आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ जानेवारी २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
कोविड लसीकरणासाठी आज देशभरात रंगीत तालीम होणार
आहे. कोविड लसीकरणातल्या संभाव्य अडचणी जाणून घेत, त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करणं,
हा या रंगीत तालिमीचा उद्देश आहे. राज्यात पुणे, नागपूर, नंदुरबार आणि जालना या चार
जिल्ह्यात ही रंगीत तालीम होईल. या चारही जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रात
प्रत्येकी २५ जणांची अभिरुप लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. आज प्रत्यक्षात लस टोचण्यात
येणार नाही, मात्र लसीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवली
जाणार आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन
यांनी काल लसीकरणाच्या रंगीत तालमीच्या तयारीचा आढावा घेतला. या मोहिमेत कोणताही अडथळा
येऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या
आहेत. कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, केंद्र सरकारनं
मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरण सुरुवात करता येऊ शकतं, अशी माहिती राज्याचे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं
प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं कोरोना लसीच्या आयात आणि निर्यातीला
कोणतीही मर्यादा आणि परवान्याशिवाय परवानगी दिली आहे. कोरोना लसीचे वेगवान वितरण होण्यासाठी
हा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना लसीच्या वितरणात प्रभावशाली समन्वय ठेवण्याची
गरज असल्याचं पत्र सीबीआयसीनं क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उत्पादन शुल्क विभागामधल्या
अतिरिक्त आयुक्त अधिकाऱ्याच्या दर्जाच्या अखत्यारीत कृती दल स्थापन करण्याचीही सूचना
सीबीआयसीनं केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी
१७ हजार ३२८ अर्ज दाखल झाले होते, यापैकी ३७१ अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले, तर १६
हजार ९५७ अर्ज वैध ठरले आहेत.
परभणी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातल्या ग्रामपंचायत
निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली, या प्रक्रियेत
एकूण १४५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले, तर १२ हजार ८०७ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्ह्यातल्या
५६६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.
लातूर जिल्ह्यात ४०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी
दाखल एकूण उमेदवारी अर्जांपैकी ९ हजार ९३८ अर्ज वैध ठरले आहेत.
****
No comments:
Post a Comment