Sunday, 4 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड १९ चा वाढता प्रसार आणि प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेत आहेत. मंत्रीमंडळ सचिव, पंतप्रधानांच्या प्रधान सचिवासह सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आज दुपारी ३ वाजता मंत्रीमंडळाची बैठक घेणार आहेत.

****

देशात आतापर्यंत ७ कोटी ४४ लाखहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.काल एका दिवसात लसीकरणाच्या ७८ व्या दिवशी  १३ लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं.

****

राज्यात काल एकाच दिवशी ४ लाख ६३ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. या लसीकरणाची राष्ट्रीय स्तरावर विक्रमी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचं याबद्दल अभिनंदन केलं आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रात आतापर्यंत ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा पध्दतीने लसीकरणाचा वेग राहिल्यास लवकरच राज्यात रोज सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचं उद्दीष्ट गाठता येईल असा विश्वास मुख्यंमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात मुंबई उपनगर, नागपूर आणि ठाणे हे  जिल्हे लसीकरणात आघाडीवर असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचे संकेत दिल्यामुळे परराज्यातील मजूर आपापल्या गावी परतू लागले आहेत. सांगली जिल्ह्यातल्या मिरज रेल्वेस्थानकावर उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमधील मजुरांची परतीसाठी गर्दी होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्यावर्षी टाळेबंदीत गावी गेलेले मजूर मध्यंतरी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा कामावर परतले होते.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारनं दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात बानुरगड इथं बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. शिवकाळात संपर्काची साधनं कमी असतांना देखील बहिर्जी नाईक यांनी गुप्त माहिती जमा करण्याचं काम केलं, स्वराज्यासाठी मोलाचं कार्य केलेल्या अशा शूरांचा इतिहास जगासाठी प्रेरणादायी असून पर्यटकांना समाधी स्थळी जाता यावं यासाठी आवश्यक त्या सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिल्या जातील असं खानापूर आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. माहूर तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून प्रा. राजेंद्र केशवे, नायगाव मतदार संघातून माजी आमदार वसंतराव चव्हाण, मुखेड मतदार संघातून  माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मुदखेड मतदार संघातून गोविंदराव शिंदे नागेलीकर, कंधार मतदार संघातून प्रविण पाटील चिखलीकर, अर्धापूर मतदार संघातून बाबुराव कदम कोढेकर, किनवट मतदार संघातून दिनकर दहिफळे, तर लोहा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळकर यांचाही विजयी उमेदवारात समावेश आहे. पतसंस्था मतदार संघातून शिवराम लुटे विजयी झाले. परवा दोन तारखेला १७ जागांसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात विज बिल थकित असल्यानं काही ठिकाणी वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना आणि परिसरातील वन्य जीवांनाही पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. खामसवाडी परिसरात पाण्याच्या शोधात वन्य प्राणी अनेक शेतातील रस्त्याच्या कडेच्या पाणवठ्यावर सायंकाळी येतात मात्र, कुठेच पाणी नसल्यानं हरणांच्या  कळपासह अन्य रानटी प्राणी दुपारच्या वेळेतही रस्त्यांवर आढळून येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्रसिद्ध किर्तनकार पांडुरंग महाराज पाटोळेकर यांचं आज निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातले पाटोळेकर महाराज यांनी संत विचार प्रसारामध्ये मोलाचं कार्य केलं आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि रामायणावर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं.

****

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात काल माओवाद्यासोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे २जवान मरण पावले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याबाबत दुख व्यक्त केलं असून सुरक्षा जवानांची हत्या होणं हे क्लेशदायक असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. या चकमकीत नऊ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर सुरक्षा दलाचे २१ जवान बेपत्ता असल्याचं आढळून आलं होतं. सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली, तिने या बेपत्ता जवानांचा शोध घेण्याचं काम केलं त्यांना घटनास्थळी २० मृतदेह आढळून आले.

//********//

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...