Wednesday, 21 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीला गळती; २२ रुग्णांचा मृत्यू

** सिरमकडून कोव्हिशील्ड लसीचे दर जाहीर; राज्य सरकारसाठी चारशे रुपये तर खाजगी रुग्णालयांसाठी सहाशे रुपये दर 

** औरंगाबाद इथं आज २८ कोविड बाधितांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे एक हजार ४७ रुग्ण

आणि

** रामनवमीचा उत्सव कोविड नियमांचं पालन करत सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा

****

नाशिक इथं महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीला गळती लागली, त्यामुळे प्राणवायूचा दाब कमी होऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या कोविड रुग्णालयात दीडशे रुग्ण दाखल होते. त्यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या काही रुग्णांना प्राणवायू दिला जात होता. या रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्नही झाला, मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ही घटना विचलित करणारी असल्याचं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर रुग्णालयात अशा प्रकारची घटना होऊ नये, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

****

सिरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती कंपनीनं राज्य सरकार आणि देशातील खाजगी रुग्णालयासाठी कोव्हिशील्ड या कोविड लसीच्या किमतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारला या लसीच्या एका मात्रेसाठी चारशे रुपये तर खाजगी रुग्णालयांना एका मात्रेसाठी सहाशे रुपये दर असेल. सध्या चालू असलेल्या कोविड लसीकरण मोहीमेत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाने ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता लस उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना उत्पादित लसींपैकी ५० टक्के वाटा केंद्र सरकारला द्यावा लागणार असून, उर्वरित ५० टक्के साठ्यातून राज्य सरकार आणि देशातल्या खाजगी रुग्णालयांना कोविड लस विकता येणार आहे.

****

राज्यात रेमडीसिवीर औषधाचा बेकायदा पद्धतीने साठा केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. ते सांगली इथं बोलत होते. कोविड पार्श्वभूमीवर सर्वत्र होणारी गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक टाळेबंदी लावण्याच्या विचारात असल्याचं, शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. प्राणवायू आणि रेमडीसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यसरकार प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात याबाबतची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

मोफत अन्नधान्य वितरण योजनेत कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. याबाबत तक्रारी आल्यास दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना दैनंदिन क्षमतेच्या दीडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत. दरम्यान अन्नधान्यांची आणि आवश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रकार निदर्शनास आले तर कठोर कारवाई करावी असे निर्देशही भुजबळ यांनी दिले आहेत.

****

महाराष्ट्र - गोवा सीमा सिंधुदूर्ग जिल्हा प्रशासनाने आजपासून बंद केली आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन टेस्ट बंधनकारक असणार आहे. चाचणी नंतर कोविड संसर्ग नसलेल्या व्यक्तीलाच महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने गोव्यासह इतर सहा राज्यं ही प्रवासासाठी यापूर्वीच संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत.

****

राज्य सरकारनं छत्तीसगढमधील भिलाई इथून प्राणवायू मागवला असून, आज संध्याकाळपर्यंत प्राणवायूचे २६ टँकर कोल्हापुर रेल्वे स्थानकावर पोहचणार आहेत. हे टँकर उतरवून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर हे टँकर आवश्यकता असलेल्या भागाकडे रवाना केले जाणार आहेत.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी इथं द्रवरुप प्राणवायू निर्मिती करणाऱ्या दोन टाक्या बसवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, खासदार इम्तियाज जलील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी या प्रकल्पाची आज पाहणी केली. या टाक्या सोमवारपासून कर्यान्वित होणार असून यामुळे घाटीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी प्राणवायू सुविधा असलेल्या जवळपास २५० खाटा वाढवता येतील अशी माहिती खासदार जलील यांनी यावेळी दिली.

****

उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात नियोजित प्राणवायू प्रकल्पाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. दहा किलोलीटर क्षमतेचा हा प्रकल्प आजपासून सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे सध्या ३५० रूग्णांना प्राणवायू पुरवला जाऊ शकतो.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज २८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २१ रुग्णांचा समावेश असून जालना, अहमदनगर, बुलडाणा इथल्या प्रत्येकी दोन आणि लातूर इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता दोन हजार २३८ झाली असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख अकरा हजार ९१७ झाली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार ४७ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २२३ रुग्ण हे बीड तालुक्यातील असून त्याखालोखाल अंबाजोगाई १७६, केज १२५, आष्टी १२४, गेवराई १०१, परळी ९०, पाटोदा ५१, माजलगाव ४८, शिरुर ३५ आणि वडवणी इथल्या ३१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४२ हजार ५०५ झाली आहे.

****

जालना शहरात संचारबंदीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांची जागेवरच अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. आज दिवसभरात बसस्थानक परिसरात ७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकजण कोविड बाधित आढळून आला. सदर व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा कोविड रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांनी दिली.

****

रामनवमीचा उत्सव आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं मात्र कोविडचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्यात आला. औरंगाबाद शहरातल्या किराडपुरा इथं रामजन्मोत्सव साध्या पद्धतीनं आणि मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. दरवर्षी मोठ्या उत्साहात याठिकाणी रामजन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मंदीर बंद ठेवण्यात आलं आहे. आज सायंकाळी घरोघरी दिवे लावून तसंच रामरक्षा वाचून रामनवमी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या विविध राममंदिरात साध्या पद्धतीनं पूजा आरती करुन रामजन्म साजरा करण्यात आला.

****

जालना शहरात आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात आज मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पध्दतीनं साजरा कराण्यात आला. मुख्य पुजारी रामदास महाराज आचार्य, यांनी रामजन्माचे पारंपरिक विधी करून हा सोहळा साजरा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आज रामनवमी साधेपणानं तसंच कोविड नियमांचं पालन करत, साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजता अनेक भाविकांनी घरच्या घरी तर बहुतांश राम मंदिरात फक्त पुजाऱ्यांच्या उपस्थितीत राम जन्माचा सोहळा साजरा केला.

****

परभणी शहरासह जिल्ह्यात नागरिकांनी घरच्या घरी रामनवमी साजरी केली. काही ठिकाणच्या मंदिरात फुलांनी सजलेला पाळणा लावून, मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत रामजन्मोत्स साजरा झाला.

****

राज्यात नाशिक इथलं काळराम मंदीर, सज्जनगडावरच्या राम मंदिरातही साधेपणानं रामजन्म साजरा झाल्याचं वृत्त आहे

****

परभणी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांपैकी काही सेवा २५ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. यानुसार, बँका, किराणा दुकानं, भाजीपाला तसंच फळांची दुकानं, बेकरी - मिठाई आदी खाद्य दुकानंही रविवारपर्यंत पूर्ण बंद राहतील.

//***********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...