आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
११ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
देशात काल दिवसभरात २९ लाख ६५ हजार जणांना कोरोना प्रतिबंधक
लस देण्यात आल्या. भारतानं जगात सर्वात जलद म्हणजे ८५ दिवसांमध्ये लसीकरणाचा १० कोटींचा
टप्पा ओलांडला आहे.
****
दरम्यान, देशात काल दिवसभरात
१ लाख ५२ हजार ८७९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. तर ८३९ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. काल ९० हजार ५८४ रुग्ण बरे झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात
आलं आहे.
****
कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या
उपचारासाठी राज्याला अकराशे एकवीस व्हेंटीलेटर्स उपलब्ध करुन दिले जातील असं केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात माध्यमांशी बोलतांना सांगितलं.तसंच
राज्याला १५ लाख ६३ हजार कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती
जावडेकर यांनी दिली. जावडेकर यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा
करुन राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला,त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सुरु असलेल्या सप्ताहांत टाळेबंदीमुळे
आज सकाळपासूनच औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रस्त्यांवर शुकशुकाट आहे.अत्यावश्यक सेवा
वगळता इतर कारणांसाठी नागरिकांनी बाहेर फिरु नये असं प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर इथले तहसीलदार अविनाश शिंगटे तसंच महसूल सहायक अशोक
मरकड या दोघांना ७० हजार रुपये लाच घेताना, लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक
केली. सातबाऱ्यावरचा बेकायदेशीर शेरा कमी करण्यासाठी या दोघांनी तक्रारदाराकडे एक लाख
२५ हजार रुपये लाच मागितली होती.
****
विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूच्या
अंतर्गत भागापर्यंत, उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे
14 एप्रिलपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात पाऊस होईल
असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment