Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05
April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.
****
गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची, केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबईचे
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर खंडणी मागितल्याचा
आरोप केला असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात
आज झालेल्या सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी
यांच्या पीठानं, परमबीर सिंग यांचे आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचं सांगून, चौकशीचे
आदेश दिले आहेत. सीबीआयनं याप्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, त्याआधारे
सीबीआय संचालक पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करु शकतात, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
छत्तीसगडमध्ये
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गृहमंत्र्यांनी आज जगदलपूर इथं शहीद जवानांना
श्रद्धांजली अर्पण केली. या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
सुकमा आणि विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जगरगुंडा भागात काल झालेल्या या हल्ल्यात २२
जवानांना वीरमरण आलं.
****
देशभरात
आतापर्यंत सात कोटी नऊ लाख नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. देशात काल १६ लाख
३८ हजार ४६४ नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान,
देशात काल नव्या एक लाख तीन हजार ५८५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
४७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण बाधितांची संख्या एक कोटी
२५ लाख ८९ हजार ६७ झाली असून, या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर काल ५२ हजार ८४७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी १६ लाख
८२ हजार १३६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या सात लाख ४१ हजार ८३० रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या सक्रीय रुग्णांची संख्या १५ हजार ३६१ इतकी झाली आहे. जिल्ह्यातल्या
एकूण कोविड बाधितांची संख्या ८८ हजार ४८१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक हजार
७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ३४० रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले आहेत.
****
महामार्गांच्या
बांधकामं करारात झाडं लावण्याचा समावेश असतानाही, झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांची
कामाची देयकं रोखण्याचे निर्देश, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
झारखंडमधल्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते
बोलत होते. झाडं लावण्याच्या कामाचं ई-टॅगिंग करावं, तसंच नोंदी ठेवण्याचे निर्देश
गडकरी यांनी दिले. रस्त्यांच्या, तसंच उड्डाणपुलांच्या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही
तडजोड खपवून घेतली जाणार नाही, दर्जा चांगला नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला परत काम
मिळणार नाही, असा इशाराही गडकरी यांनी दिला.
****
कोविड
बाधित रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवीर इंजेक्शन नांदेड शहरात पुरेशा प्रमाणात
उपलब्ध असून, चार हजार ४४४ इंजेक्शनचा साठा सध्या तयार आहे. शहरातल्या कोविड १९ रुग्णालयाच्या
जवळच्या औषधी दुकानांवर हे इंजेक्शन उपलब्ध होतील, अशी माहिती नांदेडचे अन्न आणि औषध
प्रशासनाचे सहायक आयुक्त आर एस राठोड यांनी दिली. याशिवाय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एक हजार ५१३, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात शंभर
इंजेक्शन सध्या उपलब्ध असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
****
परभणी
जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या वांगी इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध वाळू
उपशावर छापा मारला. याठिकाणी अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही
कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दोन पोकनेल, जेसीबी मशिनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला.
****
वाढत्या
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी धार्मिक स्थळी जाणं टाळावं, असं
आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी
केलं आहे. नागरिकांनी व्यक्तिगत भक्तीपेक्षा सामाजिक तसंच राष्ट्रीय भक्तीस प्राधान्य
देऊन, गर्दी टाळावी, असं फड यांनी म्हटलं आहे.
****
पेठ
- सांगली या १६६ एच राष्ट्रीय महामार्गासाठी २२ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला
आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती
दिली. यामुळे पेठ - सांगली - मिरज या राष्ट्रीय मार्गाच्या कामास गती येणार आहे. सांगली
जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी अलिकडेच गडकरी यांची भेट घेऊन या मार्गासाठी निधी देण्याची
मागणी केली होती.
****
गृह
विलगीकरणात असूनही घराबाहेर फिरणाऱ्या चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर नवी मुंबई
महानगरपालिकेनं कारवाई केली आहे. साथरोग प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत या चौघांवर गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment