Sunday, 11 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशभरात आजपासून सुरू झालेल्या चार दिवसीय कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण महोत्सवाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. प्रत्येकाचं लसीकरण, प्रत्येकाला उपचार, प्रत्येकाचा बचाव, आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचं समाजाकडे नेतृत्व, या चतु:सूत्रीचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ज्येष्ठ नागरीक आणि गरजवंत तसंच जे अशिक्षित आहेत, ज्यांच्याकडे साधनांची कमतरता आहे, अशा लोकांना युवकांनी, लसीकरणासाठी मदत करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. कुटुंबातल्या सदस्यांच्या लसीकरणाची जाबाबदारी घरातल्या महिलांनी घ्यावी असं पंतप्रधान म्हणाले. या चार दिवसात लसीकरण मोहिमेमुळे कोरोना विषाणू संसर्गा विरुद्धच्या लढाईत वैयक्तिक, सामाजिक, प्रशासकीय तसंच राष्ट्रीय स्तरावर नक्कीच भरघोस यश मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

****

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्र देशभरात अग्रणी राज्य ठरलं आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी जणांना लस देण्यात आली आहे. कोविन पोर्टल ॲपवरील माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं  राज्य ठरलं आहे.

****

केंद्र सरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे असं त्यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे.

****

राज्य सरकारनं कडक टाळेबंदीचे संकेत दिले आहेत, मात्र यामुळे गोरगरीब, श्रमिक आणि हातावर पोट असणाऱ्या वर्गाला आर्थिक फटका बसेल त्यामुळे तातडीने या वर्गांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड रेवण भोसले यांनी उस्मानाबाद इथं केली आहे. सरकार तीन आठवडे टाळेबंदी लागू करण्याच्या विचारात आहे, त्यामुळे सामान्य जनतेच्या किमान एक महिन्याच्या निर्वाहाची सोय करावी, राज्यातील गरीब दोन कोटी कुटुंबांना प्रत्येकी साधारण दहा हजार रुपयांची थेट मदत, एक वा दोन टप्प्यात देण्याची मागणी भोसले  यांनी केली आहे.

****

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जीवनभर महिलांच्या शिक्षण आणि सशक्तिकरणासाठी  महात्मा ज्योतिबा फुले वचनबद्ध राहिले. सामाजिक सुधारणांप्रतिची त्यांची निष्ठा भावी पिढ्यांना प्रेरीत करत राहिल असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

मुंबईतील अँटीलिया इमारतीजवळ मोटारीत शस्त्र ठेवण्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पोलिस निरीक्षक रियाझ काझी याला आज अटक केली. काझी हा या प्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा निकटचा सहकारी आहे.

****

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याजवळ आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चालत्या ट्रकला आग लागून ट्रकमधील सर्व सामान जळून खाक झालं. या ट्रकमध्ये औेषधी, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तू आणि इतर साहित्य होतं.  तो दिल्लीहून हैद्राबादला जाहोता. आग लागल्याचं लक्षात येताच चालक आणि त्याच्या सहाय्यकानं ट्रक थांबवून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

****

मराठवाड्यासह दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह  पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत सर्वत्र सोसाट्याचा वारा वाहण्याचीही  शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातले दिव्यांग आरोग्य सहाय्यक भारत नरवाडे यांना मारहाण केल्या प्रकरणी तलाठी गजानन शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तलाठी शिंदे हे खळी इथल्या आरोग्य विभागात विनामास्क गेले असता, नरवाडे यांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितलं. त्यावरून संतापलेल्या शिंदे यांनी नरवाडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी तलाठी शिंदे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली.

//********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...