Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क
लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा.
हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** राज्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गावर उपाययोजनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या उपस्थितीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक, बैठकीनंतर मुख्यमंत्री
जनतेला संबोधित करणार
** पुण्यात पुढील
सात दिवस रात्रीची संचारबंदी
** औरंगाबाद जिल्ह्यात
१८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
** कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर नाथषष्ठी सोहळ्याला
मर्यादित स्वरुपात प्रारंभ
** केंद्र सरकारचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर, जालना जिल्ह्यातील पीरगैब वाडी
ग्रामपंचायतीला पुरस्कार
आणि
** नांदेड जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ९८ टक्के मतदान
****
राज्यातील वाढत्या
कोरोना विषाणू संसर्गावर उपाययोजनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची
शक्यता आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. यात कोरोना
विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात घोषणा करण्याची
शक्यता आहे.
****
पुणे जिल्ह्यात
झपाट्यानं वाढणारा कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुढील सात दिवस सायंकाळी सहा
ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून या संचारबंदीची
कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.
उद्यापासून संध्याकाळी सहा
पासून सकाळी सहा पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळ्या गोष्टीची संचार बंदी असणार
आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पीटल मेडीसीन घेण्यासाठी, न्यूज पेपर विक्रेते, दूध
विक्रेते किंवा या एखादा ईतर अत्यावश्यक सेवेसाठी एखाद्या व्यक्तीला जर बाहेर पडावे
लागले तर ते बाहेर येऊ शकतात. सर्व रेस्टॉरंट, बार हे पुढील सात दिवसांसाठी कम्प्लीटली
बंद राहणार आहे. मात्र पार्सल सेवा, होम डिलिवरी सर्व्हिस तिथे चालू राहणार आहे. एकंदरीत
या सर्व निर्बंधाचा हेतू फक्त आणि फक्त एकच आहे की लोकांचा जीव सुरक्षित असला पाहिजे,
लोकांची जान वाचली पाहिजे.
दरम्यान, पुण्यात
लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत बोलतांना उपमुख्यमंत्री
अजीत पवार यांनी राज्यात संसर्गवाढीचा वेग लक्षात घेता रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व
यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्याचं आवाहन केलं आहे. बाधित
रूग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचं तसंच वाढता संसर्ग रोखण्यासाठी
निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
१८ कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये नऊ पुरुष आणि नऊ महिलांचा
समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार
७२२ झाली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ६२ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले.
त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या आता ८४ हजार २२२ झाली असल्याचं प्रशासनानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
पैठण इथं नाथषष्ठी सोहळा आज मर्यादित स्वरुपात सुरु झाला. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर
सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज गावातील नाथ मंदिरातून मानाची
दिंडी समाधी मंदिरात नेण्यात आली. कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून गर्दी न करता नाथ
वंशज, पुरोहित आणि निवडक भाविकांचा यामध्ये सहभाग होता. उद्या सप्तमीला नाथांच्या वाड्यातील
पादुकांची विधिवत पूजा करण्यात येणार असून कालाष्टमीला नाथ समाधी मंदीरात नाथ वंशजाच्या
हस्ते दही हंडी फोडून नाथषष्ठी सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती नाथवंशज योगिराज
गोस्वामी यांनी दिली आहे.
****
क्रिकेपटू सचिन
तेंडुलकर यांना आज कोविड उपचारासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या शनिवारी तेंडुलकर यांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी बाधित आली होती. तेंडुलकर
यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली असून त्यांनी कोविडविषयक सर्व नियमांचं
काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
****
राज्य शासनाच्या
‘मी जबाबदार’मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना उद्यापासून नऊ मे पर्यंत
जनजागृती अभियान राबवणार आहे. जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज औरंगाबाद
इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केंद्र,
प्रशासकीय यंत्रणा, ज्या गावात कोविडचा प्रार्दुभाव जास्त आहे त्या गावांना भेट आणि
मदत कार्य केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामोहिमेची सुरुवात उद्या कन्नड
तालुक्यातून होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारचे
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा जिल्हा परिषद,
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहाता या दोन पंचायत समित्यांसह
१६ ग्रामपंचायतींनी विविध गटांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत
सशक्तीकरण पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज तसंच राहाता दोन पंचायत समित्यांना
मिळाला आहे. पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये जालना जिल्ह्यातील पीरगैब वाडीचा
समावेश आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या २१ संचालकासाठीच्या निवडणुकीत आज जवळपास ९८ टक्के मतदान झालं. कंधार,
धर्माबाद, हदगाव, भोकर, मुखेड आणि माहूर या तालुक्यात १०० टक्के मतदान झालं. या निवडणुकीत
१८ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून
आले आहेत. उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा पालकमंत्री अशोक
चव्हाण विरूध्द भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या दोन नेत्यांच्या गटात लढत होत
आहे.
****
परभणी जिल्ह्यात
कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर आंतर जिल्हा प्रवासाला बंदी असताना खाजगी
बसने चोरुन प्रवाशांची वाहतुक करताना काल रात्री गंगाखेड इथं तीन बसचालकांवर कारवाई
करण्यात आली. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी आणि महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई
केली.
****
नांदेड येथील सना
ऊर्दू स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद ऐहतेशामुद्दीन यांच आज निधन झालं. ते ७० वर्षांचे
होते. ऐहतेशामुद्दीन हे पाटबंधारे विभागात उपअभियंता म्हणून सेवा निवृत झाले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या बनशेंद्रा इथं आज एका बिबट्यानं शेतकऱ्यावर
हल्ला केला. महेश मोतिंगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गावकरी मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाला
याची कल्पना दिली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान घरकुल
आवास योजनेमध्ये सिंधदुर्ग जिल्ह्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात पहिला क्रमांक
पटकावला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक दीपाली पाटील यांनी
ही माहिती दिली. संपूर्ण देशात जिल्ह्याचा ९३ वा क्रमांक आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या
यादीतील ३ हजार ९९४ कुटुंबापैकी ३ हजार ६५४ कुटुंबाच्या घरकुल यादीला ऑनलाईन मंजुरी
देण्यात आली. ३१ मार्चला पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबाजावणी बाबत शासनानं जाहीर
केलेल्या क्रमवारित ही माहिती देण्यात आली आहे.
****
मार्च महिन्यातील
वस्तू आणि सेवाकराची विक्रमी वसुली हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलांचं
प्रतिक असल्याचं मत केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केलं
आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि वित्तिय सुधारणांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं बजाज
यांनी आज ए एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेतले
सकारात्मक बदल यापुढेही सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेतली
सुधारणा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे असं ते म्हणाले. कोविड 19 च्या वाढत्या प्रसाराबद्दल
विचारलं असता, गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झालं तेव्हा टाळेबंदीच्या
माध्यमातून आपल्याला ते रोखण्याचा प्रयत्न करावा लागला आता मात्र कोरोनाशी दोन हात
करायला सुसज्ज आहोत. पुरेशा वैद्यकीय सुविधा आपण निर्माण केल्या आहेत आणि आता लसही
उपलब्ध आहे असं ते यावेळी म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्गाचं
संकट हे संपूर्ण समाजासाठी आव्हान असून ते आता त्याच्या दुसऱ्या लाटेशी आपली झुंज सुरू
झाल्याचं मत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आज ते बोलत होते.
अशक्य ते शक्य करून दाखवण्याची हीच वेळ आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी
प्रयत्नांची शिकस्त करावी, असंही ते यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment