Friday, 2 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.

****

·      राज्यातल्या विविध रस्त्यांच्या कामांसाठी, केंद्र सरकारकडून दोन हजार ७८० कोटी रुपयांचा निधी.

·      वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून एक लाख २३ हजार ९०२ कोटी रूपयांचं विक्रमी महसूलंकलन.

·      अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश रद्द.

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा न घेण्याचा निर्णय.

·      देशभरातील सर्व कोविड लसीकरण केंद्रं, सर्व सुट्ट्यांच्या दिवशीदेखील सुरू राहणार.

·      राज्यात ४३ हजार १८३ नविन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ९३ जणांचा मृत्यू तर चार हजार ८३४ बाधित.

·      औरंगाबाद शहरात मास्क नसलेल्या ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश न देण्याचा जिल्हा व्यापारी संघटनेचा निर्णय.

आणि

·      औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या विविध राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या कामांसाठी, दोन हजार ७८० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली. जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ‘७५३ जे’ च्या विस्तारीकरणासाठी, २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी, १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग असेल. तसंच राष्ट्रीय महामार्ग ‘३६१ एफ’ च्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी, २२२ कोटी ४४ लाख रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग ७५२ वर जालना परभणी दरम्यान वाटूर ते चारठाणा रस्त्याच्या दुहेरीकरणासाठी २२८ कोटी मंजूर करण्यात आले असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या माध्यमातून मार्च २०२१ पर्यंत एक लाख २३ हजार ९०२ कोटी रूपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. हा कर लागू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वाधिक महसूल आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात जमा झालेल्या महसुलापेक्षा, हा महसूल २७ टक्क्यांनी अधिक आहे. अर्थ मंत्रालयानं ही आकडेवारी दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतरच्या काळात गेल्या सहा महिन्यात, आर्थिक सुधारणा झपाट्यानं होत असल्याचा कल दिसत आहे. या महसुलानं एक लाख कोटीचा जो टप्पा गाठला आहे हे त्याचचं द्योतक असल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. बनावट देयकांवर ठेवलेलं बारीक लक्ष, जीएसटी, प्राप्तीकर आणि सीमाशुल्क प्रणालीसह, विविध स्त्रोतांकडून येणाऱ्या माहितीचं सखोल मूल्यमापन, तसंच प्रभावी कर प्रशासन, यामुळे हा विक्रमी महसूल जमा झाल्याचंही सरकारनं सांगितलं.

****

अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारनं रद्द केला आहे. अल्प बचत योजनांवरचा व्याजदर मार्च २०२१ च्या स्तरावर कायम राहील, असं अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं. २०२०-२०२१ च्या शेवटच्या तिमाहीतले व्याजदर तसेच राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे. हा निर्णय अल्पावधीत फिरवण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांच्या टीकेचं लक्ष्य बनला आहे.

****

राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुढील वर्षापासून युवा शेतकरी आणि कृषि संशोधक हे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, आता पुरस्कारांची संख्या ६३ ऐवजी ९९ झाली आहे. तसंच या पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचंही भुसे यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातल्या ग्रामीण भागात घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी आणि त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या महाआवास अभियानाला एक मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च पर्यंत होती, मात्र ग्रामीण भागात या अभियानाला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महाआवास अभियानाला चांगलं यश मिळालं असून, ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत, राज्यात सात लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचं बांधकाम करण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

अभिनय क्षेत्रातला सर्वाधिक प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, प्रसिद्ध सिने अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकार आणि पुरस्कार समितीच्या सदस्यांचे आभार मानले. आपल्या प्रवासात सहभागी असणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं, त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे यावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल या संदर्भातली घोषणा केली. रजनीकांत यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं असल्याचं, जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांचं या पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा यंदा घेण्यात येणार नाहीत. विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी ही माहिती दिली. बारावीच्या प्रात्यक्षिक परिक्षा मर्यादित स्वरुपात घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परिक्षेऐवजी प्रात्यक्षिकावर आधारित विशिष्ट लेखनकार्य, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही अथवा गृहपाठ यांचा समावेश असेल, असं पुन्ने यांनी सांगितलं.

दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेचं प्रवेशपत्र येत्या शनिवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं.

****

कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी देशभरातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातली सर्व लसीकरण केंद्रं, कोणतीही सुटी न घेता संपूर्ण महिनाभर सुरू ठेवण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व सुट्ट्यांच्या दिवशीदेखील ही केंद्रं सुरु ठेवता यावीत यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी, असे लेखी आदेश सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

****

राज्यात काल ४३ हजार १८३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २८ लाख ५६ हजार १६३ झाली आहे. काल २४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ८९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९२ शतांश टक्के झाला आहे. काल ३२ हजार ६४१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २४ लाख ३३ हजार ३६८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ६६ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या चार हजार ८३४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३४, नांदेड जिल्ह्यातल्या २६, परभणी ११, जालना सात, बीड सहा, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी चार, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४८१ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९९५, लातूर ७०७, जालना ४७३, परभणी ४००, बीड ३९३, उस्मानाबाद २८३, तर हिंगोली जिल्ह्यात १०२ रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद शहरात ४५ वर्षांवरील व्यक्तींना कालपासून कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली. शासनाच्या २५ आणि खाजगी २० अशा ४५ लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येत आहे. काल या लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत औरंगाबाद शहरातल्या एक लाख ३७८ नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

परभणी जिल्ह्यातल्या ५६ केंद्रांवर ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यात १०० केंद्रांवर काल तीन हजार ९७५ जणांना लस टोचण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या ४०२ केंद्रांवर, बीड जिल्ह्यात ११९ केंद्रांवर तीन हजार २४२ जणांना, तर हिंगोली जिल्ह्यात ३३ केंद्रांवर ३५३ नागरीकांचं लसीकरण करण्यात आलं.  

****

औरंगाबाद शहरात मास्क नसलेल्या ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा व्यापारी संघटनेनं घेतला आहे. जिल्हा व्यापारी महासंघ आणि संलग्न संघटनांच्या काल झालेल्या बैठकीत, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लस घेतली. ही लस पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी सरकारच्या निर्देशानुसार लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन या संसर्गविरोधातल्या लढाईला अधिक बळ द्यावं असं आवाहन निलंगेकर यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या निर्णयात काहीशी शिथिलता आणत आजपासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व आस्थापना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुपारी दोन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याचं, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात छोट्या व्यावसायिकांना व्ययसाय सुरू करू देण्याच्या मागणीचं निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. या निवेदनात पानं तसंच चहाची छोटी दुकानं, खाजगी शिकवण्या, खानावळ हे कोविड प्रतिबंधाचं पालन करत ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.  

****

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातली ‘सिटीस्कॅन’ यंत्रणा त्वरीत सुरु करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. खाजगी कोविड रुग्णालयांना तसंच ‘सिटीस्कॅन’ आणि ‘एक्स-रे’ सेवा देणाऱ्या रुग्णालयांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार शुल्क आकारणी करावी, आणि रुग्णालयाच्या दर्शनी भागांवर दरपत्रक लावणं बंधनकारक करावं, अशी मागणीही पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात लावण्यात आलेली संचारबंदी तत्काळ रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. जिंतूर-सेलू मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड संसर्गाच्या काळात रेमडेसीवीर नावाच्या इंजेक्शनची औषधी दुकानदारांनी कृत्रिम टंचाई निर्माण केली असून, याचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार आहे. या औषधी दुकानदारांवर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.

****

छोट्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोविड प्रतिबंध नियमांचं पालन करत हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासन, पोलीस दल, नगरपालिका, जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं काल बस स्थानकासमोर गर्दीच्या ठिकाणी नागरीकांना मास्क वाटप करण्यात आले.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांनी काल मुंबईत, शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री सुभाष देसाई तसंच रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर आणि कृष्णा पाटील डोणगावकर यांनाही यावेळी शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १२० किलोमीटर लांबीच्या १७ रस्त्यांसाठी, १०१ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामधे उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, लोहारा, कळंब, भूम, परांडा आणि वाशी तालुक्यातील एकूण १७ रस्त्यांचा समावेश आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या बस गाड्यांवरच्या बंदीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मध्य प्रदेश सरकारनं यापूर्वी ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू केले होते. मध्य प्रदेशमध्ये वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली असून, त्यानुसार बस बंदीचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.

****

असंघटित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात येत्या पाच तारखेला आरोग्य मंत्री, कामगार मंत्री आणि परिवहन मंत्री तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांबरोबर बैठक घेणार असल्याची माहिती, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल मुंबईत दिली. कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्यानं वाढायला लागली असल्यामुळे, पुन्हा अनेक असंघटित कामगारांच्या मनात गावी जाण्याचे विचार सुरू झाले असल्यानं, त्यावर आवश्यकतेनुसार उपाय योजन्यासंदर्भात ही बैठक असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...