Saturday, 25 April 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.04.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

** दुकानं सुरू करायला केंद्र सरकारची सशर्त परवानगी

** दुकानं सुरू करण्यासंदर्भातले निर्देश राज्य सरकारच्या विचाराधीन

** मुंबईत कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव

णि

**नाशिकमधे भीषण आगीत दिडशे झोपड्या भस्मसात

*****

केंद्र सरकारनं आजपासून महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतली दुकानं सुरू ठेवायला सशर्त परवानगी दिली असून हॉटेल, सलून, केशकर्तनालयं मात्र बंद ठेवली जाणार आहेत. देशभर कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर तीन मे पर्यंत लागू टाळेबंदी सुरू असताना या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्रालय प्रवक्त्यांनी या संबंधी माहिती दिली आहे. टाळेबंदीच्या प्रतिबंधांच्या काळात ही सूट केवळ वस्तू विक्री आणि सेवा देणाऱ्या दुकानांनाच देण्यात आली आहे. पन्नास टक्के मनुष्यबळ, शारीरिक अंतराचं पालन, मास्क आणि हात मोज्यांचा वापर अशा अटींसह महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात निवासी भागातील दुकान उघडी ठेवण्यासाठी ही मुभा आहे.  

****

केंद्र सरकारनं जारी केलेल्या या नव्या निर्देशांनुसार राज्यातील दुकानं सुरू करायची काय यावरील राज्य सरकारचा निर्णय मात्र अद्याप व्हायचा आहे. केंद्र सरकारचे हे निर्देश राज्य सरकारच्या सक्रीय विचाराधीन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे निर्देश केंद्र सरकारनं दिले असले तरी राज्यानं अद्याप स्वीकारलेले नसल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं गेल्या सतरा तारखेला प्रामुख्यानं कोरोना विषाणू प्रादूर्भाव नसलेल्या भागात औद्योगिक उपक्रमांना प्रारंभ करण्यास परवानगी दिली होती. सर्वाधिक प्रादूर्भाव असलेल्या मुंबई आणि पुणे विभागांना नंतर यातून वगळण्यात आलं होतं. या भागात पावसाळ्या पुर्वीची तसंच मेट्रो संबंधी कामांना मात्र परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारनं या आठवड्याच्या प्रारंभी विजेचे पंखे विकणाऱ्या दालनांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ज्येष्ठांची शुश्रुषा करणाऱ्यांच्या सेवा सुरू करण्यालाही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.

****

मुंबईत कोरोना विषाणू बाधतांची संख्या वाढतच असून काल एकूण १६८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईत आतापर्यंत या विषाणूचे चार हजार पाचशे एकोणनव्वद रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकूण ५९५ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आज अकरा रुग्ण यामुळे मरण पावले असून मृतांची एकूण संख्या एकशे एकोणऐंशी झाली आहे. मुंबईत तीन हजार ८१५ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये  आज आणखी आठ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानं मालेगावमधल्या रुग्णांची संख़्या आता १२४ झाली आहे. आज आढळलेल्या आठ जणांमध्ये सहा  पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश  आहे.

****

जालना इथं राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि सध्या हिंगोली तालुक्यात हिवरा बेल इथं आपल्या गावी आलेल्या एका जवानाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं. हा रुग्ण हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या जवानांसोबत मालेगावहून जालन्यात उतरला  होता. त्यातील एकला या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याचा शोध घेण्यात आला, तेंव्हा तो गावी असल्याचं स्पष्ट झालं होतं. हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कोरोना विषाण बाधित भागात सेवा बजावल्यानं त्यांचं विलगीकरण करण्यात आलं होतं. या जवानांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली जात होती. गावी आलेल्या या जवानाची माहिती घेऊन त्याची तपासणी केल्यानंतर त्यालाही याची लागण झाल्याचं आज निष्पन्न झालं. या जवानाच्या संपर्कातल्या जवळपास ४६ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या एका सत्तर वर्षीय वयस्क महलेला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं आज स्पष्ट झालं. या महिलेला निमोनीया झाल्यामुळे काल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अधिक तपासणीसाठी त्या महिलेचे लाळेचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या नमुन्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. या अहवालामुळे कोरोना विषाणू मुक्त झालेल्या लातूर जिल्ह्यात पुन्हा या विषाणूचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

मुंबईतल्या एका विशेष न्यायालयानं एल्गार परिषद - माओवाद्यांशी संबंधांप्रकरणी आज नागरी हक्क ार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांचा अंतरीम जामीन अर्ज फेटाळताना त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांनी कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर तात्पुरत्या जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तेलतुंबडे गेल्या चौदा एप्रिल रोजी राष्ट्रीय तपास संस्थेच्या कार्यालयात शरण गेल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज विशेष न्यायालयात सादर करण्यात आलं होतं. आपण श्र्वसनासंबंधी विकारानं ग्रस्त असून तुरुंगात कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा धोका असल्यानं जामीन मिळावा, असं तेलतुंबडे यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं.

****

नाशिक शहरातल्या भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातल्या झोपडपट्टीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत सुमारे दिडशे झोपड्या खाक झाल्या. अग्नीशमन दलाचे एक जवान आग विझवताना जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अन्य काही जवान किरकोळ जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगीची माहिती मिळताच सुमारे २० अग्निशमन बंबांच्या सहाय्यानं दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. या दूर्घटनेत बेघर झालेल्यांची तात्पुरती व्यवस्था बी. डी. भालेकर मैदान इथं करण्यात आली आहे. घरगुती उपयोगाच्या सातपेक्षा अधिक सिलेंडरचा या आगीत स्फोट झाल्यामुळे आगीनं भीषण रुप धारण केलं होतं.

****

वाशिम जिल्ह्यात आढळलेला एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. बरे झाल्यामुळे त्याला आज घरी सोडण्यात आलं.

****

यवतमाळ इथं वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या १५ रुग्णांच्या अहवालात त्यांना कोरोना विषाणुची लागण झाली असल्याचं आज स्पष्ट झालं. त्यामुळे यवतमाळमधे कोरोना विषाणू बाधत रुग्णांची संख्या तीसवर पोहचली आहे. हे सर्व रुग्ण विषाणू बाधितांच्या थेट संपर्कात आले होते.

****

चंद्रपूर जिल्ह्यात बाहेरील देशातून, राज्यातून आणि बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ३२ हजार १३ नागरिकांपैकी २९ हजार ४७८ नागरिकांचं आतापर्यंत १४ दिवसांचं निरीक्षण पूर्ण झालं आहे. जिल्ह्यात दोन हजार ५३५ नागरिक अद्याप निरीक्षणाखाली आहेत. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधत रुग्ण आढळलेला नाही.

****

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या १४ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित २० रुग्णांवर ऊपचार सुरु होते. त्यापैकी १४ रुग्ण बरे होन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील सहा रूग्णांवर `कोविड` रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. एकाच दिवशी ठराविक अंतरानं तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांचे  नातेवाईक आक्रमक झाल्यानं  जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मेंदूज्वर, मुत्रपींड आणि कर्करोग आदी आजार असलेले हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या तिन्ही रुग्णांचे मृत्यू कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेले नाहीत, तरीही खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी स्पष्ट केलं.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उज्वला योजनेचे विविध गॅस कंपन्यांचे ५० हजार ४०३ ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचे प्रत्येकी ७४६ या प्रमाणे एकूण तीन कोटी ७६ लाख ६३८ रुपये केंद्र सरकारन वर्ग केले आहेत. मात्र आतापर्यंत फक्त १९ हजार ५०६ महिला लाभार्थ्यांनी या करता नोंदणी केली असल्यानं उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.  

****

चंद्रपूर जिल्ह्यात टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर विविध ठिकाणी मोहफुलापासून हातभट्टीवर दारू काढण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. हातभट्टीचा हा वाढता पसारा पाहता जिल्ह्यात पोलीस यंत्रणेन विविध भागात छापे टाकून या भट्ट्या उद्धवस्त करण्यासोबतच साहित्यासह २३ लाख ८० हजार ५०० रुपयांची दारू जप्त केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर शेती क्षेत्रातील काम, शेतमाल खरेदी विक्री करण्यास सरकारनं कांही अटींवर मान्यता दिली असल्यानं नांदेड जिल्ह्यात प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या हळद पिक काढणीच्या कामाला वेग आला आहे.
//************//

No comments: