Thursday, 23 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23.04.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रत्येक कुटुंबाला किमान साडे सात हजार रुपये आणि विस्थापित कामगारांना भोजन निवास आणि आर्थिक सुरक्षा मिळणं आवश्यक असल्याचं, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज काँग्रेस कार्यकारी समितीच्या दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्या. कोरोनो विषाणू संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याची टीका गांधी यांनी केली. सध्या या चाचणी साहित्य संचाचा तुटवडा भासत असून, प्राप्त होणाऱ्या चाचणी संचांची गुणवत्ताही सुमार दर्जाची असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात बारा कोटी रोजगार संपुष्टात आले असून, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं, बेरोजगारी वाढण्याची भीती गांधी यांनी वर्तवली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले. कोविड - १९ चा सामना करण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन यशस्वी ठरले आहे का ? याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा असं, मनमोहन सिंग यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत. कोविड - १९ च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक आहे.
****
केंद्रीय महिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनांचा निषेध केला आहे. अशी घटना लोकशाहीच्या मुक्त विचारधारेला विरोधक ठरत असल्याचं, जावडेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल रात्री एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, हल्लेखोरांना योग्य शिक्षा होईल, असं जावडेकर यांनी सांगितलं आहे.
****
गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेले एक हजार चारशे नऊ नवीन रूग्ण सापडले आहेत. यामुळे देशात एकूण रुग्णांची संख्या एकवीस हजार तीनशे त्र्याण्णव झाली आहे. यापैकी चार हजार दोनशे अठ्ठावन्न रूग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सहाशे एक्यांऐशी जणांचा मृत्यू झाला आहे.
****
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं काढलेल्या साथरोग नियंत्रण कायद्यातल्या सुधारणा अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. या अध्यादेशात अशा अपराधासाठी आर्थिक दंड तसंच कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्य कर्मचऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं, भारतीय वैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ राजन शर्मा यांनी स्वागत केलं आहे.
****
औरंगाबाद इथे संचारबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनापरवाना दुकान उघडून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोन दुकानदाराविरोधात तर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल एका दुकानदारावर कारवाई करण्यात आली. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एका महिलेच्या अंत्यविधीला परवानगीशिवाय वीस पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्याबद्दल सुमारे पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्री पासून लागू करण्यात आलेल्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहाटे पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्यानं, रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनेक नागरिक तसंच संस्था मदत देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरूम इथल्या माऊली सहकारी नागरी पतसंस्थेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकवीस हजार रूपयांची मदत दिली. 
****
पालघर इथं झालेल्या तिहेरी हत्यांकांड प्रकरणाची चौकशी सी आय डी- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू असुन यांच्या पथकानं घटनास्थळाची आज पाहणी केली. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे.
दरम्यान, गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी पोलीस संरक्षणांची मागणी केली आहे.
****


No comments: