Wednesday, 29 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø औरंगाबाद शहरात आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; आजपासून टाळेबंदी अधिक कडक
Ø बाधित भाग तीन मे पर्यंत पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय
Ø राज्यात आणखी ७२९ रुग्ण; ३१ जणांचा मृत्यू
Ø टाळेबंदीच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा इशारा
Ø विधान परिषदेच्या रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी
आणि
Ø औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकांवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय
****

 औरंगाबाद शहरात काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. काल रात्री उशीरा आणखी चार जण बाधित असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या १०९ झाली आहे. किले अर्क १३, पैठण गेट परिसरात पाच, संजयनगर मुकुंदवाडी, भिमनगर- भावसिंगपुरा भागात प्रत्येकी दोन, तर सिल्लेखान्यातली बडा तकिया मस्जिद, आसेफिया कॉलनी, चेलीपुरा, सातारा परिसरातला राज्य राखीव पोलिस दलाचा एका जवान,  तसंच दौलताबाद परिसरात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला आहे.

 दरम्यान, किले अर्क परिसरात अगोदरच मरण पावलेल्या एका ७० वर्षी महिलेचा मृत्यूनंतरच्या अहवालात ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं. यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यु झालेल्यांची संख्या सात झाली आहे.

 औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत काल सामान्य रुग्ण समजून संशयित वॉर्ड ऐवजी जनरल वॉर्डात भरती करण्यात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानं तीच्या संपर्कात आलेल्या सात परिचारिकांसह तीन निवासी आणि एक इंटर्नशीप डॉक्टरला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 
****

 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरात आजपासून सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत संचारबंदी लागू राहणार आहे, असं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं. ते म्हणाले....

 औरंगाबाद जी दुपारी १ वाजेपर्यंत याठिकाणी सवलत होती आणि किराणा दुकानं जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना ती आता फक्त अकरा वाजेपर्यंत सौलत ही आपण या ठिकाणी देणार आहे.  29 तारखेपासून हा जो निर्णय आहे प्रशासनाचा हा अमलात येईल. त्याप्रमाणे आपण रमजान च्या अनुषंगाने दोन तास त्यांना मुभा दिली होती. ती मुभा देखील आता संपुष्टात येणार आहे. अकरा वाजेनंतर मात्र मला आपल्या सर्वांकडून विषेशतः शहरातल्या सर्व नागरिकांकडून हिच अपेक्षा आहे. की सर्व कडकडीत बंद पाडतील. फक्त मेडिकलचे दुकानानं वघळता कुठल्याही आस्थापनां  या चालू राहणार नाही. आम्हाला सर्वांकडून एकच सहकार्य अपेक्षित आहेत. घरातच थांबा.

 कोरोना विषाणू बाधित जास्त रुग्ण आढळलेल्या नऊ भागात आजपासून ते तीन मे पर्यंत बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. किले अर्क, नूर कॉलनी, समता नगर, हिलाल कॉलनी, आसिफिया कॉलनी, किराडपुरा, बिस्मिल्ला कॉलनी, भीमनगर आणि बायजीपुरा या भागातल्या बॅंका तीन मे पर्यंत बंद राहणार आहेत. अन्य भागातल्या बँका सकाळी नऊ ते ११ वाजेपर्यंत दोन तासच सुरु राहणार आहेत.

 दरम्यान, कोरोना विषाणूची रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी म्हटलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात काल घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, मौलवी, लोक प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या रोडगे इथल्या पाच वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हा मुलगा १७ जणांसह औरंगाबादहून गावी आला होता. हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४ झाली आहे.
****

 परभणी शहरातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्याला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. नांदेड शहरातल्या पिरबुऱ्हाणनगर इथल्या कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचाही सहा दिवसांच्या उपचारानंतरचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल कोरोना विषाणूचे आणखी ३६ रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता १८१ झाली असल्याचं आणि यात मालेगांवमधली रुग्ण संख्या १५९ असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं.
****

 सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला असून तो गेल्या पंचवीस तारखेला पुण्याहून फलटणला आला होता. सातारा जिल्ह्यात आता लागण झालेल्यांची संख्या ३६ झाली आहे.
****

 राज्यात काल ७२९ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा नऊ हजार ३१८ झाला आहे. काल या आजारानं ३१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात ४०० कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला आहे.
****

 मुंबईत मंत्रालयातल्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू बाधित असल्याचे आढळल्यामुळे आज आणि उद्या मंत्रालय बंद राहणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसांत मंत्रालयाच्या इमारतीचं निर्जंतुकीकरण केलं जाईल.
****

 टाळेबंदीच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.  हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले. टाळेबंदीच्या काळात राज्यात आतापर्यंत ८० हजार ६३ गुन्हे दाखल झाले असून, १६ हजार ५४८ जणांना अटक केल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. पोलिसांवर हल्ल्याच्या १५९ घटना घडल्या असून या प्रकरणी ५३५ जणांना पोलिसांनी अटक केली असल्याचं सरकारी प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे.

 दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीनमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धार्मिक स्थळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित आल्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर या जमावानं सोमवारी हल्ला केला होता.
****

 देशात सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला तात्पुरत्या स्वरूपात `एक राष्ट्र एक शिधा पत्रिका` योजना राबवण्यासंदर्भात विचार करायला सांगितलं आहे. टाळेबंदीच्या कालावधीत स्थलांतरीत कामगार आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. केंद्र सरकारची ही योजना येत्या जूनमध्ये सुरू होणार होती. न्यायमूर्ती एन. वी. रमन्ना, एस. के. कौल, आणि बी. आर. गवई यांच्या पीठानं जारी केलेल्या आदेशात सध्याच्या स्थितीत ही योजना लागू करणं व्यवहार्य आहे का नाही याचा विचार केंद्रानं करण्याचे निर्देश दिले आहेत. 
****

 राज्यातल्या १३ हजार ४४८ उद्योगांनी काम सुरू करण्याची राज्य सरकारकडून परवानगी मिळवली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल ही माहिती दिली. गेल्या वीस एप्रिलनंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातले उद्योग बंद असून केंद्र सरकारनं त्यांना पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळ- उद्योगांच्या स्वयंघोषित माहितीनुसार उद्योग सुरू करण्याची परवानगी देत असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले. उद्योग पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महामंडळाकडे आतापर्यंत पंचवीस हजारांहून अधिक अर्ज आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 टाळेबंदी तसंच संचारबंदीमुळे देशभरातले उद्योग गेल्या २२ मार्चपासून बंद आहेत. पण शासनाने काही अटी आणि मर्यादा घालून देत जीवनावश्यक वस्तूंच्या कारखान्यांना सुरू करण्याची परवानगी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या उद्योगांविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

 ऑनलाइन अर्ज आलेल्या १२६४  उद्योगांना ते सुरू करण्याची परवानगी औद्योगिक विकास महामंडळ दिली आहे. यातील १६२ कारखाने सुरू झाले आहेत. त्यातून सुमारे पाच हजार कामगारांच्या हाताला पुन्हा काम मिळालंय. उत्पादित माल इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी १२५ वाहनांना परवानगी सुद्धा देण्यात आली आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूर रवींद्र कुलकर्णी
****

 मुंबई पोलिसांमधल्या पंचावन्न वर्षांवरील वयोगटातल्या आणि आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी रजेवर जायला सांगण्यात आलं आहे. तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या वयामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना  कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असल्यानं ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत वीस अधिकाऱ्यांसह १०७ पोलिस कर्मचाऱ्यांना याची लागण झाली असून यात बहुतांश मुंबईतले आहेत.
****

 सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोलापूर-उस्मानाबाद जिल्हा सरहद्दीवर थर्मल स्क्रीनिंग केलं जात आहे. सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांतल्या प्रवाशांचा प्रवासाचा इतिहास, संशयित लक्षणं जाणू घेतली जात आहेत. काल दिवसभरात ४८ व्यक्तींचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात आलं.
****

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात काल राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं, यासंदर्भातला ठराव राज्य मंत्रीमंडळानं दोनदा पारित केला असून, राज्यपालांनी तो मान्य करावा, असं म्हटलं आहे. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत असताना राज्यातली राजकीय अस्थिरता संपवा, अशी मागणीही मंत्र्यांनी राज्यपालांना केली. या भावनांची योग्य ती दाखल घेत या काळात कोणतेही राजकीय विधान करणार नाही, असं राज्यपालांनी म्हटल्याची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली.

 दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली. राज्यात ओषित आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****

 राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० - २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केलं, त्यांच्या या कामाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.   
****

 न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या समारंभात  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा कार्यकाळ २७ एप्रिल रोजी संपला.
****

 उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहर इथं दोन साधुंच्या झालेल्या हत्येबद्ल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रानं अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्या रितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलंदशहर प्रकरणी देखील  दोषींना कडक शिक्षा होईल, अशी  अपेक्षा व्यक्त केली आहे.  या घटनांना कोणीही धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांची कामं गतीने होण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला वीस हजार कोटी रुपये द्यावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी महाराष्ट्राच्यावतीनं चव्हाण या बैठकीत सहभागी झाले होते. महामार्ग निर्मितीच्या कामात काही प्रश्न निर्माण झाले असून, ते सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.
****

 औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत काल संपल्यानंतर या महापालिकांवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय काल नगरविकास विभागानं घेतला. औरंगाबाद महानगरपालिकेवर प्रशासक म्हणूल आयुक्त  आस्तिकुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात होणारी या महापालिकांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
****

 औरंगाबाद शहरात वाढत चाललेल्या कोरोना विषाणू रूग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद प्रशासनानं आता सावध नाही तर कठोर भूमिका घावी असं आमदार चव्हाण यांनी यावेळी सूचित केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. शहरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक असून पोलिस, प्रशासनानं यावर नियंत्रणासाठी कठोर पावलं उचलावीत अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली. 
****

 हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जिल्ह्यातली सर्व दुकानं तीन मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात घराबाहेर पडल्यास कारवाई होणार आहे. भाजीपाला आणि किराणा साहित्याच्या विक्री करणाऱ्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले.
****

 टिकटॉक इंडीया कंपनीने कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे पाच कोटी रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी टिकटॉक कंपनीला धन्यवाद दिले आहेत. टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून माहिती कळवली आहे. राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी टिकटॉक कंपनीनं गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
****

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रूपये देणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काल विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेऊन या संदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय झाला असून, विद्यापीठाच्या आपत्कालीन निधीतून हा निधी देण्यात येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.
****

 जालन्यातल्या कोरोना विशेष रुग्णालयात काम करणारे डॉक्टर आणि परिचारिकांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल ३०० पीपीई कीट उपलब्ध करून दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी कोरोना रुग्णालयात असलेल्या अद्ययावत सोयी-सुविधांबाबत दानवे यांना माहिती दिली.
****

 परभणी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं आहे. एक कोटी एक लाख रुपये एवढी ही रक्कम झाली आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने ७५० अन्नधान्य संच, १५० आरोग्य संचाचंही वाटप केलं.

 नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सभापती संभाजी पाटील पुयड यांनी काल पाच लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
****

 परभणी शहरातल्या २५ हजार नागरिकांना मोफत मास्क उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं. महिला बचत गटाच्या माध्यमातून हे मास्क तयार करण्यात आले आहे. यामुळे महिलांना रोजगार मिळाला असल्याचंही ते म्हणाले. सेलुच्या इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांना भारतीय जनता पक्षानं पीपीई किट्स आणि मास्कचं वाटप केलं आहे.

 माजी आमदार सुरेश देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांकडून गरजुंना जेवणाच्या डब्ब्यांचं वाटप करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर, 

 लॉकडाऊनच्या काळातील परभणी शहरातील गोरगरीब, मजूर, अन्नापासून वंचित राहू नये म्हणून माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या पुढाकारातून दोन ते अडीच हजार व्यक्तींना २८ मार्च पासून दररोज जेवन देण्यात येत आहे. या सोबतच एक घर एक डब्बा योजना राबवून शहरातील दिड हजार नागरिकाकडून आलेला डब्बा गजरवंता पर्यंत पोचविण्याचे कार्य करण्यात येते. शहरातील सुमारे दोन हजार गरजू नागरिकांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी दिपक मुंगळे यांनी या उपक्रम स्थळी जाऊन पाहणी करून  समाधान व्यक्त केले. तसेच या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व युवकांचे कौतुक केले.
आकाशवाणी बातम्यासाठी, परभणीवरून विनोद कापसीकर.
****

 लातूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दिव्यांग कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचं वाटप करण्यात आलं.
****

 परभणीरमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर फळं, सुकामेव्याची दुकानं संध्याकाळी पाच ते साडे सहा या वेळेत उघडी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. आघाडीचे नेते शेख खुर्शीद यांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिस निरिक्षकांना यासंदर्भातलं निवेदन दिलं आहे.
****

 लातूर जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आमदार संभाजी पाटीनिलंगेकर यांनी पीपीई किट तसंच सॅनिटायझर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे सुपुर्द केलं.
****

 परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या मरडसगाव इथं सांगली जिल्ह्यातून ४८ स्थलांतरीत कामगार कुटुंबं आली असून, त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरणात ठेवलं आहे. या कुटुंबांना काल प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तुंचं वाटप करण्यात आलं.
****

 हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीतांची संख्या वाढत असतानाच भूकंप आणि बेमोसमी पाऊस या नैसर्गिक आपत्तींनी जिल्ह्यात थैमान घातलं आहे.

 काल सकाळी जिल्ह्यातल्या वसमत कळमनुरी आणि औंढा नागनाथ, तालुक्यातल्या काही गावांना पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे सामान्य जनजीवनावर जास्त परिणाम झाला आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

 हिंगोली जिल्ह्यात अस्मानी संकटांशी तिहेरी मालिका एकाच वेळी सुरू आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखत जिल्हा ग्रीन झोन मध्ये समाविष्ट झाला खरा. पण दोन तासातच या  आनंदावर घाला बसत एकाच वेळी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. आणि आता तर ही संख्या १४ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत असतानाचं कळमनुरी औंढा वसमत तालुक्यांमध्ये तब्बल चोवीस गावांमध्ये चार दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूगर्भातील आवाजाने घाबरून नागरिकांनी रात्र रस्त्यावर जागून काढली. ही घबराट कमी होण्यापूर्वीच आज दुपारी अवकाळी पावसाने याच भागाला झोडपून काढले. काही ठिकाणी गारपीटही झाली. एकाच वेळी तिहेरी संकटामुळे हिंगोलीकर चांगलेच भेदरले आहेत.
 आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

दरम्यान, भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना काल कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, भेटी देऊन घाबरलेल्या नागरिकांना दिलासा दिला.
****

 नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळं केळीच्या बागांचं नुकसान झालं. परभणी तसंच वाशीम जिल्ह्याच्या काही भागातही काल हलक्या सरी कोसळल्या आहेत.

 ाबरोबरच मराठवाड्यातले जालना आणि हिंगोली वगळता अन्य भागात तीन मे पर्यंत वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागानं व्यक्त केली आहे.
****

 लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्यानं कालपासून गळीत हंगाम २०२०-२१ सुरू करण्याच्या दृष्टीन कारखान्याची यंत्र आणि दुरूस्तीची काम सुरू केली असल्याचं अध्यक्ष वैशाली देशमुख यांनी सांगितलं. केंद्र तसंच राज्य सरकार आणि साखर आयुक्ताच्या निर्देशानुसार टाळेबंदीच्या नियमांचं पालन करून हे काम सुरू करण्यात आलं आहे.
****

 वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांत पुणे, मुंबई इथून ५१३ मजूर आपल्या गावी परतले असून, त्यांना स्वगृही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. दोघा संशयितांना वाशिमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी दिली.
****

 जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विधिज्ज्ञ अपर्णा रामतीर्थकर यांचं काल सोलापूर इथं निधन झालं, त्या ६५ वर्षांच्या होत्या. पक्षाघाताचा झटका आल्यानं गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूर इथल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रामतीर्थकर यांनी २००८ पासून `चला नाती जपू या` `आईच्या जबाबदाऱ्या` आदी विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली होती. सोलापूरमधल्या अनेक संस्थामधे त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या.
****

 परभणी जिल्ह्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सामुग्रीची तसंच दैनंदिन तपासणी झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या मार्फत हॉस्पीटल इन्फॉर्मेशन कलेक्शन सिस्टिम - एच आय सी एस ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.  परभणीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या संघानं या प्रणालीची निर्मिती केली असून, २७ एप्रिलपासून ती कार्यान्वित करण्यात आली.
****

 मराठवाडा विकास मंडळाला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मराठवाडा विकास जनता परिषदेच्या उदगीर शाखेनं केली आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी  नियोजनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका असलेलं मराठवाडा विकास मंडळ बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी असं, परिषदेचे  मराठवाडा अध्यक्ष  डॉ व्यंकटेश  काब्दे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****

 परभणीच्या नवा मोंढा आणि मुख्यालयातल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर आणि बेशिस्तीचं वर्तन केल्यामुळे पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी निलंबीत केलं आहे. नवा मोंढा पोलिस ठाण्यातले पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद राठोड आणि पोलिस मुख्यालयातले पोलिस शिपाई ब्रम्हानंद कोल्हे अशी त्यांची नावे आहेत.
*****
***

No comments: