Wednesday, 7 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** टाळेबंदीचा निर्णय कोणाच्याही विरोधात नाही; व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन; ब्रेक चेन अंतर्गत दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाचा राज्यभरात विरोध

** कामकाजाच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश 

** परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

** औरंगाबाद जिल्ह्यात आज १६ कोविड बाधितांचा मृत्यू

आणि

** बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती

****

टाळेबंदी किंवा निर्बंधाचा निर्णय कोणाच्याही विरोधात नसून, कोरोनाची लाट थोपवण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातल्या विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना, मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं. व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये अशीच सरकारची भूमिका आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी बोलताना, सध्या लागू निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी, व्यापार चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीच्या नियमांचंही काटेकोर पालन होईल, अशी उपाय योजना करण्याची मागणी करतानाच, ब्रेक चेनला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.

****

दरम्यान, ब्रेक चेन अंतर्गत दुकानं, व्यापारी संकुले बंद ठेवण्याच्या निर्णयाचा राज्यात आज ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.

औरंगाबाद इथं जिल्हा व्यापारी महासंघाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगनाथ काळे यांच्या सह सदस्यांच्या एका शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना याबाबत एक निवेदन सादर केलं. जिल्ह्यात सर्व दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, व्यापाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्यावं, अन्यथा व्यापाऱ्यांना सामुहिक आत्मदहनाची परवानगी देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या सिडको इथंही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर मानवी साखळी तयार करून कडक निर्बंधाच्या निषेधाचे फलक झळकावले, तसंच टाळेबंदीच्या विरोधात घोषणाबाजी केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ नियम आणि अटी लावून तसेच कडक निर्बंध करून उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी या मागणीसंदर्भात तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांनी आज आमदार मेघना बोर्डीकर, यांची भेट घेऊन निवेदन दिलं. उद्यापर्यंत सर्वच दुकाने उघडण्याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा परवा एप्रिल रोजी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

****

मुंबई, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर आदी शहरातही व्यावसायिकांनी आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

राज्यातली केशकर्तनालयं ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नाभिक महामंडळानं तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबतच्या शासन निर्णयाची औरंगाबाद इथं होळी केल्यानंतर आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय नाभिक महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी ही माहिती दिली. इतर व्यावसायिकांप्रमाणे केशकर्तनालयं सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, या मुख्य मागणीसाठी हे राज्यभरात प्रत्येक केशकर्तनालयासमोर विविध स्वरुपात आंदोलन करण्यात येणार आहे.

****

कोविड महामारीची दुसरी लाट बघता कोविड प्रतिबंधासंदर्भातल्या नियमांचं पालन होणं अतिशय गरजेचं असून लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर वी. के. पॉल यांनी म्हटल आहे. लोकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

कामकाजाच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत. येत्या रविवारी ११ एप्रिलपासून ही केंद्र सुरू करता येतील. यासाठी कार्यालयात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे शंभर कर्मचारी असणं आवश्यक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

देशात आतापर्यंत आठ कोटी ७० लाख ७७ हजाराहून अधिक कोविड लसीकरण झालं आहे. गेल्या २४ तासात देशात एक लाख १५ हजार ७३६ नव्या कोविड रूग्णांची नोंद झाली तर ५९ हजार ८५६ लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. सध्या देशात आठ लाख ४३ हजार ४७३ सक्रीय रूग्ण आहेत.

****

केंद्राकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी राज्यशासनानं केली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे. लसीचा पुरवठा लवकर आणि गतीनं केल्यानं वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल, असं टोपे यांनी या सांगितलं आहे. २० ते ४० या वयोगटाकोविड संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याने, १८ वर्षापुढील सर्वांच्या लसीकरणाची लवकर परवानगी द्यावी अशी मागणीही केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे केल्याची माहिती टोपे यांनी दिली

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त एक स्पर्धा घेण्यात आली होती, या स्पर्धेतल्या विजेत्यांना, आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिलला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

कोविड महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार पद्धतींचाही वापर करावा, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातल्या सोयी-सुविधा रुग्णांकरता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आज देशमुख यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीमार्फत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातले पाचशेहून अधिक डॉक्टर्स या बैठकीत दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. आयुष उपचार पद्धतीमध्ये  आयुर्वेदिक, होमिओपॅथी, तसंच युनानी उपचार पद्धतीचा समावेश होतो.

****

बीड जिल्ह्यात आज ५८० नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता २९ हजार ७१ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये  बीड १४६, अंबाजोगाई ११४, आष्टी ७१, परळी ६०, केज ५०, माजलगाव ३९, गेवराई ३६, शिरुर २१, पाटोदा १८, धारुर १५ आणि वडवणी इथल्या १० रुग्णांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज १६ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १४ तर जालना तसंच जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये १० पुरुष आणि सहा महिला रुग्ण असून जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता एक हजार ८५८ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ९१ हजार ३२९ झाली आहे.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ११ जागा रिक्त राहिल्या असून उर्वरित ८ पैकी ५ जागा राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पॅनल, १ जागा अपक्ष, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस समर्थकांना प्रत्येकी १ जागा मिळाली. मात्र गणसंख्या पूर्ण होत नसल्याने, संचालक मंडळ स्थापन करता येत नसल्याचं सहकार विभागाने राज्य सरकारला कळवलं होतं. त्यानुसार बँकेवर ५ सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे.

****

पद्मश्री डॉ फातेमा झकेरिया यांच्या पार्थिव देहाचं आज औरंगाबाद इथं मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या परिसरात दफन करण्यात आलं. झकेरिया यांचं काल निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या.

****

औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात शनिवार १० एप्रिल रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत कोविड विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारखांची माहिती जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेत स्थळावरुन किंवा आपल्या वकिलांशी संपर्क साधून प्राप्त करण्याचं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीपाद टेकाळे आणि सचिव एस डी इंदलकर यांनी सर्व संबंधीतांना केलं आहे.

****

मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना आणि बीड जिल्ह्यात ९, १०, आणि ११ या तारखेला सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, आणि पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी तयार पिकांची काढणी करून घ्यावी, तसंच मळणी केलेल्या पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

//*********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...