Friday, 24 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24.04.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२४ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
** दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या ग्रामपंचायतींशी आज पंतप्रधानांचा संवाद; एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल, मोबाईल ॲप आणि स्वामित्व योजनेचाही प्रारंभ करणार
** आणखी काही उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्याकरता टाळेबंदीच्या नियमात सवलत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
** केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ दीड वर्षासाठी स्थगित
** केंद्रीय पथकानं कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात केलेल्या सूचनांवर तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
** पवित्र रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ; सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमामाचं आवाहन
आणि
** ज्येष्ठ साहित्यिक चित्रकार प्रकाश कामतीकर यांचं निधन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या सर्व  ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत. कोविड १९च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. टाळेबंदीच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक आहे.
पंतप्रधान येत्या रविवारी २६ तारखेला मन की बात या आकाशवाणी वरच्या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६४ वा भाग असेल.
****
ठप्प झालेलं अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी काही उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्याकरता टाळेबंदीच्या नियमात सवलत दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं काल याबाबत माहिती दिली. यामध्ये खाद्य प्रक्रिया, उत्पादन विभाग, दूध आणि बेकरी, पीठ गिरण्या, मधमाशीपालन, वीटभट्ट्या, इलेक्ट्रानिक दुकानं, प्रिपेड मोबाईल रिचार्ज, दींचा समावेश आहे. शालेय पुस्तकांची दुकानंही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरवणाऱ्यांनाही टाळेबंदीच्या नियमातून सवलत देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
दरम्यान, देशातल्या ७८ जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसांपासून एकही नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातली वाढ दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय काल अर्थ मंत्रालयानं घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचारी तसंच निवृत्तीवेतनधारकांना जानेवारी २०२० पासून देय असलेली महागाई भत्त्याची रक्कम अदा केली जाणार नाही. जुलै २०२० तसंच जानेवारी २०२१ पासूनही देय असलेली महागाई भत्त्याची वाढीव रक्कम मिळणार नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र जुलै २०२१ मध्ये देय असलेली महागाई भत्त्याची वाढ देण्याबाबत निर्णय घेताना, जानेवारी २०२० पासून तीन वेळा अपेक्षित असलेला वाढीव दर दिला जाईल, मात्र या काळातली थकबाकी दिली जाणार नाही. कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रत्येक कुटुंबाला किमान साडे सात हजार रुपये आणि विस्थापित कामगारांना भोजन निवास आणि आर्थिक सुरक्षा मिळणं आवश्यक असल्याचं, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या काल कॉग्रेस कार्यकारी समितीच्या दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्या. कोरोनो विषाणू संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याची टीका गांधी यांनी केली.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं केलेल्या सूचनांवर तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुंबईत आणि पुण्यात हे पथक दाखल झालं असून, मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माद्यमातून संवाद साधला. यावेळी पथकानं राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. राज्यातला विशेषत: मुंबई -पुण्यातला कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्यू दर कमी करणं आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणं याला प्राधान्य असून यादृष्टीनं या पथकामं सूचना केल्या आहेत.
****
राज्याच्या विशेष सहाय्य योजने अंतर्गत केंद्राची इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या तीन केंद्र पुरस्कृत आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा वेतन योजना या दोन राज्य पुरस्कृत अशा पाच योजनांचे तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती दिली. या योजनेच्या सर्व दुर्बल घटकांना या निधीमुळे दिलासा मिळणार असल्याचं ते म्हणाले..

यामुळे राज्यातील दारिद्र्य रेषेखालील तसेच एकवीस हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या वृद्ध, निराधार, अंध, दिव्यांग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परितक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल यांना मोठा दिलासा मिळणार विनंती की तीन महिन्याची रक्कम एकत्रित या पाचही योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते पण बँकेमध्ये आपण गर्दी करू नका करू ना विषाणू हा महाभयंकर आपण त्याच्याशी लढतोय त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने या नियम–अटीI आपल्याला वावरताना सांगितल्या त्याचं पालन करून या रकमेचा आपण लाभ घ्यावा.
****
राज्यात काल एकादिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा सहा हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २८३ झाली आहे. काल ५१ जण या आजारातून बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत ८४० जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद इथं काल आणखी दोन महिलांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळलं आहे. शहरातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता चाळीस झाली आहे. आतापर्यंत शहरात पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, शहरातले १५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा तपासणी अहवाल काल नकारात्मक आल्यानं, बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. आष्टी तालुक्यातल्या पिंपळा इथल्या या रुग्णावर अहमदनगर इथं उपचार सुरु होते.
****
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथल्या कोरोना विषाणू बाधित महिलेच्या निकट संपर्कातल्या ६३ आणि अन्य सहा अशा ६९ जणांच्या लाळेचे नमुने काल तपासणीसाठी पाठवण्यात आले. शिरोडा गावातल्या ८० कुटुंबातील ५६० नागरिकांचं सर्वेक्षणही आरोग्य विभागानं पूर्ण केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत. काल संगमनेर मधल्या चार, तर जामखेड मधल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं मालेगावमधल्या एकूण रुग्णांची संख्या ११० झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण १२४ रुग्ण आहेत. मालेगावातल्या नऊ कोरोना विषाणू बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 
****
अमरावतीच्या दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या दोन्ही महिलांच्या संपर्कात आलेल्या मनुष्य साखळीचा महानगरपालिकेचा आरोग्य विभाशोध घेत आहे.
****
परभणी जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातल्या एकमात्र कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या घरातल्या नऊ जणांचा दुसरा अहवाल नकारात्मक आला आहे. तसंच दिल्लीतल्या मरकज इथल्या कार्यक्रमातून आलेल्या १७ जणांचा दुसरा अहवालही नकारात्मक आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातला कोरोना विषाणू बाधित रुग्ण राहत असलेल्या पीरबुऱ्हाण नगर हा भाग बंदिस्त करण्यात आला आहे. काल या भागातल्या १३ हजार ३०९ लोकांची महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी केली असल्याचं महानगर पालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात २१ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या ३० वर्षीय व्यक्तीचा सारी या आजाराने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सदरील व्यक्ती हा मुंबई येथे कामाला होता. त्या व्यक्तीचा तसंच त्याच्या जवळच्या संपर्कातील दोन नातेवाईकांचे तपासणी अहवाल हे ‘निगेटीव्हआले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
****
राज्याच्या एका मंत्र्यांना कोरोना विषाणू ची लागवड झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.
****
टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर मुंबई आणि पुण्यातून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचं नियोजन करावं, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती पवार यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
****
राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचं पालन करुन मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. टाळेबंदी असल्यानं राज्यातले उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्र बंद असून, त्याचा सर्वसामान्यांनाही फटका बसत असल्यान, योग्य काळजी घेऊन ती सुद्धा सुरु करावी, अशी मागणीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातले इतरही उद्योग व्यवसाय सुरु करुन महसुलात वाढ करावी, असं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचा उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा गरजूंसाठी समाजातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे.
नांदेड शहरातल्या वृतपत्र कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावतीनं अन्नधान्याच्या २०० किटचं वितरण आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड नगर परिषदेचे नगरसेवक संजय आऊलवार यांनी स्वत:च्या शेतातल्या धान्याचं गरजू लोकांना वाटप केलं. मुखेड शहरात फुलेनगर इथल्या सातशे कुटूंबाना नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य दशरथ लोहबंदे यांनी गहू-तांदुळ आदी धान्य आणि कापडी मास्कचं घरपोच वाटप केलं. नांदेड जिल्हा सर्वपक्षीय आंदोलनच्या वतीनं आतापर्यंत पाच हजार लोकांना हे अन्नधान्याच्या कीटचं वाटप करण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातले वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल आलापूरे यांनी त्यांची मुलगी 'कायरा' हिचा दुसरा वाढदिवस साजरा न करता, नगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात शेख गौस यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या 'रोटी-कपडा बँकेस' पाच हजार रुपये रकमेचा धनादेश दिला आहे. या रोटी- कपडा बँकेतून आजपर्यंत १७०० जणांची भोजनाची व्यवस्था तसेच मास्क आणि सॅनिटायझरचं मोफत वाटप करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ शहरातले नागरिक धोंडुलाल राठी यांनी त्यांच्या पत्नी शकुंतला राठी यांच्या निधनानंतर उत्तरक्रिया विधीचा खर्च टाळून एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला.
हिंगोली नगरपालिका मदत संकलन केंद्रातून काल १६८ होमगार्डना जीवनावश्यक साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं. कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा इथं २० तृतीय पंथीयांना जीवनावश्यक साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात टाळेबंदीमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसह गरजुंना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून तयार जेवणाची पाकिटं पुरवली जात आहेत. आजपर्यंत जवळपास दोन लाख ७८ हजार जेवणाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने माध्यान्ह भोजनासाठी आलेला तांदूळ सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळांमध्ये बोलावून वाटप करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत. जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या एक हजार ५१९ शाळांमधील एक लाख ६६ हजार ९८७ विद्यार्थ्यांना तांदळाचं वाटप केलं जात आहे. पालकांनी याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यात हाळी खुर्द इथं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार अॅन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यात पंचावन्न युवकांनी सहभाग घेतला आहे. ही योजना राबवणारी हाळी खुर्द ही जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
दरम्यान, उदगीर इथं जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यवाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो मोफत तांदूळ  वाटप  करण्यात  आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या चुडावा रेल्वे स्थानकाजवळच्या गरीब कुटुंबांना रेल्वे स्थानकातले कर्मचारी आणि स्टेशन मास्टर यांनी अन्नधान्याच्या कीटचं वाटप केलं.
****
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातून काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीअनेक नागरिक तसंच संस्थांनी मदत दिली आहे. कसबे तडवळे इथल्या श्रीराम मंदिर समितीनं  ५१ हजार रुपये, तेर इथल्या रचना कन्स्ट्रक्शन कंपनीनं दहा लाख रुपये आणि दत्तात्रय मुळे यांनी वैयक्तिक पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत. उमरगा तालुक्यातल्या मातोळा इथल्या हनुमान बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं दीड लाख रुपये, तालुका शिक्षक पतसंस्थेनं एक लाख २१ हजार रुपये त तर मुरूमच्या माऊली सहकारी नागरी पतसंस्थेनं एकवीस हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. 
तुळजापूर शहरातले नगरसेवक सचिन पाटील यांनी प्रभाग क्रमांक सात मधील सातशे कुटुंबांना आठवडाभर पुरेल इतक्या भाजीपाल्याच्या किटचे वाटप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते केलं.
****
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातून जालना इथल्या दीडशे खाटांच्या कोरोना विषाणू विशेष रुग्णालयासाठी पुण्याच्या कृष्णा डायग्नोस्टीक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कंपनी दायित्त्व निधीतून २० पोर्टेबल व्हेंटीलेटर आणि पाच हजार मास्क उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्रवण मुथा यांनी काल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केलं.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या वतीनं स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र आणि स्वयंचलित सॅनिटायझर बुथ तयार करण्यात आलं आहे. या यंत्राला हात न लावता सॅनिटायझरचा वापर करता येणार आहे. कन्नड तालुक्यातली सहा गावं या कौशल्य केंद्राच्या वतीनं दत्तक घेन त्याठिकाणी स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र बसवण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रमुख एम.डी. शिरसाठ यांनी सांगितलं. ते म्हणाले...

हाताला जर कोरोना विषाणू लागलेला असेल आणि तोच हात आपण सॅनिटायझर लावत असेल तर ते इंस्ट्रुमेंटल इन्फेक्शन होतात म्हणून आम्ही हा कन्सेप्ट मांडला अतिशय साधा सरळ आहे. ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेंसर त्याला आपण टच स्क्रीन  सॅनिटायझर डिस्पेंसर असं सुद्धा म्हणू शकतो सॅनिटायझर आपण काय आयसोप्रोपाइल अल्कोहो  वापरतो अल्कोहोलचा वापर न करता काही आयुर्वेदिक सुद्धा कॉन्स्टिटूट वापरुन आम्ही सॅनिटायझर वापरणार आहोत सहा गाव आम्ही दत्तक घेतलेले आहेत त्या सहा गावांमध्ये आम्ही हे फ्री ऑफ चार्ज करणार आहोत
****
दरम्यान, विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार निधीतून अंतर्गत २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, याबाबतचं पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. या उपकेंद्रात तज्ज्ञ मनुष्यबळ असून अशी प्रयोगशाळा सुरू करण्याकरिता ६६ लाख ७७ हजार ४७३ रूपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.
****
टाळेबंदीत चढ्या दरानं सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या औरंगाबाद शहरातल्या सिल्लेखाना चौकातल्या मानवता फार्मा या औषधी विक्रेत्याविरूद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे सह आयुक्त संजय काळे यांनी सांगितलं. या कारवाईत त्यांच्याकडचा सॅनिटायझरचा सर्व साठा जप्त करण्यात आला असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद शहरात संचारबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनापरवाना दुकान उघडून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोन दुकानदाराविरोधात तर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल एका दुकानदारावर कारवाई करण्यात आली. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात तर बेकायदेशिर फिरणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. एका महिलेच्या अंत्यविधीला परवानगीशिवाय वीस पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्याबद्दल सुमारे पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहाटे पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्यानं, रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात नोकरीनिमीत्त कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातून बाहेर किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून परभणीत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं पालन न करता अनधिकृतपणे जिल्ह्यात ये जा केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. 
****
पोलिसांना हुलकावणी देऊन परभणीतून नांदेडकडे जाणाऱ्या सात जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सगळ्यांची रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं बाहेरुन आलेल्या ३० ऊसतोड मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या मजुरांना १४ दिवस विलगीकरणात राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
बांधकाम कामगारांनी दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी केलं आहे. राज्य इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांच्या खात्यावर दोन हजार रूपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहेत. अशा वेळेस काही दलाल बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन यासाठी पाचशे रूपये अथवा काही ठराविक रक्कम द्या आणि तुमचे कागदपत्रे द्या असं सांगून फसवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्थानिक उद्योगांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी - सीएसआर जमा करून त्याचा सर्व तपशील सार्वजनिक करण्यात यावा. अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराविरूद्ध लढण्यासाठी जिल्ह्यात फक्त काही मोजक्याच उद्योगांनी आपला सीएसआर निधी दिला आहे. अन्य उद्योगांनी त्यांचा सीएसआर निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
****
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच प्रार्थना करावी असं आवाहन दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी केलं आहे. सरकारच्या सूचनांचं पालन केलं तर आपण कोविड १९ च्या संकटावर मात करु शकू असं त्यांनी म्हटलं आहे. इमामांनी रमजानच्या काळात मशिदींच्या भोंग्यांवरुन कोविड १९ प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी असं दिल्ली वक्फ बोर्डानं सांगितलं आहे.
दरम्यान, रमजान महिन्याच्या काळात कशा पद्धतीने आचरण करावं याविषयी लातूरचे मुफ्ती ओवेस कास्मी यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
जो हिदयात इन्स्ट्रक्शन जारी किए गये है उसका हम रमजान ईद मुबारक में सकती के साथ पालन करे अमल करे रमजान के महीने में तमाम फर्ज नमाजे को पाच से कम आदमी मिलकर उसे अदाह करे रमजान के महीने में तरावीह की नमाज को अपने घरों के अपने फॅमिली के दो चार आदमी मिलकर उसे घरों के अंदर अदाह करे और इफ्तार शहर का जो रोजो का मसला है इसके लिए मस्जिदो के जरिये माइक का इस्तमाल किया जायेगा किसी किसम  की  इफ्तार पार्टी से के सार्वजनिक दावतों से अपने आप को बचाय इससें हम कोरोनाव्हायरस के खिलाफ चल रही लढाई के अंदर अपना सहयोग दे और ताऊन करे
****
ज्येष्ठ साहित्यिक तथा चित्रकार प्रकाश कामतीकर यांचं बुधवारी रात्री पुणे इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या नूतन महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते. सेलू शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. कामतीकर यांनी नाटक, कादंबरी, ललित लेखन, समिक्षा आदी वाड्मय प्रकारात विपुल लेखन केलं. स्वप्नगंधा, त्रिविधा, स्नेहांकित, आत्मबिंब, विकारविलसिते अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. मराठवाडा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचं कला संपादन त्यांनी केलं होतं. त्यांच्या रंग-अनंग या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. मयत दोघे सख्खे भाऊ होते. काल सकाळी ते पोहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.
****


No comments: