Tuesday, 28 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.04.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २८ एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या २९ हजार ४३५ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यातील सहा हजार ८६८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशामधे यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ९३४ झाली आहे. काल संध्याकाळपासून मरण पावलेल्यांची संख्या ४८ झाली असून त्यातील २७ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
****

 राज्य सरकारनं टाळेबंदीमुळे राजस्थानमधील कोटा इथं अडकलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना परत घेऊन येण्यासाठी शंभर बस गाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कोटा इथं बारावी नंतरच्या प्रवेश परीक्षांसाठी खासगी शिकवणीकरता गेलेले हे विद्यार्थी आहेत.   राज्य परिवह महामंडळाच्या या गाड्या येत्या दोन दिवसांत धुळे इथून कोट्याला पाठवण्यात येतील, असं त्यांनी म्हटलं आहे. धुळ्याला परत आणल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. या विद्यार्थी, पालकांची वैद्यकीय तपासणी केली जाईल तसंच त्यांना निवासस्थानी चौदा दिवस विलगीकरण अनिवार्य असेल, असं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****

 औरंगाबादमधील कोरोना विषाणू बाधीतांची संख्या आता ९५ झाली आहे. आज सकाळी किलेअर्क परिसरात बारा आणि भिमनगर- भावसिंगपुरा भागात एक नवा रुग्ण आढळला आहे. या रुग्णांपैकी सहा रुग्ण सोळा वर्षे वयोगटातील मुलं आहेत तर सात रुग्ण चव्वेचाळीस वर्षे वयोगटातील असून यात चार महिला असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद शहरात काल एकोणतीस रुग्ण आढळले होते. मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्यानंतर हे रुग्ण राहत असलेला परिसर प्रशासनानं प्रतिबंधित केला आहे. रुग्णांच्या निकटच्या संपर्कातल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीला सुरुवात झाली आहे.    
****

 हिंगोली जिल्ह्यातील सेनागव इथं विलगीकरण कक्षात दाखल पाच वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता चौदा झाली आहे.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं आज कोरोना विषाणूचे आणखी ३६ रुग्ण आढळले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता १८१ झाली असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळवलं आहे.
*****
***

No comments: