Thursday, 23 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.04.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****

Ø देशातल्या ७८ जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसांपासून नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण नाही
Ø लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात बेकरी, पीठ गिरण्यांसह अनेक उद्योगांना सूट; शालेय पुस्तकांची दुकानं सुरू करण्यास परवानगी
Ø पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार
आणि
Ø लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न असलेल्या गरजूंसाठी समाजातून मदतीचा ओघ सुरू  
****

 देशातल्या ७८ जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसांपासून एकही नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आज दुपारी संपलेल्या २४ तासांत देशभरात एक हजार ४०९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, देशभरातली कोविड रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ३९३ झाली आहे. यापैकी चार हजार २५८ रुग्ण बरे झाले असून, ६८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात १६ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं, अग्रवाल यांनी सांगितलं. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण १९ पूर्णांक ८९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.

 दरम्यान, लॉकडाऊनला आज एक महिना पूर्ण झाला. या दरम्यान स्थिती नियंत्रणात असून कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण स्थिर असल्याचं सचिव सी के मिश्रा यांनी यावेळी सांगितलं. महिनाभरात विशेष कोविड उपचार रुग्णालयांची संख्या साडे तीन पटीने वाढली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक उद्योगांना सूट देण्यात आली असून, यामध्ये बेकरी, पीठ गिरण्या, मधमाशा पालन, वीट भट्ट्या आदीचा समावेश असल्याचं गृहविभागाच्या सचिवांनी सांगितलं. शालेय पुस्तकांची दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरवणाऱ्यांनाही लॉकडाऊनच्या नियमातून सूट देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****

 केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ स्थगित केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी तसंच निवृत्तीवेतनधारकांना जानेवारी २०२० पासून देय असलेली महागाई भत्त्याची रक्कम अदा केली जाणार नाही. जुलै २०२० तसंच जानेवारी २०२१ पासूनही देय असलेली महागाई भत्त्याची वाढीव रक्कम मिळणार नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र जुलै २०२१ मध्ये देय असलेली महागाई भत्त्याची वाढ देण्याबाबत निर्णय घेताना, जानेवारी २०२० पासून तीन वेळा अपेक्षित असलेला वाढीव दर दिला जाणार आहेत. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे.

 दरम्यान, पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत. कोविड 19 च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक आहे.

 पंतप्रधान येत्या रविवारी २६ तारखेला मन की बात या आकाशवाणी वरच्या कार्यक्रम मालिकेतून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६४ वा भाग असेल
****

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीन दयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या वतीनं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र आणि स्वयंचलित सॅनिटायझर बुथ तयार करण्यात आलं आहे. या यंत्राला हात न लावता सॅनिटायझर वापरता येणार आहे. कन्नड तालुक्यातली सहा गावं या कौशल्य केंद्राच्या वतीनं दत्तक घेवून त्याठिकाणी स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र बसवण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रमुख एम.डी शिरसाठ यांनी सांगितलं.

 विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार निधीतून अंतर्गत २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, याबाबतचं पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
****

 सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातून जालना इथल्या दीडशे खाटांच्या कोरोना रुग्णालयासाठी पुण्याच्या कृष्णा डायग्नोस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्यावतीने सीएसआर फंडातून २० पोर्टेबल व्हेंटीलेटर आणि पाच हजार मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्रवण मुथा यांनी आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा गरजूंसाठी समाजातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे.
****

 नांदेड शहरातील वृतपत्र कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावतीनं अन्नधान्याच्या २०० किटच वितरण आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. नांदेड जिल्ह्य़ाच्या मुदखेड नगर परिषदेचे नगरसेवक संजय आऊलवार यांनी स्वत:च्या शेतातील धान्याचं आज गरजू लोकांना वाटप केलं. मुखेड शहरात फुलेनगर इथल्या सातशे कुटूंबाना नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य दशरथ लोहबंदे यांच्या वतीनं गहू-तांदुळ आदी धान्य आणि कापडी मास्कचं घरपोच वाटप करण्यात आलं.
****

 लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातले वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.राहुल आलापूरे यांनी त्यांची मुलगी 'कायरा' हिचा दुसरा वाढदिवस साजरा न करता, नगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात शेख गौस यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या 'रोटी-कपडा बँकेस' पाच हजार रुपये रकमेचा धनादेश दिला आहे. या रोटी- कपडा बँकेतून आजपर्यंत १७०० जणांची भोजनाची व्यवस्था तसेच मास्क आणि सॅनिटायझरचं मोफत वाटप करण्यात आलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ शहरातले नागरिक धोंडुलाल राठी यांनी त्यांच्या पत्नी शकुंतला राठी यांच्या निधनानंतर उत्तरक्रिया विधीचा खर्च टाळून एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला.

 हिंगोली नगरपालिका मदत संकलन केंद्रातून आज १६८ होमगार्डना जीवनावश्यक साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं. कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा इथं २०  तृतीयपंथीयांना जीवनावश्यक साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं.
****

 जालना जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसह गरजुंना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून तयार जेवणाची पाकिटं पुरवली जात आहेत. आजपर्यंत जवळपास दोन लाख ७८ हजार जेवणाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
****

 उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने माध्यान्ह भोजनासाठी आलेला तांदूळ सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून वाटप आदेश जिल्ह्यातील सर्व शाळांना दिले आहेत. जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या एक हजार ५१९ शाळांमधील एक लाख ६६ हजार ९८७ विद्यार्थ्यांना तांदळाचं वाटप केलं जात आहे. पालकांनी याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत.
****

 लातूर जिल्हयात चाकूर तालुक्यात हाळी खुर्द इथं जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार अॅन्टी कोरोना फोर्स ची स्थापना करण्यात आली आहे. यात पंचावन्न युवकांनी सहभाग घेतला आहे. ही योजना राबवणारी हाळी खुर्द ही जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

 दरम्यान, उदगीर इथं  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते गरजू  लोकांना धान्यवाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो मोफत तांदूळ  वाटप  करण्यात  आलं.
****

 जालना जिल्ह्यात परतूर इथं आज सकाळी झालेल्या एका अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला. एफ.वाय.सय्यद असं मृताचं नाव असून, ते मोहोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. परतूर इथल्या सरकारी रुग्णालयासमोरच्या पुलावर एका ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर फिरल्याने ट्रॅक्टरच्या मागे लावलेल्या नांगराचा फटका सय्यद यांच्या डोक्याला बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
****

 हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात २१ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या ३० वर्षीय व्यक्तीचा सारी या आजाराने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सदरील व्यक्ती हा मुंबई येथे कामाला होता. त्या व्यक्तीचा तसंच त्याच्या जवळच्या संपर्कातील दोन नातेवाईकांचे तपासणी अहवाल ‘निगेटीव्ह’ आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
*****
***

No comments: