Monday, 27 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.04.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 
         
 कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर देशात तीन मे पर्यंत लागू टाळेबंदी पुढंही सुरू रहावी, असं काही राज्यांनी सुचवलं आहे. पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधआहेत. यात ही सूचना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणांसह येत्या तीन मे नंतर टाळेबंदी टप्प्या टप्प्यानं कशी मागं घेता येईल, याबाबत हा संवाद सुरू आहे.
****

 भारतीय रिझर्व बँकेनं म्युच्युअल फंडांकरता रोकडात रुपांतर करण्याची विशेष सुविधेची घोषणा केली आहे. म्युच्युअल फंडांसाठी पन्नास हजार कोटी रुपयांचं रोकडात रुपांतर करण्याची सुलभता या अंतर्गत देण्यात आली आहे.
****

 जम्मू आणि काश्मीरमधल्या कुलगाव जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली. काझीगुंड भागात गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युउत्तर दिलं, त्यावेळी ही चकमक झाल्याचं एका पोलिस अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. या ठिकाणी अद्याप कारवाई सुरू असल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचे चार नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता अकरा झाली आहे. हे चार रुग्ण राज्य राखीव पोलिस दलाचे जवान असून त्यांना या दलाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. या चौघांच्या लाळेचे नमुने २५ एप्रिलला घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यांना या विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या विषाणूची बाधा झालेल्या अकरा जवानांमधे दहा जवान हिंगोलीचे आणि एक जालना इथला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्वतंत्र कक्षात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.
****

 नांदेड शहरातील अबचलनगर भागातला ४४ वर्षीय रूग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. हा रुग्ण रहात असलेला परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. नांदेड शहरातील नागरिकांनी घरातच राहून या विषाणूविरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****

 परभणी जिल्हा कोरोना विषाणू मुक्त झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव बाधीत रुग्णाचा दुसरा तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो यातून बरा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****

 कोरोना विषाणू प्रतिबंध आणि उपचारांसाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या कैलास माळी यांच्या स्मरणार्थ सोनवणे परिवारानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. या परिवारानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश ज्येष्ठ सैनिकांच्या हस्ते तहसीलदारांकडे सुपूर्द केला.
****

 नांदेड शहरातील सचखंड गुरूद्वारामधे अडकून पडलेल्या पंजाबमधील शिख भाविकांना परत घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारनं पाठवलेल्या ८० बस आज सकाळी शहरात दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्या आज रात्री  भाविकांना घेऊन पंजाबकडे रवाना होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्हा कोरोना विषाणू मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुस्लीम धर्मगुरुंनी केलं आहे. मुस्लिम बांधवानी आपल्या घरातच नमाज अदा करावी तसंच रोजा सोडण्यासाठी लागणारी फळं आणि इतर वस्तू सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरक्षित सामाजिक अंतर ठेवुन खरेदी कराव्यात, असं आवाहन  या अंतर्गत पोलिसांच्या वाहनाचा उपयोग करून केलं जात आहे.
****

 पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या तीन वर्षांच्या मुलीनं कोरोना विषाणूवर मात केली आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या विषाणूच्या प्रादुर्भावातून मुक्त झाल्यानंतर या मुलीला काल टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****

 टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधे जुहू इथं संत नामदेव महाराज चौकात  पाच वारकरी दिंडीच्या माध्यमातून कोरोना विषाणूविषयी जनजागृती करत आहेत. सर्वांनी मास्क वापरणं गरजेचं असून त्याद्वारे याचा प्रादुर्भाव होणार नाही असा संदेश यामाध्यमातून देण्यात येत आहे. 
****

 सिंधुदुर्ग इथं जिल्हा आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्या अथक प्रयत्नामुळे गेल्या १९ दिवसात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही. शहरात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला होता.
*****
***

No comments: