Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø टाळेबंदीचे सकारात्मक
परिणाम; हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ø राज्यात ५२२ नवीन कोरोना विषाणू रुग्ण; २७
जणांचा मृत्यू
Ø औरंगाबाद शहरात २९, लातूर जिल्ह्यात तीन तर हिंगोलीत राज्य
राखीव पोलिस दलाचे आणखी चार जवान विषाणू बाधित, परभणी कोरोना विषाणू मुक्त
Ø विधान परिषदेच्या रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशीचा मंत्रिमंडळ बैठकीत पुनरुच्चार
Ø सहकारी
संस्थांच्या संचालक मंडळांना तसंच नांदेड महानगरपालिकेच्या
महापौर आणि उपमहापौरांना मुदतवाढ
आणि
Ø हिंगोली जिल्ह्यातल्या दहा ते बारा गावांना भूकंपाचे
सौम्य धक्के
****
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या
टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून यामुळे देशातल्या हजारो लोकांचे प्राण
वाचवण्यात यश मिळालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या साथीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनानंतर निर्माण झालेल्या स्थितीबाबत ते राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा करत होते. मुख्यमंत्र्यांशी
चर्चेची त्यांची ही चौथी फेरी होती. मार्च
महिन्याच्या प्रारंभी भारतासह अनेक देशांची स्थिती एकसमान होती. मात्र वेळेवर योग्य
निर्णय घेतल्यामुळे अनेक देशवासियांचे प्राण वाचवण्यात भारत यशस्वी ठरला आहे. या विषाणुचा
धोका अजूनही कायम असून सतत काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचा इशाराही त्यांनी
यावेळी दिला. देशात आतापर्यंत
दोन वेळा टाळेबंदी लागू करण्यात आली असून अर्थव्यवस्था आणि कोरोना विषाणू विरोधातल्या
लढ्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं तसंच त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर
करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं आहे. आणखी काही महिने कोरोना विषाणुचा परिणाम जाणवत राहील असं तज्ञांचं मत असून पुढचा काही काळ एकमेकांपासून सुरक्षित
अंतर ठेवणं आणि मास्क लावणं कायम ठेवणं आवश्यक राहणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत,
त्यांना घरी आणायंच आहे. विदेशातून अनेक भारतीयांना
आणायचं आहे, चाचण्या करून त्यांचं विलगीकरण करायचे आहे,
यासंदर्भात धोरण ठरवण्याविषयी पंतप्रधानांसोबत
चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
तसंच टाळेबंदी
कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचं आहे.
टाळेबंदीही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण
बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी काळात रेड, ऑरेंज, अणि ग्रीन, झोननुसार टाळेबंदीचं प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावं असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं
ते म्हणाले.
****
कोविड १९ साथीच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत, रजा रोखीकरण, अतिरिक्त कार्य भत्ता, वैद्यकीय
खर्च आणि इतर सवलतीत कपात करण्याबाबत वृत्तपत्रात प्रसारित झालेल्या वृत्ताचं केंद्र
सरकारनं खंडन केलं आहे. सरकारचा असा कोणताही प्रस्ताव नसून हे वृत्त खोटे आणि निराधार
असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. नियमानुसार या
सर्व सवलती यापुढेही कायम राहतील, असं या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी लागणाऱ्या स्वसंरक्षण वैद्यकीय
उपकरणांची देशाची निर्मिती क्षमता एक लाखांपेक्षा जास्त
झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत देशभरात साधारणपणे दहा लाखांपेक्षा
जास्त उपकरणांचं उत्पादन झालं असून, प्रत्येक
राज्याच्या गरजेनुसार ही उपकरणं पुरवली जात आहेत, तसंच हा पुरवठा सुरळीत होण्याकरता, उत्पादक आणि विविध औद्योगिक संस्थांशी समन्वय राखत, पुरवठा यंत्रणेतले अडथळे दूर करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू
संसर्गाच्या उपचारासाठी लक्षणांच्या गंभीरतेनुसार
त्रिस्तरीय उपचार आणि निगा केंद्रं उभारण्यात आली असून यातून तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिव्हर क्लिनिक सुरु आहेत. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली.
सध्या या तीन वर्गवारीतील
एक हजार, ६७७ उपचार केंद्रातून पावणेदोन लाख
विलगीकरण खाटा आणि सात हजारांहून अधिक अतिदक्षता
खाटांची उपलब्धता आहे. तीन हजार व्हेंटीलेटर्स, ८०
हजार स्वसंरक्षण संच-पीपीई किटससह पावणे तीन लाख एन-९५ मास्कद्वारे बाधितांवर उपचारांची सज्जता करण्यात आली असल्याचं टोपे म्हणाले.
****
राज्यात काल ५२२ नवीन कोरोना विषाणू रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णांची
संख्या आठ हजार ५९० झाली आहे. काल या आजारानं राज्यात २७ जणांचा मृत्यू झाला, आतापर्यंत
मृत्यू झालेल्यांची संख्या ३६९ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत एक हजार २८२ जण कोरोना
मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद शहरात
काल काल एकाच दिवसात तब्बल २९ कोरोना
विषाणू बाधित रूग्ण
आढळले. यामुळे शहरातल्या रूग्णांची संख्या ८२ वर
गेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
औरंगाबाद शहरात अचानक मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळल्यामुळे
आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. काल
शहरातल्या किलेअर्क भागात १४, टाऊन हॉल परिसरात १२, काला दरवाजा - भावसिंगपुरा परिसरात प्रत्येकी एक आणि आसेफिया कॉलनीत दोन रूग्ण आढळले. अगोदर आढळून आलेल्या बाधित रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे हे सर्व रूग्ण
अगोदरपासूनच विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यांच्यावर आता बाधित रूग्ण म्हणून उपचार
सुरू झाले आहेत.
दरम्यान, किलेअर्क भागातल्या बाधित ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. तर एका १७ वर्षीय तरूणाला विषाणू मुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं. त्याची आई आणि काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या बहिणीचा अहवालही नकारात्मक आला आहे.
रवीकुमार कांबळे, आकाशवाणी
औरंगाबाद
दरम्यान. मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळल्यानंतर हे रूग्ण
राहत असलेला सर्व परिसर नियंत्रित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे. रूग्णांच्या
निकट संपर्कातल्या व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्या लाळेचे नमुने
तपासणीचं काम सुरू केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत करण्यात आलेल्या ३४
रुग्णांच्या तपासणीवेळी हे स्पष्ट झालं असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली आहे. उदगीरच्या ३० तर अंबाजोगाईच्या दोन रुग्णांच्या चाचण्या काल करण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी
दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात राज्य राखीव
पोलिस दलाचे आणखी चार जवान कोरोना विषाणू बाधित असल्याचं
आढळून आलं आहे. यामुळे जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या आता अकरा झाली
आहे. या जवानांना यापूर्वीच विलगीकरण कक्षात
दाखल करण्यात आलं होतं. सर्व जवानांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात
उपचार सुरु आहेत असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितलं.
****
यवतमाळ जिल्ह्यातही काल दिवसभरात १९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले
आहेत. त्यामुळे यवतमाळचा आकडा आता ६९ वर गेला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात काल पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे. एका
४५ वर्षीय महिलेला कोरोना विषाणू
संसर्ग झाल्याची माहिती जिल्ह्यधिकारी
एम प्रदीपचंदन यांनी वार्ताहरांशी बोलतांना
दिली, तसंच
जिल्ह्यातल्या गराडा आणि मेंढा या गावाला नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं
उपचार घेणाऱ्या दोन जणांनाही बाधा झाल्याची माहिती जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली. यासोबतच उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झाल्यानं एका युवकाला काल सातारा जिल्हा
रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात संशयित ५३ जणांचे कोरोना विषाणू संसर्गाचे अहवाल प्रलंबित आहेत.
यापूर्वी शहरात दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयात उपचार
सुरू आहेत. यापैकी पहिला रूग्ण बरा होण्याच्या
मार्गावर असून त्याचा फेर तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
दरम्यान, अबचलनगर भागात
बाधित रुग्ण आढळमुळे
हा भाग नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
****
परभणीतल्या
शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या कोराना विषाणू बाधित रुग्णाचा तिसरा अहवाल नकारात्मक आल्यामुळे जिल्हा
कोरोनामुक्त झाला आहे. पुण्याहून नातेवाईकांकडे हा रूग्ण आला होता. याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले…
आजच्या तारखेला परभणी जिल्हा हा पूर्णपणे कोरोना
मुक्त झालेला आहे. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, परंतु असं असलं तरी पणं नागरीकांना माझी अशी विनंती राहिल. की त्यांनी गर्दी
करणं टाळावं. दुकानांमध्ये
सोशल डिस्टसिंगचा वापर अत्यावश्यक सेवासाठी प्रशासनाने नागरीकांसाठी सकाळी ८ ते ११ अशी
सुट दिलेली आहे. आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आणि
अगदी आवश्यक असेल तेवढ्याच वस्तू त्यांनी घ्याव्यात. आणि सकाळी ११ वाजेनंतर नागरीकांनी कुठल्याही परिस्थितीत घराच्या
बाहेर निघु नये. आणि आपल्या जिल्ह्याला ३ तारखेपर्यंत आणि ३ तारखेनंतर देखील कोरोना
मुक्त ठेवावा.
****
धुळ्यात काल तपासणी केलेले २९ जणांचे अहवाल
नकारात्मक आले आहेत. यात काही डॉक्टरांचा सुद्धा समावेश
आहे.
****
जिल्हाबंदी असतांना नागपूरहून चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथं
ये -जा करणाऱ्या
बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचाऱ्यांचं
नागभीड नगरपरिषदेनं १४ दिवसासांठी विलगीकरण केलं आहे. कोविड
विषाणू प्रादुभावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा कोरोना विषाणू
मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुस्लीम
धर्मगुरुंनी केलं आहे. मुस्लिम बांधवानी आपल्या घरातच नमाज अदा
करावी तसंच रोजा सोडण्यासाठी लागणारी फळं आणि इतर वस्तू सकाळी सात ते अकरा या वेळेतच
सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन खरेदी कराव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र विधान
परिषदेच्या रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती
करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी तातडीनं कार्यवाही करावी या विनंतीचा
मंत्रिमंडळ बैठकीत काल पुनरुच्चार करण्यात आला.
कोविड १९ साथीच्या
प्रादुर्भावामुळे वस्तू आणि सेवा कर कायद्यातल्या काही तरतुदींचे विहित मुदतीत
कायदेशीर पालन करणं, व्यापारी आणि कर प्रशासनास अवघड झालं असल्यानं, महाराष्ट्र
वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७ मध्ये “१६८ अ” हे
कलम नव्याने समाविष्ट करण्यास काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यानुसार
कुठल्याही आपत्तीत जसे की युद्ध, साथ रोग, पूर, दुष्काळ, आग, वादळ, भूकंप
यामध्ये सरकार विविध कर भरणा आणि इतर सेवांच्या बाबतीत निश्चित केलेल्या वेळेची
मुदत वाढवू शकतं. यासंदर्भात राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश काढला जाईल.
महात्मा
जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू
न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज
द्यावं अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा
निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियमांच्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. कोविडच्या आजारामुळे मुदत पुर्ण होत आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळेवर होऊ शकणार नाही, या पार्श्वभूमीवर या संस्थांवर
प्रशासक न नेमता विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ देण्याची तरतूद या सुधारणांमध्ये
करण्यात आली आहे.
नांदेड
महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका कोविड १९ च्या
संक्रमणामुळे तीन महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा
निर्णयही यावेळी घेण्यात आला. यासंदर्भातला अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालांकडे
पाठवण्यात येईल. यामुळे विद्यमान
पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार आहे.
कोरोना
विषाणूमुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली, त्यामुळे
दुध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दोन महिन्याकरता चार कोटी लिटर
दुधाचं रुपांतर दुध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबवण्यासाठी
१२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे खर्च करण्यात येईल.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य
न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आज शपथ घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांना पदाची शपथ देतील.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था तसंच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था
या दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक शुल्क कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय असल्याची माहिती
मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
दोन्ही संस्थांच्या बरोबर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
कोरोना विषाणू बाधीत बहुतांश
रुग्ण २१ ते ४० वर्षे वयोगटातील असून युवक बेजबाबदारपणे वागले तर ते या विषाणूचा संसर्ग
कुटुंबातल्या ज्येष्ठांना देतील, असा इशारा औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांड्ये यांनी दिला आहे.
सामाजिक संपर्क माध्यमातून या संदर्भातली माहिती
प्रसारित करताना त्यांनी काल याबाबतची आकडेवारी जाहीर केली. औरंगाबाद
शहरातल्या ५१ रुग्णांपैकी केवळ दोन जण विदेशात प्रवास करून आलेले
आणि एक राष्ट्रीय पातळीवर प्रवास केलेला आहे. यातील दहा रुग्ण
या विषाणूचे रुग्ण आढळलेल्या भागातले असून ३८ रुग्ण प्रवास केलेल्यांच्या
संपर्कात आल्यानं संसर्ग झालेले असल्याचं पांड्ये यांनी नमूद
केलं आहे.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधक टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांचं शैक्षणिक
वर्ष सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा सुरू असून त्यानंतरच निर्णय जाहीर
केला जाईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
यांनी सांगितलं आहे. ते काल रत्नागिरीत वार्ताहरांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही टाळेबंदी संपल्यानंतरच निर्णय घेतला जाणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा अवधी दिला जाईल, असंही ते म्हणाले.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठातल्या प्राध्यापक, शिक्षक
आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपला एक दिवसाचा पगार दिला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव
भोसले यांनी ९ लाख ७५
हजार १३६ रूपयांचा धनादेश काल नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे
सुपूर्द केला.
****
हिंगोली जिल्ह्यात कुरुंदा
इथं खासदार हेमंत पाटील यांनी उप कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीनं ५०० गरजू नागरिकांना धान्य पाकिटांचं वाटप केलं. खासदार पाटील यांनी जिल्ह्यात विविध
संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून गरजूंना सॅनिटायझर, मास्क, धान्याची पाकिटं तसंच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस, आरोग्य
विभागातल्या कर्मचाऱ्यांना फळांचं वाटप केलं.
****
औरंगाबाद शहरात ज्योतीनगर इथं गरजूंना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी अन्नधान्य आणि किराणा साहित्याचं वितरण केलं आहे.
गुलमंडी, औरंगपुरा इथंही
अन्न धान्य, किराणा वितरण करण्यात आलं. आमदार प्रदीप जैस्वाल तसंच किशनचंद तनवाणी यावेळी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातल्या दिडशे गरजू कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतकं अन्नधान्य आणि किराणा साहित्य वाटप
करण्यात आलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण
नागरी सहकारी पतसंस्थेनं करोना प्रतिबंधाच्या उपायांसाठी एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री
आणि प्रधानमंत्री मदत निधीसाठी दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे एक कोटी रूपयांचा धनादेश
सुपूर्द केला. तालुक्याच्या ठिकाणच्या एका पतसंस्थेनं एवढी मोठी मदत देणं हे गौरवास्पद असल्याचं प्रांताधिकारी पवार
यावेळी म्हणाले.
****
सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज
घेऊन स्वयंसिद्ध झालेल्या तरुणांनी पुढाकार घेत टाळेबंदीच्या
काळात मदत कार्य सुरू केलं आहे. यातील लाभार्थी, औरंगाबाद इथल्या
गंगामाई लॉजिंग आणि औषधी दुकानाचे मालक
प्रशांत जगताप यांनी मुकुंदवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे दीड हजार
गोरगरीबांना अन्नदान केलं असून
बंदोबस्तावरील पोलीस
कर्मचाऱ्यांना नाष्टा, शुद्ध पाणी वाटप केलं आहे.
अन्य एक लाभार्थी औरंगाबाद इथल्या ध्यास अभ्यासिकेचे संचालक लक्ष्मण नवले यांनी
त्यांच्या मूळ गावी खालापुरी इथं गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं.
****
परभणी इथं टाळेबंदीत अडचणीत
सापडलेल्या विविध मंदिरातल्या पुरोहितांना जिल्हा उद्योजक संघटना आणि
जिल्हा मराठा सेवा संघाच्यावतीनं अन्नधान्याचं वितरण करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या पोत्रा, दांडेगाव, कवडा, सिंदगी, नांदापूर, सालेगाव, वापटी, पांगरा, कोठारी, पिंपळदरी, गिरगाव, आंबा, चोंढी
सह दहा ते बारा गावात काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूगर्भातून
गुढ आवाज येऊन हादरे बसले. भूकंप मापकाचर तीन पूर्णांक चार रिश्टर स्केल वर भूकंपाची
तीव्रता नोंदवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
केंद्र सरकारच्या पंचायत सशक्तिकरण
अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या
तुरोरी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत अधिक माहिती देत
आहेत आमचे वार्ताहर....
तुरोरी गावात स्वच्छता नागरी सुविधा नैसर्गिक साधन
संपत्तीचे व्यवस्थापन दुर्लक्षित घटक महिला अनुसूचित जाती जमाती दिव्यांग यांच्यासाठी केलेलं कार्य आपत्ती व्यवस्थापन
उत्पन्नवाढीसाठी राबवलेले उपक्रम यामुळे पंचायत सशक्तीकरण अंतर्गत तुरोरी गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर,
उस्मानाबाद.
****
औरंगाबाद शहरातल्या पाणी टंचाई
सदृश्य भागांना गरज पडल्यास औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्याची
शक्यता पडताळण्यात येत आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल यासंदर्भात
महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांड्ये आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी
अधिकारी पी. अन्बलगन यांच्याशी चर्चा केली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
तरीही शहरातल्या २० ते २५ टक्के भागांत पाणी पुरवठा
करण्यामध्ये अडचणी येत असून अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा
केला जात असल्यानं ही शक्यता पडताळली जात आहे.
****
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी
स्थापन झालेल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्याची
मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या ३० एप्रिल रोजी
महामंडळाची मुदत संपत आहे. मराठवाड्याचा अद्याप अनुशेष तसंच अपेक्षित विकास न झाल्यानं हे मंडळ बंद करू नये असं त्यांनी या पत्रात
म्हटलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही
त्यांनी या पत्राची प्रत पाठवली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात रासायनिक खतं, बी
बियाणांची दुकानं पुर्ववत सुरू झाली आहेत. लोहा
तालुक्यात आडगावचे प्रगतशील शेतकरी दिगंबरराव क्षीरसागर यांनी काल रासायनिक
खतांची खरेदी केली असून पेरणी पुर्व तयारी सुरू झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार
अंबादास दानवे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यात
लासूर स्टेशन इथल्या कापूस खरेदी केंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. केंद्रामध्ये
कापू खरेदीची स्थिती जाणून घेतली तसंच जिनिंग मालक आणि ग्रेडर यांना शेतकऱ्यांना
अडचण येऊ नये यादृष्टीने काळजी घेण्याच्या
सूचना दिल्या.
****
नांदेड जिल्ह्यात हळदीची काढणी
मध्यावर आली आहे. शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतिचं
हळद बेणं यांच काळात खरेदी करत असतो. गेल्या वर्षी घसघशीत ऊत्पन्न देणारी शंकरा ही जात हळद उत्पादक शेतकरी नरेंद्र
चव्हाण यांनी विकसित केली आहे. या वाणाबद्दल अधिक माहिती देत आहेत शेतकरी नरेंद्र
चव्हाण ....
हे जे बेन आहे ते
सातचं महिन्यात येत. आणि यामध्ये कर्क्युमिने आहे ते PTS 10 मध्ये साधारणतः
चार ते पाच टक्क्यापर्यंत आहे. आणि शंकराच्या
या व्हरायटी मध्ये ते पाच ते सहा टक्के आहे. आणि दुसऱ्या देशांमध्ये
हळदीला आता खूप मागणी वाढणार आहे. आणि त्याचा मोबदला
शेतकऱ्यांना चांगला मिळेल. जेणेकरून शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये
आर्थिक उन्नती होऊ शकते.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर नजिकच्या
पळसपुर शिवारातल्या
एका शेतकऱ्याच्या खोडवा ऊस पिकाला काल दुपारी बारा
वाजता आग लागली. या घटनेत दोन एकरातला
ऊस जळून खाक झाला. यात शेतकऱ्याचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाल्याची
प्राथमिक माहिती आहे.
*****
***
No comments:
Post a Comment