Saturday, 25 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.04.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २५ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशातील कोरोना विषाणू बाधीतांची संख्या २४ हजार ५०६ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यातील पाच हजार ६२ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णांमधील एक विदेशात स्थलांतरीत झाला आहे तर ७७ जण विदेशी नागरिक आहेत. देशभरामधे काल संध्याकाळपासून यात ५२ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून यात सर्वाधिक १८ मृत्यू महाराष्ट्रात तर १५ गुजरातमधे झाले आहेत. देशामधील एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७७५ झाली आहे, यात राज्यात सर्वाधिक ३०१ मृत्यूंची नोंद झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****

 सुरक्षा दलांनी आज पहाटे जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात  केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी आणि दहशतवाद्यांचा एक कट्टर सहयोगी ठार झाले. अवंतीपोरामधील गोरीपोरा भागामधे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती, त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरू झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले.

 औरंगाबादच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणू बाधीत रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतल्या एकाच कुटुंबातल्या तीन महिला रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद मधल्या एकूण रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण अठरा कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांवर  आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयात दोन अशा एकूण २० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
****

 अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करून मुंबईतून आणलेल्या सांगली मधल्या युवतीला कोरोना विषाणूची  लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द इथल्या या कोरोना विषाणूग्रस्त युवतीला आणि तिच्या भावाला मुंबईहन आणणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*****
***

No comments: