Monday, 27 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangaba 27.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी.

·      कोरोना विषाणूविरुद्ध स्वसंरक्षण उपकरणांच्या निर्मितीमधे वाढ.

आणि

·      औरंगाबादमधे आणखी एका कोरोना विषाणू बाधीत रुग्णाचा मृत्यू.

****

कोरोना विषाणू महामारीमुळे देशात लागू टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम झाले असून देश गेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यामधे केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशांचं राज्यांनी काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. लाल क्षेत्रांचं रुपांतर केशरी आणि त्यानंतर हरित क्षेत्रामध्ये करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन आणि वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते. देशात आतापर्यंत दोन वेळा टाळेबंदी करण्यात आली असून आता पुढं काय आणि कसं करायचं याचा विचार करण्याची वेळ आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. अर्थव्यवस्था आणि कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं तसंच त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं कराव्या लागलेल्या टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. गेल्या दीड महिन्यात आपण हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो, असं ते म्हणाले. आणखी काही महिने कोरोना विषाणूचा परिणाम जाणवत राहील असं तज्ञांचं मत असून त्यामुळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं आणि मास्क लावणं कायम ठेवणं पुढचा काही काळ आवश्यक राहणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या निमित्त पुन्हा एकदा जनतेला केलं आहे.

****

पंतप्रधानांशी संवाद साधताना बहुतांश मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी केल्याचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी यांनी म्हटलं आहे. तीन मे पर्यंत लागू टाळेबंदी उठवताना सावध भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एकमतानं पंतप्रधानांना सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूचे देशातील रुग्ण वाढत असल्यामुळे टाळेबंदी उठवण्याबाबत काय करावं, यावर पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी लागणाऱ्या स्वसंरक्षण वैद्यकीय उपकरणांची देशभरातील निर्मिती क्षमता एक लाखांपेक्षा जास्त झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत देशभरात साधारणपणे दहा लाखांपेक्षा जास्त उपकरणांचं उत्पादन झालं असून, प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार ही उपकरणं पुरवली जात आहेत, तसंच हा पुरवठा सुरळीत होण्याकरता, उत्पादक आणि विविध औद्योगिक संस्थांशी समन्वय राखत, पुरवठा यंत्रणेतले अडथळे दूर करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू टाळेबंदीच्या काळात युवक बेजबाबदारपणे वागले तर ते या विषाणूचा संसर्ग कुटुंबातील ज्येष्ठांना देतील, असा इशारा औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांड्ये यांनी दिला आहे. सामाजिक संपर्क माध्यमातून या संदर्भातील माहिती प्रसारित करताना त्यांनी आज याची आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना विषाणू बाधीत बहुतांश रुग्ण २१ ते ४० वर्षे वयोगटातील असून त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, असं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. औरंगाबाद शहरातील ५१ रुग्णांपैकी केवळ दोन जण विदेशात प्रवास करून आलेले आणि एक राष्ट्रीय पातळीवर प्रवास केलेला आहे. त्यातील दहा रुग्ण या विषाणूचे रुग्ण आढळलेल्या भागातील असून ३८ रुग्ण प्रवास केलेल्यांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग झालेले असल्याचं औरंगाबाद महापालिका आयुक्त पांड्ये यांनी नमूद केलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या किलेअर्क परिसरातल्या साठ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत महिलेचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमधे उपचारां दरम्यान मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह, मूत्रपिंड विकार आणि उच्च रक्तदाब होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे औरंगाबादमधली कोरोना विषाणू बाधीत मृतांची संख्या सहा झाली आहे.

****

औरंगाबादमधील एका १७ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत रूग्णाला आज यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. शहरातल्या बायजीपुरा परिसरात राहणारा हा मुलगा मुंबईहून आला होता. औरंगाबादमधे आतापर्यंत एकूण २३ कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरे झाले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीत २४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत करण्यात आलेल्या ३४ रुग्णांच्या तपासणीवेळी हे स्पष्ट झालं असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांनी दिली आहे. उदगीर इथं ३०, अंबाजोगाई इथल्या दोन रुग्णांच्या चाचण्या आज घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

****

पालघर इथल्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या चालक निलेश तेलगाडे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासह त्यांची संपूर्ण जबाबदारी लातूरमधील भाजप जिल्हाध्यक्ष रमेश कराड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी घेतली आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या पाणी टंचाई सदृश्य भागांना गरज पडल्यास औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांड्ये आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांच्याशी संवाद साधून पालकमंत्री देसाई यांनी याची शक्यता पडताळून पाहिली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही शहरातील २० ते २५ टक्के विभागांत पाणी पुरवठा करण्यामधे अडचणी येत असून अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्यानं ही शक्यता पडताळून पाहिली जात आहे.

****

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार नांदेड जिल्हा प्रशासनानं काही अटींवर कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रासायनिक खतं, बी-बियाणांची दुकानं पूर्ववत सुरू झाली आहेत. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील आडगावचे प्रगतशील शेतकरी दिगंबरराव क्षीरसागर यांनी आज रासायनिक खतांची खरेदी केली असून पेरणी पूर्वतयारी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा इथं खासदार हेमंत पाटील यांनी उप कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीनं ५०० गरजू नागरिकांना धान्य पाकिटांचं वाटप केलं. खासदार पाटील यांनी जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून गरजूंना सॅनिटायझर, मास्क, धान्याची पाकिटं तसंच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना फळांचं वाटप केलं.

****

औरंगाबाद शहरातील ज्योतीनगर इथं गरजूंना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी अन्नधान्य आणि किराणा साहित्याचं वितरण केलं आहे. गुलमंडी, औरंगपुरा इथंही त्यांच्यावतीनं अन्न धान्य, किराणा वितरण करण्यात आलं. आमदार प्रदीप जैस्वाल तसंच किशनचंद तनवाणी यावेळी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील दिडशे गरजू कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतकं अन्नधान्य आणि किराणा साहित्य वाटप करण्यात आल्याचं खैरे यांच्या कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. एका ४५ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती जिल्ह्यधिकारी एम प्रदीपचंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच जिल्ह्यातील गराडा आणि मेंढा या गावाला नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

सातारा जिल्ह्यातला चौथा कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरा झाला असून त्याला शासकीय क्रांतीसिंह रुग्णालयातून आज सुटी देण्यात आल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे. पुढील १४ दिवस या रुग्णाला घरीच विलगीकरणात राहावं लागणार आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३३ आहे.

****

कोरोना विषाणूच्या साथीमुळं धुळे शहरात कडकडीत संचारबंदी लागू असताना महापालिका व्यापारी संकुलातील मोबाईल दुकानात आज चोरी झाली. यात हजारो रुपयांचे मोबाईल आणि साहित्य चोरी गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

****

No comments: