Friday, 16 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन लस बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनानं ही परवानगी दिल्यानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकतं, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून, कोवॅक्सीन बनवण्यास एक वर्षांचा कालावधी दिला असल्याचं, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं आहे.

****

बीड जिल्ह्यात परळीच्या थर्मल पावर प्लांट मधल्या युनिट क्रमांक आठ चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, बीड जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे दर तासाला ८६ हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई इथल्या एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण ३०० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल आणि यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.

****

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत असलेले सर्व संरक्षित स्मारकं, स्थळं आणि संग्रहालयं १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली.

****

केंद्र सरकारने वैद्यकीय पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट-पीजी २०२१ परीक्षा देखील पुढे ढकलली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काल याबाबत माहिती दिली. यापूर्वी ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी यांना कंत्राटी तत्वावर वेतन न देता, त्यांना नियमित वेतन श्रेणी नुसार वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिले. त्याचप्रमाणे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या आहेत, त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलं आहे. या निर्देशांनंतर शासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यानं नियोजित संप मागे घेत असल्याचं, संबंधित दोन्ही संघटनांनी जाहीर केलं आहे.

****

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनानं ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेत आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनानं निर्माण करावा, असं ते म्हणाले. अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करावा, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक उपजिल्हाधिकारी यांना, प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ज्या कार्यालयात दहा किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल, अशा ठिकाणी नियोक्त्यानं कार्यालयाअंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, तसंच समितीचा फलक कार्यालय, कंपनीच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक असल्याची माहिती, औरंगाबादच्या जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी, हर्षा देशमुख यांनी दिली.

****

राज्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी, एक हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. या निधीतला सर्वाधिक ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना, विकास कामांसाठी मिळणार आहे.

****

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय लक्ष मानांकनाचा प्लॅटिनम पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय पथकानं या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.  जिल्हा स्त्री रुग्णालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे. 

//**********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...