Monday, 5 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ एप्रिल २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

** पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सात एप्रिलला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून संवाद साधणार

** कोविड रुग्णांवर उपचारासाठी अनामत रक्कम मागणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा

** औरंगाबाद इथं आज सतरा कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

आणि

** औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड

****

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या आदेशानंतर पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याने राजीनामा देत असल्याचं देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

देशमुख यांच्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर असून, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सीबीआयने या  प्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, त्या आधारे सीबीआय संचालक पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करू शकतात, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाने या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, हा सगळा घटनाक्रम एक मोठ्या षडयंत्राकडे निर्देश करत असल्याचं सांगितलं.

 

दरम्यान, विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, देशमुख यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे. मात्र देशमुख यांनी आरोप होताच राजीनामा द्यायला हवा होता, असं ते म्हणाले. देशमुख यांच्यावरचे आरोप आणि सचिन वाझे प्रकरणावर मुख्यमंत्री मौन असल्याबद्दल फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं. देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं, आणि निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा जबाबदारी सांभाळावी, असं फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटलं होतं.

****

महाविकास आघाडी सरकारमधले अन्य एक मंत्री अनिल परब यांचीही चौकशी लवकरच होईल, आणि या सरकारमधले अर्धा डझन मंत्री घरी बसतील, असं भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी आज औरंगाबाद शहरातल्या शासकीय रुग्णालयांची पाहणी केली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कोविड महामारीचा सामना करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका सोमय्या यांनी केली. औरंगाबाद इथं कोविड बाधित रुग्णांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांची सोमय्या यांनी भेट घेतली आणि रुग्णांना होत असलेल्या गैरसोयींबाबत त्यांच्याकडे तक्रार केली.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगड इथं भेट देवून हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. छत्तीसगडमध्ये सुकमा आणि विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जगरगुंडा भागात परवा नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या २३ सैनिकांना वीरमरण आलं होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा सात एप्रिलला सायंकाळी सात वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला जाणार आहे. परीक्षेचा ताणतणाव घालवण्यासंदर्भात या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल, असं पंतप्रधानांनी एका ट्विट मध्ये म्हटलं आहे.

****

कोविड रुग्णांवर उपचारासाठी अनामत रक्कम मागणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते आज जालना इथं बोलत होते. राज्यातले अनेक खाजगी दवाखाने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० हजार रुपये अनामत रक्कम मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हा अक्षम्य गुन्हा असून, या दवाखान्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं केलेल्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री पूर्णपणे विचार करतील, मात्र ही संप करण्याची वेळ नाही, याचं संघटनेनं भान ठेवावं, असं टोपे यांनी सांगितलं. 

****

दरम्यान, जालना जिल्ह्यात गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देणे आणि लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती देण्याचे निर्देश टोपे यांनी दिले आहेत. आज जालना इथं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते. मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. शासकीय आणि खासगी रुग्णालयातील खाटांचे एककेंद्रीय पद्धतीने नियोजन करणे, ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत प्रशासनाला त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

****

औरंगाबाद महापालिकेच्या जम्बो कोविड लसीकरणाला आजपासून प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शहरातील सर्व नऊ प्रभागांमध्ये  ४५ वर्षे वयाच्या पुढील दोन हजार ७६१ नागरिकांनी पहिल्याच दिवशी लस घेतल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे.

****

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सतरा कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जळगाव आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५ मृतांमध्ये ११ पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ८०३ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ८८ हजार ४८९ झाली असून १५ हजार ३६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज ५७५ नवे कोविड रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या २७ हजार ७७५ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १५० रुग्ण बीड तालुक्यात आढळले, त्याखालोखाल अंबाजोगाई १२७, आष्टी ८०, केज ५०, परळी ४८, माजलगाव ३५, पाटोदा २९, शिरुर २४, गेवराई १८, धारुर ११ आणि वडवणी इथल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून मदत करण्याची विनंती आमदार आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. अशा कुटुंबांना किमान ५ लाख रुपये मदत द्यावी अशी विनंती शेलार यांनी केली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत १०० पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यातले बहुसंख्य पत्रकार ग्रामीण भागात पत्रकारिता करणारे होते. त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं, शेलार यांनी पत्रात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या अशा मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्याची योजना सुरू केली असून, राज्य शासनानंही अशी मदत करावी असं, शेलार यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतल्यानं नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक सिल्लोडचे अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदी विजयी झाले आहेत. उपाध्यक्षपदासाठी कृष्णा पाटील डोणगावकर, दिनेश परदेशी, अर्जुन गाढे, जगन्नाथ काळे, आप्पासाहेब पाटील हे पाच जण रिंगणात होते.

****

पंढरपूर इथलं श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर समितीनं घेतला आहे. मात्र विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. तसंच इतर सणवार, उत्सवही परंपरेनुसार साध्या पद्धतीनं साजरे करण्याचा निर्णयही मंदिर समितीनं घेतला आहे. समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, तसंच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी याबाबत एक पत्र जारी केलं आहे.

****

तुळजापूर इथलं तुळजाभवानी मंदीर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले. या काळात भाविकांनी देवीचं ऑनलाईन दर्शन घ्यावं, असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्राच्या एकूण कोविड मृत्यूंपैकी १४ % मृत्यू नांदेड जिल्ह्यात होत आहेत. ही बाब गंभीर असून, वाढती रुग्ण संख्या आणि मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने नांदेड जिल्ह्यात आरोग्य पथक पाठवून उपाय योजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरताळे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी पंतप्रधान कार्यालयास ईमेल व्दारे पाठवलं आहे.

****

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी खासदार निधीतून कार्डियाक रुग्णवाहिका परभणी जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून दिली आहे. या रूग्णवाहिकेचं मान्यवरांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आलं.

//**********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...