Tuesday, 16 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 16 JUNE 2020 TIME - 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date  – 16  June   2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –   १६ जून   २०२०   दुपारी १.०० वा.
****
पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग दहाव्या दिवशी वाढ झाली, या दहा दिवसांत पेट्रोलचे दर लीटरमागे पाच रुपये ४७ पैसे तर डिझेलचे दर लीटरमागे पाच रुपये ८० पैशांनी वाढले आहेत. इंधनाचे दर कमी करावेत, आणि सर्वसामान्य नागरिकांना दरकपातीचा थेट लाभ द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी या पत्रात केली असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज मुंबईत दादर इथं राहत्या घरी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. डहाणूतील आदिवासीबहुल भागात जन्मलेल्या रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीनं १९५६ साली सुरू केलेल्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाच्या अनियतकालिकातून पत्रकारितेला सुरुवात केली होती. पत्रकारितेतील लोकशाही मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला. गोवा मुक्ती संग्राम, तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज ९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या आता दोन हजार ९१८ झाली आहे. यापैकी १ हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार २११ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडी, कैसर कॉलनी, चेलीपुरा, उस्मानपुरा, रेहमानिया कॉलनी, खोकडपुरा, न्यु विशाल नगर, बायजीपुरा, एस.टी. कॉलनी, जालान नगर, वडजे रेसिडेन्सी , सिल्क मिल कॉलनी , बन्सीलाल नगर, बालाजी नगर, जयभवानी नगर, कोहिनूर कॉलनी, दिवाणदेवडी, टीव्ही सेंटर, शांतीपुरा, छावणी, रहिम नगर, प्रकाश नगर, बुध्द नगर, हडको, टिव्ही सेंटर , सुधाकर नगर, न्यु हनुमान नगर, इथं प्रत्येकी एक, ईटखेडा, बेगमपुरा, आंबेडकर नगर,  बंजारा कॉलनी,  छत्रपती नगर, जिन्सी, राजा बाजार, शिवाजीनगर, रोजा बाग दिल्ली गेट, गादीया विहार, इथं प्रत्येकी दोन तर भाग्यनगर, एन-11 सिडको, एन-9 सिडको, पुंडलिक नगर इथं प्रत्येकी तीन, चिकलठाणा, गारखेडा परिसर, इथं प्रत्येकी चार आणि, शहानुरवाडी जवाहर कॉलनी ,प्रत्येकी ११ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात, वैजापुर, वाहेगाव, दुधड, कानडगांव, देवगांव रंगारी, लक्ष्मीनगर - वाळुज इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यामध्ये  ५४ पुरूष  आणि ३९ महिला रुग्णांचा समावेश आहे. 
****
जालना जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३०० झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातल्या गुडलागल्ली भागातल्या तीन, जालना तालुक्यातल्या खरपुडीमधील एक, जाफराबाद शहरातले दोन आणि भोकरदन शहरातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
****
अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना संक्रमणात वाढ झाली आहे, या प्रार्श्वभूमीवर नियमाचमं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केलं आज जिल्ह्यात नवीन अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या आता ३५९ झाली आहे.
****
गेल्या २४ तासात देशात दहा हजार ६६७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. आता देशातली एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 91 झाली आहे.मात्र त्यासोबतच बरे होण्याचं प्रमाणही वाढलं असून ते ५२ पूर्णांक ४६ शतांश टक्के झालं आहे. आतापर्यंत एक लाख ८० हजार १३ कोरोना संक्रमित रूग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनानं आतापर्यंत नऊ ह्जार ९०० जणांचा मृत्यु झाला आहे.
****
कोविड-19 च्या प्रार्श्वभूमीवर या वर्षी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस डिजिटल माध्यमांवर साजरा केला जाणार आहे. घरीच योग आणि परिवारासोबत योग हा यंदाच्या या दिनाचा विषय आहे. या दिवशी लोकांनी एकत्र न येण्याचं आणि सकाळी सात पासून आपल्या घरीच राहून योगाभ्यास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.सध्या डीडी भारती या वाहिनीवर सकाळी दररोज सात ते साडे आठ या वेळेत योगाच प्रसारण केलं जात आहे
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी शिथिल झाल्यावर मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेनं अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. टपाल कर्मचारी अत्यावश्यक सेवेतले असूनही त्यांना रेल्वे प्रवासापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती टपाल कामगार सेना सरचिटणीस अजय माने यांनी ई मेलच्या माध्यमातून राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांना केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात औसा इथल्या नियोजित बस स्थानकाच्या इमारतीचं भूमिपूजन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. वर्षभरात या बस स्थानकाचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. औसा तालुक्याची लोकसंख्या आणि इतर बाबी विचारात घेऊन याठिकाणी सुसज्ज बस स्थानक उभारण्यात येणार आहे. सुमारे ४ कोटी २२ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या बस स्थानकात एकाच वेळी चौदा बस थांबतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
****
  

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...