Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
** अनावश्यक गर्दी वाढल्यानं मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे परिसरात विविध उद्योग व्यवसायांना टाळेबंदीमधून दिलेली सवलत रद्द;
** मुंबई - पुण्यात
टाळेबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी
आवश्यक- शरद पवार
** राज्यात आणखी ५५२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; २० जणांचा मृत्यू
** हिंगोलीतल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा जवानही बाधित
** औरंगाबाद शहरात आजपासून संचारबंदीची कालावधीत वाढ
** आणि
** जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, सहकार चळवळीतले ज्येष्ठ पदाधिकारी भुजंगराव गोरे यांचं निधन
****
राज्यात विविध उद्योग व्यवसायांना टाळेबंदीमधून सशर्त सवलत
दिल्यानंतरही अनावश्यक गर्दी वाढत असल्यानं मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे
परिसरातली सवलत रद्द करण्याचे आदेश राज्य
सरकारनं दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता पूर्वीप्रमाणेच सक्तीनं टाळेबंदीची अंमलबजावणी केली जाईल. ई-कॉमर्स कंपन्यांनाही केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येणार आहे.
मात्र, त्यासाठी आवश्यक परवानग्या
बंधनकारक असणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबतचे सुधारणा आदेश
जारी केले आहेत.
मुंबई आणि पुणे वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांचे वितरण
करायलाही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं राज्यात
इतरत्र वृत्तपत्रांचे वितरण सुरू करता येणार आहे.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या
संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे
शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला आहे. राज्यातल्याही सुमारे ६४ टक्के रुग्णांमध्ये चाचणी पूर्वी या
आजाराची कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी
केल्यावर हे रुग्ण आढळून आल्याची माहिती गंगाखेड़कर यांनी दिली. पुढचे दोन दिवस रॅपिड टेस्ट किट्सचा वापर करू नका अशा सूचना
सर्व राज्यांना दिल्याचे ते म्हणाले. या दोन दिवसात संस्थेचे सदस्य विविध ठिकाणी जाऊन या किट्सच्या चाचण्या घेतील आणि
त्यानंतर या किट्स वापरायच्या किंवा नाही यासंदर्भात माहिती देऊ असे ते म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची माहिती देण्यासाठी
सरकारनं दोन संकेतस्थळ तयार केले असून, त्यावर कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी लढणारे सव्वा कोटी कोविड वॉरियर्स तसंच देशभरातल्या
२०१ सरकारी रुग्णालयांची माहिती देण्यात आली आहे. आय जी ओ टी डॉट जीओव्ही डॉट इन, आणि
कोविड वॉरियर्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून ही माहिती घेता येईल.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातला मृतांचा आकडा चिंताजनक असून, हे प्रमाण शून्यावर आणण्याच्या आव्हानाला आपण सर्वांनी सामोरे
जायचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते
काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी बोलत होते. मुंबई आणि पुण्यात टाळेबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. डॉक्टर, पोलिस
आणि शासकीय यंत्रणेचा लोकांनी आदर राखावा, असं आवाहनही त्यांनी केलं. पालघर
जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत झालेल्या साधुंच्या मृत्यूचं प्रकरण निषेधार्ह आहे, या प्रकरणी सरकारने तातडीनं पावलं उचलली, मात्र असा प्रकार घडायला नको होता, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं. रमजानच्या काळात मुस्लिम नागरिकांनी घरातच राहावं, नमाज किंवा इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं.
****
परराज्यातल्या अडकलेल्या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठवण्यासाठी
विशेष रेल्वेची व्यवस्था करता येईल का याचा विचार केंद्र शासनानं करावा, अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. अतिरिक्त
केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचं केंद्रीय पथक राज्यात
आलं असून, मुख्यमंत्र्यांनी काल
दूरदृश्य संवाद प्रणलीच्या माध्यमातून पथकाशी संवाद साधला. एप्रिल अखेरपर्यंत
यासंदर्भातल्या मार्गदर्शन सूचना निश्चित कराव्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या पाच हजार २१८ झाली आहे. काल नवीन ५५२ रुग्ण
आढळले. या आजारानं काल २० जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये मुबंईतले १२, पुणे तीन, ठाणे
दोन, सांगली, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात एकूण मृतांचा आकडा २५१ वर गेला आहे. तर
आतापर्यंत राज्यात ७२२ जण या आजारातून बरे झाले असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
****
मराठवाड्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ५९ वर पोहोचली आहे. औरंगाबाद शहरात
काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली असल्याचं जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं. समता
नगर इथल्या १८ आणि २० वर्षीय दोन तरुणांना, तर बिस्मिल्ला कॉलनीतल्या ४० वर्षीय महिलेचा
करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर भीमनगर इथल्या ७६ वर्षीय महिलेचा शासकीय रुग्णालयात
उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर त्यांचा तपासणी अहवाल पॅझिटिव्ह
आल्यानं त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, असं स्पष्ट झालं. औरंगाबाद इथं मृतांची
संख्या चार झाली आहे.
हिंगोली इथल्या राज्य राखीव दलाच्या सहा जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हे जवान दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव
इथं बंदोबस्त करून परतले होते. या
जवानांच्या संपर्कातल्या इतर जवानांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, हिंगोली तालुक्यातल्या एकांबा
इथं २० दिवसांपूर्वी परतलेल्या एका व्यक्तीचा सारी या आजाराने मृत्यू झाला. या
व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, कुटुंबियांना विलगीकरणात ठेवलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रिवास यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्याच्या परतूरपासून जवळच असलेल्या शेलवडा इथल्या ४५ वर्षीय महिलेचा
अहवाल काल पॉझिटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण
कक्षात उपचार घेत असलेल्या २० कोरोना संशयित रुग्णांचे लाळेचे नमुने काल तपासणीसाठी
प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जिल्हा
रुग्णालयात सध्या चार न्युमोनियाग्रस्त आणि एका क्षयरोगग्रस्त रुग्णावर उपचार सुरू
असून, या सर्वांचा कोरोना विषाणू चाचणी
अहवाल नकारात्मक आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मध्ये काल आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं
समोर आलं. त्यामुळे मालेगाव मधल्या एकूण
रुग्णांचा आकडा ९४ झाला असून, नाशिक
जिल्ह्यात ही संख्या १०८ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेचा महिला
आणि बालविकास विभाग ग्रामीण भागातल्या गरोदर, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्ष आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातल्या मुलांच्या
पालकांचे वेगवेगळे व्हॉट्सअॅप समूह बनवून त्यांना मार्गदर्शन करत आहे. तब्बल
सहा हजार व्हॉट्सअॅप समूहांच्या माध्यमातून नियमित समुपदेशनासह कोरोनाविषयक जनजागृती
केल्या जात आहे. या अभिनव उपक्रमाविषयी महिला
आणि बालविकास विभागाचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी माहिती दिली. ते म्हणाले….
तीन ते
सहा वर्षांच्या मुलांसाठी शिक्षणाअंतर्गत कृती, संवादातून खेळ व्हिडिओ पाठवले जातात
त्याच बरोबर कशा पद्धतीने शिक्षण द्यायचं त्याची माहिती दिली जाते आरोग्यविषयक सल्ले
देखील दिले जातात. नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मेसेजेस पाठवले जातात त्याचबरोबर
जे कुपोषित बालक त्या कुपोषित बालकांना खाऊ घालने. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून
संदेश दिले जात आहेत आणि या माध्यमातून खरच लाभार्थ्यांचा चांगला सहभाग दिसत आहे.
****
टाळेबंदी नियमभंग प्रकरणी राज्यभरात ६० हजाराहून अधिक गुन्हे दाखल करण्यात
आले असून, १३ हजार ३८१ जणांना पोलिसांनी
अटक केली आहे. यामध्ये पोलिसांना मारहाणीच्या
१२१ गुन्ह्यांचा समावेश असून, ४११
जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या
महिनाभरात झालेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन कोटी तीस लाख रुपये दंडही वसूल
केला असून, ४१ हजार ७६९ वाहनं जप्त केली
असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात अकरा पोलिस अधिकाऱ्यांसह
४९ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे, या पोलिसांना वैद्यकीय उपचार घेता यावेत, यासाठी एक लाख रुपये अग्रीम वेतन देण्याचा निर्णय पोलिस विभागानं
घेतला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवकुमार
सिंघल यांनी याबाबतचा आदेश जारी केला असल्याचं वृत्त, पीटीआयनं दिलं आहे.
****
नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचं काटेकोर पालन केलं, त्याचं यश म्हणूनच नांदेड जिल्हा अद्याप कोरोना विषाणू
संसर्गापासून मुक्त असल्याचं, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल बोलत होते. प्रशासनाने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या, तसंच समाजिक संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या
कामाचाही चव्हाण यांनी उल्लेख केला.
*****
जालना शहरात विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी औरंगाबादहून दररोज ये-जा करतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा हा कोरोना विषाणू
बाधित रुग्णांच्या रेड
झोनमध्ये असल्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याच मार्गावरून जालना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये, असे आदेश जालन्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विशेषत: बदनापूर
हद्दीतील वरुडी नाक्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
ओळखपत्र किंवा पास दाखवल्यानंतरही त्यांना प्रवेश देऊ नये, असं चैतन्य यांनी सांगितलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यानं संचारबंदीच्या कालावधीत वाढ
करण्यात आली आहे. आजपासून दुपारी एक ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे
आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केले आहेत.
दरम्यान, काल औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.
****
हिंगोली शहरातल्या नगरपालिका मदत केंद्राच्या वतीनं शहरातल्या अत्यंत गरजू अशा
९४७ कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल
साहित्याच्या किटचं वाटप घरपोच करण्यात आलं. नगरपालिका मदत केंद्रात शहरातल्या दानशूर व्यक्ती, संस्थांनी दिलेल्या देणगीतून ही मदत वाटप केल्याचं नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास
पाटील यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात
मोफत तांदूळ वाटपास प्रारंभ झाला असून प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ देण्यात येत
आहेत. जिल्ह्यात
आतापर्यंत एक लाख ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे
वाटप पूर्ण झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
****
लातूरच्या गरजू, मजूर, कष्टकऱ्यांच्या दोन हजार कुटुंबांना नगरसेवक अजित पाटील कव्हेकर
यांनी स्वखर्चानं धान्य वाटप केलं आहे. ज्या केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांनी किराणा दुकानामार्फत धान्य घेतलं आहे, अशा परिवारांनी हे धान्य न स्वीकारता, ज्यांची हलाखीची परिस्थिती आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहचवण्यामध्ये
मदत करावी, असं आवाहन कव्हेकर यांनी केलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष गुलाब
शिंदे यांच्याकडून गरजु लोकांना शिवभोजन थाळी दररोज वाटप करण्यात येत आहे.
****
नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनं मराठवाड्यातल्या बाराशे शिकलकरी
समाजातल्या कुटूंबांना धान्याचं किट वाटप करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं काल तहसीलदार गणेश माळी आणि पत्रकार
संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते २९ वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक
वस्तुंच्या किटचं वाटप करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या
रक्तपेढीत नवयुवक गणेश मंडळ तसंच नगरसेवक मनोज लखेरा मित्र मंडळाच्या वतीनं रक्तदान
शिबीर घेण्यात आलं. या
शिबिरात एकूण ३५ रक्त दात्यांनी रक्तदान केलं.
****
टाळेबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मराठवाड्यात स्थानिक
प्रशासनाच्यावतीनं अनेक उपायांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं कांही नियमावाली तयार करुन कालपासून बाजार समितीत बाजार भरवायला सुरुवात
केली आहे. एका दिवशी फक्त पन्नास वाहनं, एकाच वाणाची खरेदी विक्री, आणि एका वाहनात एकच चालक आणि एकाच शेतकऱ्याला बाजार समितीच्या आवारात येण्याची
परवानगी, या मुद्यांचा या नियमावलीत समावेश
आहे. नियम पाळून बाजार समिती सुरु
ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीला सहकार्य करण्याच आवाहन बाजार समितीचे सभापती
ललित शहा यांनी केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं
खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीच्या आदेशांना ३ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितलं. सदर आदेशाचं पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसंच भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असं पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलं आहे.
****
हिंगोली शहरातल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीनं
केवळ चार मुख्य रस्ते आणि १८ उपरस्ते रहदारीसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. बाकी सर्व रस्ते रहदारीसाठी बंद करण्यात आले असून, यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या नांदापूर शाखेत नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी सामाजिक अंतर पाळलं गेलं नसल्याचं दिसून आलं.
****
जालना जिल्ह्यात टाळेबंदीच्या
काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सहा परमीट रुम आणि दोन देशी मद्य विक्री दुकानांचे
परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केले आहेत. शिवाय अवैध मद्य विक्री प्रकरणी ६० गुन्हे नोंदवण्यात आले असून, जिल्हाभरात केलेल्या कारवायांमध्ये १० लाख ५४ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला असल्याचं या विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितलं.
दरम्यान, जालना शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या
१४ नागरिकांवर काल नगरपालिकेच्या पथकानं कारवाई करत साठे आठ हजार रुपयांचा दंड वसूल
केला.
****
टाळेबांदीच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अठरा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक
ठिकाणी थुंकणाऱ्या २५८ जणांवर कारवाई करत, ५१ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल १४२ जणांविरूद्ध कारवाई करून ६७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात
आला आहे, तर सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये
सुरक्षित अंतर न राखणं, किराणा, भाजी तसंच जीवनावश्यक वस्तू विक्री दुकान चालकांविरुद्ध कारवाई करून
अकरा हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.
****
जालना शहरासह तालुक्याच्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतल्या
दूध, भाजीपाला, फळे, किराणा, पेट्रोलपंप, घरगुती
वापराचा गॅस आणि औषधी दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी
रवींद्र बिनवडे यांनी परवानगी दिली आहे. या शिवाय अन्य सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात
मुक्या प्राण्यांना अन्न मिळणं अवघड झालं आहे. अशा दयनीय अवस्थेत परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या श्री व्यकंटेश्वर प्रतिष्ठानच्या
वतीनं जनावरांना चारा आणि अन्न धान्य खाऊ घालण्याचा एक अनोखा संकल्प करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..
शहरातील
भिकारी अन्नापासून वंचित राहू नये म्हणुन व्यकंटेश्वर प्रतिष्ठानच्या युवकांनी पुढाकार
घेतला त्यातूनच मुक्या जनावरांना चारा – पाणी देण्यास सुरवात केली यासाठी शहरातील वेगवेगळ्या
भागातील युवकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले गेल्या चार दिवसापासून कुत्रा, गाय,
म्हैस अशा सर्व मुक्या प्राण्यांना चारापाणी देण्यात येत आहे व्यकंटेश्वर प्रतिष्ठानच्या युवकांचा प्रयत्न
इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीमध्ये शेतमालाची वाहतूक करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. मात्र शेतमालाची काढणी आणि पॅकिंग करणाऱ्या मजुरांना कामावर
येण्यास अडचणी येत असल्यानं शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होत आहे. या मजुरांना ओळखपत्र देऊन शेतकऱ्यांची आर्थिक हानी टाळावी अशी
मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी
जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे केली आहे .
****
जालना शहरात टाळेबंदीच्या
काळात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे
विकता यावीत, तसंच ग्राहकांना ती योग्य दरात
घरपोच उपलब्ध व्हावी, यासाठी
जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पासह कृषी विज्ञान केंद्रानं शेतकरी ते ग्राहक
अशी साखळी तयार केली आहे. या
माध्यमातून भाजीपाला शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून दिला जात असून, आजपर्यंत दोन हजार ८७५ क्विंटल मालाची थेट विक्री झाल्याचं आत्माचे
प्रकल्प संचालक विजय माईनकर यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातले काही उद्योग, आस्थापना
आवश्यक ती काळजी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काल जारी
केले. कृषि निविष्ठा केंद्रं, कृषि विषयक साहित्य, साधनसामुग्रीची दुकानं, बीज
प्रक्रिया केंद्रं, बीज
तपासणी प्रयोगशाळा आणि कृषि विषयक उत्पादनं, सेवा, कृषि साहित्य दुरुस्त करणाऱ्या सर्व आस्थापना, बोअर मशीनची कामं पूर्ववत सुरु राहतील. प्रसारमाध्यमांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमं, ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी
वाहनं, सुरु करण्यात येणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्याअंतर्गत १०१ ग्रामपंचायतींमध्ये काल
एकाच वेळी फवारणी आणि नालेसफाई करण्यात आली. यावेळी आपत्कालीन सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी आणि आशा कर्मचारी यांना जिल्हा
परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात
आले.
****
परभणी महानगर पालिकेच्या वतीनं शहरात कोरोना विषाणू रुग्ण सापडलेल्या परिसरात काल
औषध फवारणी करण्यात आली.
****
या आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजानच्या
महिन्यात मुस्लिम बांधवांनी टाळेबंदीच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावेत आणि प्रशासनाला
सहकार्य करावं, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.
****
लातूर इथल्या पोद्दार रुग्णालयामध्ये रूग्णांना मोफत कोरोना कीट वितरणाचा शुभारंभ
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या हस्ते काल झाला. या कीटमध्ये सॅनिटायझर, मास्क, साबण आणि कोरोना विषाणू विषयक माहितीपत्रकाचा समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं अडकलेले चंद्रपूर जिल्ह्यातले २७ ऊसतोड कामगार
काल त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. सोनपेठ
इथल्या वैद्यकीय निवारागृहात त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. या कमगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन त्यांना रवाना करण्यात
आलं.
****
लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयानं देशभरातल्या स्वायत्त शैक्षणिक संस्था आणि
महाविद्यालयांमध्ये ९२ वा नंबर मिळवला आहे. दिल्लीच्या सेंटर फॉर फोरकास्टींग अँड रिसर्च या संस्थेतर्फे देशभरातील स्वायत्त
महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेचे २०२०-२१ साठी मानांकन जाहीर करण्यात आले. असं मानांकन मिळवणारं मराठवाड्यातलं हे एकमेव महाविद्यालय
असून राज्यात या महाविद्यालयाला २९ वा क्रमांक मिळाला आहे.
****
जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, सहकार चळवळीतले ज्येष्ठ पदाधिकारी भुजंगराव गोरे यांचं काल दुपारी निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. मंठा
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य, मुंबई पणन महासंघाचे
संचालक, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचलाक म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांच्या पार्थिव देहावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी कोषाध्यक्ष आणि तरवडीच्या दीनमित्र विश्वस्त मंडळाचे संचालक नारायण धोंडिराम
शिंत्रे यांचं सोमवारी औरंगाबाद इथं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. शिंत्रे
यांच्या अंतिम इच्छेनुसार औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या - घाटी रुग्णालयात त्यांचा पार्थिव देह दान करण्यात आला. त्यांच्या निधनाबद्दल सत्यशोधक समाजाच्या सर्व माजी
पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी
त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत
पाचशे घरकुल मंजूर झाले असून या घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या गजाळी आणि सिमेंट
दुप्पट किमतीने व्यापारी विकत आहे. अशा
व्यापाऱ्यांविरूध्द चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्धापूर शहर
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विलास साबळे यांनी अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
केली आहे.
****
पालघर जिल्ह्यात साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावानं केलेल्या हत्येचा भारतीय
जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं काल निषेध करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत
कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींविरुद्ध
कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिलं आहे.
उस्मानाबाद इथंही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींविरुध्द् कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुजितसिंह
ठाकूर यांनी यावेळी केली.
परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला.
****
शासकीय वाहनामध्ये साडे सहा लाख रुपयांसह महागड्या मद्याच्या दोन बाटल्या सापडल्याप्रकरणी
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांना निलंबित करण्यात आलं आहे. फौजदारी प्रक्रियेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. गिते यांच्या जागी डॉ. डी बी घोलप यांच्याकडे आरोग्य अधिकारपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. आरोग्य विभागानं काल यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं.
****
No comments:
Post a Comment