Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८
एप्रिल
२०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
गहू खरेदी करण्याची प्रक्रियेनं गती घेतली असल्याची माहिती अन्न धान्य मंडळानं दिली
आहे. परवापर्यंत ८८ लाख ६१ हजार मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे. ग्राहक व्यवहार
खात्याच्या मंत्रालयाला या हंगामात चारशे लाख मेट्रिक टन गव्हाच्या खरेदीचं उद्दिष्ट
पूर्ण होणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी
प्रयत्न केले जात असून अन्न धान्याचा मुबलक साठा रहावा यासाठी सर्वतोपरी व्यवस्था केली
असल्याचं अन्न धान्य मंडळानं म्हटलं आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावी वर्गांच्या राहिलेल्या परीक्षा
टाळेबंदीनंतर घेणार आहे. टाळेबंदी पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य
झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करेल असं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश
पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे त्यांनी ही माहिती
दिली आहे. विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यास करण्याची सक्ती न करण्याचं आणि त्यांना आपल्या
इच्छेनुसार अभ्यास करू देण्याचा सल्लाही मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी पालकांना दिला
आहे.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ
- सीबीडीटीनं महसूल सेवेतल्या तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करून त्यांना
त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यातून मुक्त केलं आहे. या अधिकाऱ्यांनी करा संबंधी गोपनीय
माहिती सार्वजनिक केली आणि ती प्रसार माध्यमात प्रसारित झाल्यानं ही कारवाई करण्यात
आली आहे. करवृद्धी, संपत्ती कर, उत्तराधिकार कर आणि कोविड -१९ उपकर लागू करण्यासंदर्भातली
ही माहिती होती.
****
कोल्हापूर जिल्ह्यातील १६२
कारखाने आजपासून सुरू झाले आहेत आणि त्यातून पाच हजार कामगारांच्या हाताला पुन्हा काम
मिळालं आहे. जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तू निर्मितीचे हे कारखाने आहेत यातून उत्पादित
झालेला माल इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी २४० मालवाहू वाहनांना प्रशासनानं परवानगी दिली
आहे. देशव्यापी संचारबंदीमुळे गेले दीड महिना कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे बंद
आहेत पण चार दिवसापूर्वी शासनानं काही अटी आणि शर्तींना अधीन राहून उद्योगधंदे सुरू
करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाकडे कोल्हापूरच्या एक
हजार २६४ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू करण्याची परवानगी मागितली होती.
****
औरंगाबादमधील कोरोना विषाणू बाधीतांची संख्या ९५
झाली आहे. आज सकाळी किलेअर्क परिसरात बारा आणि भिमनगर- भावसिंगपुरा भागात एक नवा रुग्ण
आढळला आहे. या रुग्णांपैकी सहा रुग्ण सोळा वर्षे वयोगटातील मुलं आहेत तर सात रुग्ण
चव्वेचाळीस वर्षे वयोगटातील असून यात चार महिला असल्याचं समोर आलं आहे.
****
मुंबई पोलिसांमधील पंचावन्न
वर्षांवरील वयोगटातल्या आणि आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ
नये यासाठी रजेवर जायला सांगण्यात आलं आहे. तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा या
विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या वयामुळे या पोलिस
कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा
धोका अधिक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात
आतापर्यंत वीस अधिकाऱ्यांसह १०७ पोलिस कर्मचाऱ्यांना याची लागण झाली असून यात बहुतांश
मुंबईतील आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं आज कोरोना विषाणूचे
आणखी ३६ रुग्ण आढळले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता १८१ झाली असल्याचं
आणि यात मालेगांवमधील रुग्ण संख्या १५९ असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं.
आज जे रुग्ण आढळले आहेत त्यात काही यापुर्वीचे संशयित असून या सर्वांची पुन्हा तपासणी
करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मालेगांव इथं या विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात आता पर्यंत
नऊ रुग्ण बरे झाले आहेत त्यात मालेगावच्या सात जणांचा समावेश आहे. निफाड आणि चांदवड
या अन्य दोन तालुक्यातील दोन आणि नाशिक शहरातील तीन बाधित पूर्ण पणे बरे झाले आहेत.
मालेगाव इथं या विषाणूमुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या फलटण
तालुक्यात कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला असून तो गेल्या पंचवीस तारखेला पुण्याहून
फलटणला आला होता. हा २८ वर्षीय युवक घरी न जाता स्वतःहून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात
दाखल झाला होता. ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू
लागल्यानं त्याला सातारच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सातारा जिल्ह्यात
आता याची लागण झालेल्यांची संख्या ३६ झाली आहे.
****
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधे गेल्या तीन दिवसांत पुणे, मुंबई
इथून ५१३ मजूर आपल्या गावी परतले असून, त्यांना स्वगृही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
दोघां संशयितांना वाशिम इथं शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहीती तालुका
आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment