Thursday, 23 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23.04.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २३ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय पंचायती राज दिवस उद्या शुक्रवारी पाळला जाणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आपापल्या विकास योजना तयार करणं तसंच त्या कार्यान्वीत करणं शक्य होणार आहे. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत. कोविड १९ च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक आहे.
****
औरंगाबाद इथं आज आणखी दोन महिलांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळलं आहे. शहरातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता चाळीस झाली आहे. आतापर्यंत शहरात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, शहरातले १५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मालेगावची रुग्ण संख्या एकशे एक वर पोहोचली आहे. त्यामुळे मालेगाव हा शंभरी पार करणारा राज्यातला पहिला तालुका ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातली  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ११५ वर पोहोचली आहे.
****
धुळे जिल्ह्यातही सात नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. या नवीन सात रुग्णांपैकी सहा रुग्ण धुळे शहरातले तर एक रुग्ण शिरपूर इथला असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यात शेंबोली इथल्या बंधाऱ्याची खोली आणि रूंदी वाढवण्याच्या कामाला काल पासून सुरुवात झाली आहे. हे जलसंवर्धनाचं काम १०० टक्के लोक सहभागातून करण्यात येत असल्याची माहिती जलनायक बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर यांनी दिली आहे.
****


No comments: