशी घोषणा श्रम मंत्रालयानं केली आहे. बँक क्षेत्राला हा कायदा २१ एप्रिल पासून लागू झाला असून, यामुळे बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना २१ ऑक्टोबर पर्यंत
कुठल्याही प्रकारचा संप करता येणार नाही. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं हा निर्णय एका
अधिसूचनेद्वारे जारी केला असल्याची माहिती, वित्त विभागानं एका परिपत्रकाद्वारे दिली
आहे. आर्थिक घडामोडींवर कोरोना विषाणूउद्रेकाचा होत असलेला गंभीर
परिणाम लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आली आहे.
****
भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय कोठारी
यांची आज मुख्य दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांचे सचिव म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपतींनी त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित
कार्यक्रमात पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू
आणि अन्य मान्यवर या समारंभात सहभागी झाले. या समारंभादरम्यान सुरक्षित सामाजिक अंतराचं
काटेकोर पालन करण्यात आलं.
****
पालघर जिल्ह्यात
दररोज कोरोना
विषाणू बाधीतांची
संख्या वाढत आहे. जिल्ह्यातल्या कोरोना बाधीतांची संख्या १२३ वर पोहचली आहे. यातील नऊ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यु झाला
आहे.
****
अमरावती इथं आतापर्यंत सोळा
कोरोना विषाणूग्रस्त आढळले असून
त्यपैकी पाच
जणांचा मृत्यु झाला आहे. तर उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ४ जणांना
घरी सोडण्यात आलं आहे. ७ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
नंदुरबार जिल्ह्यात
आज आणखीन एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्यानं आता कोरोना विषाणू
बाधीत रुग्णांची संख्या आठ वर पोहचली
आहे. आज कोरोना विषाणू ग्रस्त
म्हणून अहवाल आलेला २३ वर्षीय युवक, परवा कोरोना विषाणूमुळे मृत्यु पावलेल्याच्या संपर्कात
आलेला होता. त्यामुळं त्याला विलगीकरण करुन त्याचे
नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
****
सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या
५ जणांचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक
आल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात या विषाणूचे १९ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत तीन
रुग़्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं असून दोघांचा
मृत्यू झाला आहे.
****
धुळे इथल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं
स्पष्ट झालं आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि
सर्वोपचार रुग्णालयात काल घेण्यात आलेल्या साक्री इथल्या
दोन रुग्णांच्या लाळेच्या
नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. अन्य
२८ रुग्णांचे अहवाल नकारात्मक
आहेत. धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधीतांची संख्या एकवीस असल्याचं प्रशासनानं म्हटलं
आहे.
****
परभणीत दोन दिवसांच्या संचारबंदीनतर आज सकाळी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजार पेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. किराणा तसंच भाजीपाला
घेण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. या काळात परभणी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरक्षित
सामाजिक अंतर राखण्यातं आलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूरच्या सतरंजीपुरा
इथून वर्धा इथं रुग्णवाहिकेत आलेल्या एका महिलेविरुद्ध साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता ही महिला वर्धा इथल्या
तिच्या नातेवाईकांकडे जाऊन रुग्णवाहिकेतून परतली होती.
या महिलेसह तिचे नातेवाईक, रुग्णवाहिका मालक तसंच चालकाविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment