Thursday, 23 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23.04.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२३ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
** साथ रोग प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामिन नाही; सात वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि पाच लारुपयांच्या दंडाची तरतूद
** स्थलांतरित कामगारांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी
** राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यूदर कमी होत असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा
** औरंगाबादमध्ये आणखी दोन तर नांदेड शहरात पहिला कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला
** राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं एप्रिल महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात
आणि
** पैठणच्या केमिकल कारखान्यात स्फोट तर लातूरमध्ये मध्यरात्री दोन दुकानांना आग
****
साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यानुसार कोविड १९ च्या साथीच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं अजामीनपात्र गुन्हा समजलं जाणार आहे. हे गुन्हे करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत तुरूंगवास तसंच पाच लाखा रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याप्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण केली जाणार असून, वर्षभरात शिक्षा सुनावली जाणार आहे. तसंच वाहन आणि रुग्णालयाचं नुकसान केल्यास बाजारभावाच्या दुप्पट दंड वसूल केला जाणार असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणी केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
तसंच डॉक्टर्स, परिचारिका तसंच आशा कार्यकर्त्यांना ५० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं यापूर्वीचं घेतला असल्याचं जावडेकर यांनी सांगितले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना कोविड १९ च्या रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. 
****
टाळेबंदीच्या काळात अनेक स्थलांतरित कामगार राज्यातल्या विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे. या नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. या नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्यानं त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नाही, मात्र राज्य सरकारकडून नियमित लाभार्थींना अन्नधान्याचं वाटप झाल्यानंतर राहिलेलं पाच टक्के धान्य या नागरिकांना देण्याची मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे पासवान यांच्याकडे केली आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यूदर कमी होत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सामाजिक माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला. कोरोना विषाणू संसर्गाचे राज्यात आता फक्त पाच हॉटस्पॉट असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले

आज मला आपल्या हे ही सांगता येईल की hotspot महाराष्ट्रात पूर्वी १४ आता होतीआपल्या hotspot पाच आलेले आहे झाले तर कदाचित आपण मालेगाव वर अधिक जास्त चांगला लक्ष देऊन करू शकलो आपल्या contented structures वापरून कंट्रोल करू शकतो तर चार वर जाईल अत्यंत आशेने एक सांगेल दररोज १३ %बरे होऊन घरी जात आहेत. मी पुन्हा सागेल की ८३ % लोक हे asymptomatic आहेत त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत.
****
राज्यात काल ४१३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या पाच हजार ६४९ झाली आहे. काल या आजारानं १८ जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण मृतांची संख्या १६९ झाली आहे. या आजारातून बरे होण्याचं प्रमाणही वाढत असून, काल ६७ रुग्णांना घरी सोडण्यास आलं. राज्यात आतापर्यंत ७८९ जण कोरोनामुक्त झाले असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं काल आणखी दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं, त्यामुळे औरंगाबाद इथं आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३८ झाली आहे, यापैकी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किराडपुरा इथल्या एका कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना काल सुट्टी देण्यात आली.
****
नांदेड शहरात काल पहिला कोरोना विषाणू बाधित सकारात्मक रूग्ण आढळून आला आहे. शहराच्या पीरबुऱ्हाणनगर भागात राहणारी ही ६४ वर्षे वयाची व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. हा परिसर सील करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथली ३९ वर्षीय महिला कोरोना विषाणू बाधित आढळून आल्यानंतर या महिलेच्या निकट संपर्कातील १९ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं असून, त्यांच्या घशातल्या स्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. बाधित महिला परतूर इथं वास्तव्यास असलेला परिसरही पोलिसांनी बंद  केला आहे.
****
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या ब्राह्मणे गावात कोरोना विषाणू रुग्ण आढळून आला आहे, त्यानंतर या गावातले सर्व व्यवहार पूर्ण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धुळे शहरातही कोरोना विषाणू बाधित रुग्णाची संख्या आठवर पोहोचली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३३ झाली आहे. जामखेड मध्ये काल दोन जणांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. 
****
नवी मुंबईतल्या एमआयडीसी महापे इथं असणाऱ्या एका आयटी कंपनीमधल्या १९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यातले सात जण नवी मुंबईत राहतात तर इतर जण ठाणे, मुंबई, सांगली, तेलंगणा, आंध्र प्रदेश इथले रहिवासी आहेत. या सर्वांवर महापालिकेच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही कंपनी सील करण्यात आली आहे. दरम्यान, कारखाना किंवा आस्थापनेमधले कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य शासनानं एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मालेगाव इथं आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या दहा झाली आहे नाशिक जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ११० झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील चौदा दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्याचा समावेश हरित क्षेत्रात झाला आहे. तसंच उमरगा उपजिल्हा रूग्णालयातून काल तीन रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. यापुढेही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पुरेशी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रयत्न करत असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या…

जिल्ह्यामध्ये कुठलेही जिल्हा अजून अधिक धोका वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत पोलीस प्रशासन आणि सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी मार्फत यांना दक्षता घेण्याची  काम सुरु आहे. या अनुषंगाने नगरपालिका मध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे करण्यात आलेला आहे. वार्डवाईज व्हायपरकेशन करुन door to door visit नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे  आआणि turban health मार्फत आरोग्याची तपासणी झाली आहे. जे गरीब कुटुंब आहेत आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांना जिल्हा प्रशासन आणि एनजीओ या दोन्हींची सांगड घालून प्रमाणावर सर्वांना kits देण्यात येतात.
****
टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं राज्यात सर्वच ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्याचं नियोजन केलं आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेनं शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी केलं आहे.
****
इलेक्ट्रॉनिक तसंच मुद्रीत माध्यमांच्या प्रतिनिधींनी वार्तांकन करताना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन माहिती प्रसारण मंत्रालयानं केलं आहे. देशाच्या काही भागात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. सर्व माध्यमगृहांनी आपल्या वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तसंच कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची सूचना माहिती प्रसारण मंत्रालयानं केली आहे.
****
पालघर जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून बोलत होते. मुलं पळवणारी टोळी असल्याचा गैरसमजाने ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आठ तासात एकशे एक लोकांना अटक करण्यात आली, यापैकी एकही व्यक्ती मुस्लिम नसल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे देण्यात आला असून, विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी तपास करत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
****
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं पूर्ण वेतन नेहमीच्या पद्धतीनं देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. गेल्या महिन्यात या कर्मचाऱ्यांचं वेतन दोन टप्प्यात करण्यात आलं आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या वेतनाचं वाटप करण्यासाठी नंतर आदेश दिले जाणार असल्याचं राज्य सरकारच्या अध्यादेशात सांगण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज, तरावीह पठण, इफ्तार, धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशवासियांची एकजूटच कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवून देईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
****
लातूर जिल्हा आतापर्यंत कोरोना विषाणूमुक्त राहीला असून, ग्रामीण भागात सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी आपापलं गाव सांभाळण्याचं आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. देशमुख यांनी काल जिल्ह्यातले सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसंच प्रमुख कार्यकर्त्यांशी फोनवरुन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. चोरुन येणाऱ्यांना गावात प्रवेश देऊ नये, अपरिहार्य कारणाशिवाय कोणालाही जिल्ह्याची सीमा ओलांडू किंवा जाऊ देऊ नये, आदी सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या. 
****
औरंगाबाद शहरात कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना शिवसेनेच्या वतीनं अन्नधान्य आणि किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्राद्वारे विलगीकरण कक्षात असलेल्या कुटूंबातल्या महिलांना शंभर आरोग्य किटचं वाटप करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या याच केंद्रा अंतर्गतच्या बचत गटातल्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया जमा करुन तीन हजार ५७० रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावं म्हणून ग्राहक संरक्षण आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ६० हजार मास्क आणि सोळाशे लिटर सॅनिटायझर पाठवलं आहे. हे साहित्य जिल्ह्याच्या सामुहिक दसरा महोत्सव समिती आणि छात्र फौंडेशनच्या सदस्यांना देण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत हे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर, चाकूर तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा तसंच टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्य वाटप झालं पाहिजे, असे निर्देश संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातल्या आरोग्यविषयक योजना, स्वस्त धान्य वाटप आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकानं नियमानुसार सुरु करावीत असं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्द इथल्या अंबरजना राजेंद्र कुंभार या शेतकरी महिलेनं कोरोना विषाणू ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दहा हजार रुपयांची मदत केली आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या शिर इथल्या सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकर बिराजदार यांनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त गावातल्या ३७० लाभार्थ्यांना स्वखर्चाने तीन महिन्याच्या धान्याचं मोफत वाटप केलं. लातूर जिल्हा युवासेनेच्या वतीनं सिग्नल कॅम्प कापड गिरणी भागात घरपोच मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या रोगाद्भवन - इन्क्युबेशन केंद्रांमध्ये कोरोना संसर्ग विषाणू तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता देण्यात आली. कोविड १९ संसर्ग चाचणी प्रयोग शाळेस मान्यता मिळालेलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिलं अकृषी विद्यापीठ आहे. या प्रयोगशाळेमुळे विद्यापीठ परिक्षेत्रातल्या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार असल्याचं कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितलं. ते म्हणाले…

या lab मध्ये आम्ही एका सॅकलमध्ये जवळपास अडीचशे सॅम्पल टेस्ट करू शकतो sample कम्प्लीट होण्यासाठी जवळपास पाच तास लागतात तर दिवसातून जवळपास ५०० sample आम्ही या lab मधून चेक करुन देऊ शकतो विद्यापीठाचं परिक्षेत्र नांदेड परभणी लातूर हिंगोली जिल्हा आहे या विद्यापीठाचं परिक्षेत्र मधले जेवढे काही पेशंट ची तपासणी आणि कमीत कमी आणि अचूक पद्धतीने करून द्यावं हा आमचा मानस आहे.
****
टाळेबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जालना पोलिसांनी काल शहरातल्या विविध भागात कारवाई केली. सामाजिक अंतर राखण्याचा नियम न पाळणाऱ्या दहा दुकानदारांकडून नगरपालिकेच्या पथकानं काल १४ हजार रुपये दंड वसूल केला.
****
परभणी शहर महानगरपालिका हद्द आणि पाच किलोमीटर परिसर तसंच जिल्ह्यात सर्व नगरपालिका हद्द आणि तीन किलोमीटर परिसरात कालपासून ते शुक्रवारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश जारी केले.
****
हिंगोली इथं सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवणारे ३८ नागरिक, चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल न बांधणारे ३७ नागरिक, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एका नागरिकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. किराणा दुकानावर दर फलक न लावणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. या एकूण ८२ जणांकडून ५७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक गरजु नागरिकांना धान्य न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. रेशन वितरणाबात विविध तक्रारी आल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून गोर गरीब जनतेला वेळेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धान्य पुरवठा करण्याचे निर्देश गडाख यांनी दिले.
****
बीड तालुक्यातल्या जुजगव्हाण इथं ठाणे जिल्ह्यातून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं चुकीचं वृत्त दैनिकाच्या लाईव्ह पोर्टलवर प्रसारित केल्याप्रकरणी बीड इथले संपादक गंमत भंडारी यांना अटक करण्यात आली आहे. जुजगव्हाण इथं संशयित कोरोना विषाणू बाधित पोलीस कर्मचारी दुचाकीवर ठाणे इथून गावात येन गेल्याचं वृत्त या वेब पोर्टलवरुन प्रसारित केलं होतं. यामुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. पिंपळनेर पोलिसांनी याची दखल घेत ही कारवाई केली.
दरम्यान, पत्रकारांनी बातमी देताना त्याची सत्यता पडताळूनच ती देण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात समाज माध्यमातून चुकीचे संदेश पाठवून गैरसमज पसरवू नका, अन्यथा गुन्हे दखल करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या पिरबुऱ्हान नगर भागात काल जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसरातल्या बंदोबस्ताची पाहणी केली.
****
परभणी जिल्ह्यात १४ ठिकाणी सीमा बंद करण्यात आल्या असून, त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही पुणे, मुंबई, औरंगाबाद, बीड या चार जिल्ह्यांतून सुमारे दिड हजार नागरिक परभणी जिल्ह्यात आले आहेत. या सर्वांना त्या-त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आलेल्या नागरिकांनी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासला. बँक व्यवस्थापनानं परिसरात चुन्याने चौकोनाची आखणी केली होती, नागरिकांनी या चौकोनामध्ये दुधाच्या कॅन, रिकाम्या पिशव्या, पादत्राणे ठेन रांगेतली जागा निश्चित केली. स्वत: मात्र पायऱ्यांवर एकत्र बसून, बँकेनं सामजिक अंतर राखण्यासाठी केलेलं नियोजन मोडीत काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात अनेक महिला, नागरीक ही पुढाकार घेत आहेत. परभणी शहरातल्या शिवराम नगर इथल्या शिवानी रत्नपारखी आणि स्नेहल सुवर्णकार या दोन सासू -सुना भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. या दोघींनी सादर केलेले भारूड सामाजिक संपर्क माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे.


****
बीड जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गटाला त्यांच्या शेतातला माल घरोघरी जाऊन विकण्याची परवानगी दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांना परवाने देण्यात आले आहेत. या उपक्रमातून गेल्या नऊ दिवसात एक कोटी २५ लाख रुपयापेक्षा अधिक रकमेची फळे आणि भाजीपाला विकल्या गेला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण औद्योगिक वसाहती मधल्या शालिनी केमिकल या रसायनाच्या बंद असलेल्या कारखान्यात काल सकाळी स्टोअरेज टँकचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे आजुबाजुच्या कंपन्यांच्या बांधकामास तडे गेले असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या. तापमान खूप वाढल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज कंपनीचे व्यवस्थापक रामेश्वर सुरवसे यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या वतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही.
****
लातूर शहरात उद्योग भवन परिसरातल्या दोन दुकानांना मध्यरात्रीनंतर अडीच वाजेदरम्यान आग लागली. मनपा अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. गेल्या दोन दिवसातली ही दुसरी घटना असून सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. अशा घटना घडू नयेत, यासाठी व्यावसायिकांनी टाळेबंदीच्या काळात बंद असलेली दुकानं, व्यापारी संकुलाचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवावा, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
परभणी इथल्या वैश्य नागरी सहकारी बँकेनं टाळेबंदीच्या काळात नागरिकांना घरपोच पैसे उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. ज्या ग्राहकांना बाहेर जाणं शक्य नाही अशांनी वैश्य बँकेच्या कोणत्याही शाखेत फोन करून कल्पना दिल्यास त्यांना घरपोच त्यांच्या एटीएमद्वारे पैसे काढून देण्याची व्यवस्था बँकेनं केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांकडच्या सर्व प्रतीच्या कापसाची खरेदी करावी, जिल्ह्यातल्या शिधापत्रिका नसणारे आणि असणारे अशा सर्वांना तीन महिन्याच्या राशनखं वितरण करावं, पीक विमा अनुदान रक्कम बॅकांनी तात्काळ  शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचं आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करण्याच्या अटीस अधीन राहून, ही मान्यता देण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनानं दिलेल्या ऑनलाईन लिंकवर २५ एप्रिलपर्यंत प्राथमिक नोंदणी करणं आवश्यक आहे.
****

No comments: