Saturday, 2 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** संपूर्ण देशभरात कोविड लसीकरण मोहीम निःशुल्क - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची घोषणा

** कोविड लसीकरणाची देशभरात रंगीत तालीम; राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये सराव चाचणी यशस्वी

** दहावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आटीआयची विशेष प्रवेश फेरी

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात आज एका ७५ वर्षीय कोविडबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

****

संपूर्ण देशात कोविड लसीकरण मोहीम निःशुल्क राबवली जाणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केलं आहे. ते आज दिल्लीत कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता याची खात्री करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं हर्षवर्धन यांनी नमूद केलं. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही काही अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी आपल्या बालकांना ही लस दिली आणि देश आता पोलिओमुक्त झाला याकडे आरोग्य मंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

कोविड लसीकरणाची आज देशभरात रंगीत तालीम घेण्यात आली. राज्यात पुणे, नागपूर, नंदूरबार आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये ही रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत केटी नगर, डागा रुग्णालय तसंच कामठी उपजिल्हा रुग्णालयात तर पुण्यात औंध रुग्णालय, माण इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड इथल्या जिजामाता रुग्णालयात ही रंगीत तालीम घेण्यात आली.

आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातही लसीकरणाची सराव चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. नंदूरबार इथलं जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी निवड झालेल्या परिचारिका रेश्मा चाफेटकर यांनी, कोविड लस उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रंगीत तालिमीची पाहणी केली. कोविडच्या लसीकरणासाठी मतदान केंद्राप्रमाणे लसीकरण केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. प्रत्येक लसीकरण केंद्रावर तीन कक्ष असतील. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल, दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लस टोचण्यात येईल. तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

लस तयार करणाऱ्या एकूण आठ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी चाचणीचा तिसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, केंद्र शासनाने परवानगी दिल्यास प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं. लसीकरणामध्ये येणाऱ्या अडचणी तसंच संभाव्य चुकांची प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही रंगीत तालीम घेतल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले पाटील यांनी केलं आहे. 

****

पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या कोविशील्ड या कोविड-19 वरील लसीला, तातडीच्या वापरासाठी ठराविक अटीसोबत परवानगी देण्याची शिफारस, भारतीय औषध महानियंत्रकांच्या विषय तज्ज्ञ समितीनं केली आहे. देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा, अशा विविध नियामक अटी या समितीनं सीरम इन्स्टिट्यूटला घातल्या आहेत.

****

केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकरी हिताचे असल्याचा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते. हे कायदे लागू झाल्यावरही कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द होणार नाहीत, तर शेतकरी आपला शेतमाल बाजार समित्यांच्या बाहेरही जादा दराने विकू शकेल. कंत्राटी शेतीमध्येही शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळू शकतात, शेतकऱ्यांचा जर फायदा होत असेल, तर त्याला विरोध करण्याचं कारण काय असा प्रश्न ही चौहान यांनी उपस्थित केला.

****

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याच्या संधीवर मर्यादा घालण्याचा निर्णय मराठा समाजावर अन्यायकारक असल्याचं, संभाजी ब्रिगेडचे माजी बीड जिल्हाध्यक्ष राहुल वायकर यांनी म्हटलं आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांना ही परीक्षा देण्याची संधी सहा वेळा, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना नऊ वेळा तर इतर प्रवर्गातल्या उमेदवारांना मुलांना परीक्षा देण्याच्या संधीवर कमाल मर्यादा लागू नसेल, असा निर्णय आयोगानं घेतला आहे.

****

दहावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आटीआयमधल्या रिक्त जागांसाठी विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना परवा सोमवारी चार जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करणं, तसंच प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातल्या शासकीय तसंच खासगी 'आयटीआय'मधल्या प्रवेशाच्या नियमित चार फेऱ्या तसंच समुपदेशन फेरीही पूर्ण झाली आहे. मात्र दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नंदूरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने बसलेल्या या दोन धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३ पूर्णांक २ दशांश टक्के आणि २ पूर्णांक ६ दशांश टक्के, एवढी नोंदवली गेली. अनेक गावांमधल्या घरांच्या भिंतींना या भूकंपामुळे तडे गेल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

स्वच्छ आणि हरित लातूर हा नवा पॅटर्न आपण निर्माण करू शकू, असा विश्वास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत लातूर शहर महानरपालिकेच्या शपथ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महापालिकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांनी पदाधिकारी तसंच अधिकाऱ्यांचं कौतुक केलं

****

नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष पी आर धुळे यांचं आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी नांदेड इथं अत्यंसंस्कार करण्यात आले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका ७५ वर्षीय कोविडबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आठ नवे कोविड बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाले. आठ रुग्णांना आज सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार ६९४ झाली आहे. त्यापैकी ४४ हजार २१ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.

****

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याला विरोध करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंञी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आज औरंगाबाद इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातल्या रेल्वे सेवेविषयीचा आराखडा जनतेसमोर तत्काळ प्रसिध्द करावा, अशी मागणी विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन समितीच्या वतीनं मध्य रेल्वेच्या अहमदनगर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केलं आहे. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलनाचा इशारा समितीनं दिला आहे.

****

परभणी जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतुक करणारा टिप्पर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. जिंतूर रस्त्यावर धर्मापुरी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. टिप्परमधली सुमारे तीन ब्रास वाळू आणि टिप्पर पोलिसांनी जप्त केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झालं आहे. कळमनुरी इथं उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाची पहिली फेरी आजपासून सुरू झाली. हिंगोली जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

***///***

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...