Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03
April 2021
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०३ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क
लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ
ठेवा.
****
·
राज्यात पूर्ण टाळेबंदी
लावण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्र्यांचा इशारा.
·
औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्सिजनची
दीड हजार जंबो सिलिंडर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू.
·
बीड जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी बंधनकारक.
·
राज्यात नवे ४७ हजार ८२७
कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल ८४ रुग्णांचा मृत्यू तर पाच हजार २५३ रुग्णांची नोंद.
आणि
·
पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला
मर्यादित स्वरुपात सुरवात; सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक सोहळा रद्द.
****
राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या
रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातल्या उच्चस्तरीय
अधिकाऱ्यांची काल मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली, या बैठकीनंतर सामाजिक संपर्क माध्यमावरून
जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. पूर्ण टाळेबंदीबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय
घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
अर्थचक्रही फिरवायचंय. गरीबाची
रोजीरोटीही वाचवायचीय. पण त्याचबरोबरीने सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचेत.
म्हणून जीवाला पहिले महत्व द्यायचे आहे. म्हणून आजसुध्दा मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा
देतो आहे, लॉकडाऊन जाहीर करत नाहीये. पण एक-दोन दिवसांमधे जर का दृश्य स्वरूपामधे या
गोष्टी आढळल्या नाहीत आणि दुसरा उपाय जर मी आता पुढच्या एक-दोन दिवसांत ज्यांच्याबरोबर
बैठका घेतोय. त्यांच्याकडनं आला नाही तर मग मात्र आहे ती परिस्थिती अशीच्या अशी स्विकारायची
मला नाही जमणार. म्हणून आत्तापासून आपण ठरवलं पाहिजे की ही लाट तर मी रोकेनच आणि पुढची
लाट तर मी येऊच देणार नाही.
****
सध्याच्या वेगानं रुग्ण संख्या वाढत राहिली तर १५ ते २०
दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील, त्याही वाढवण्याचे आदेश दिले
आहेत. पण सामान्य रुग्णखाटा, अतिदक्षतेसह रुग्णखाटा, व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय उपचार
साहित्य वाढवता येईल, पण रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी
कसे वाढवता येणार, हा चिंतेचा विषय असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
कोविडच्या गंभीर संकटात राजकारण बाजूला ठेऊन सहकार्य करण्याचं
आवाहन, मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांना केलं. टाळेबंदीला विरोध करुन रस्त्यावर
उतरण्याचा इशारा देणाऱ्यांना समजावतांना मुख्यमंत्री म्हणाले –
जे सांगतायत की लॉकडाऊन केला
तर आम्ही रस्त्यावर उतरू. माझं म्हणणं आहे जरूर उतरा. उतरलंच पाहिजे. पण ते लॉकडाऊनच्या
विरोधात नाही तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरोधात उतरा. या डॉक्टर्सना मदत
करायला तुम्ही रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमधे कर्ते-करविते ह्यांचा मृत्यू झालेला
आहे, त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यावरती रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमधे सगळेच्या
सगळे कोरोनाबाधीत झालेले आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती उतरा. यंत्रणा
जी करते आहे ट्रॅकिंग, ट्रेसिंग त्यांना मदत करायला म्हणून रस्त्यावरती उतरा.
****
पुणे जिल्ह्यात झपाट्यानं वाढणारा कोरोना संसर्ग आटोक्यात
आणण्यासाठी पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात
आली आहे. उद्यापासून या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त
सौरभ राव यांनी ही माहिती दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्यात संसर्गवाढीचा
वेग लक्षात घेता रुग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधा
उपलब्धतेवर भर देण्याचं आवाहन केलं आहे. बाधित रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही,
याची दक्षता घेण्याचं, तसंच वाढता संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचं काटेकोरपणे पालन
करण्याची सूचनाही, त्यांनी यावेळी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची
कमतरता पडू नये, म्हणून दीड हजार जंबो सिलिंडर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात
आली असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी ५० जंबो सिलिंडर्स राखीव ठेवण्यात आले असल्याची
माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. ते काल या संदर्भात घेतलेल्या बैठकीत
बोलत होते. जिल्ह्याला चाकण, पुणे आणि रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ऑक्सिजन
टँकर्सला प्रवासात अडथळा येऊ नये, म्हणून या टँकर्सला सायरनसह लाल दिवा लावण्यात येईल,
त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करुन देण्यात येईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या पूर्ण टाळेबंदी
लागू राहणार आहे. या दरम्यान, सर्व अत्यावश्यक सेवा धारकांना पेट्रोल पंप चालकांनी
इंधन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीची
वेळ वाढवण्यात आली आहे. आता रात्री आठ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
येत्या १५ एप्रिलपर्यंत ही संचारबंदी लागू असेल.
****
परभणी जिल्ह्यात कालपासून संचारबंदीत सकाळी सात ते दुपारी
दोन वाजेपर्यंत शिथीलता देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच व्यापाऱ्यांनी दुकानं
उघडल्यानं, नागरिक, विशेषत: महिलांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचं दिसून आलं.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पाच एप्रिलपर्यंत संचारबंदीत वाढ केली आहे. ही संचारबंदी
रद्द करण्याची मागणी व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधींनी केली होती. या पार्श्वभूमीवर
ही शिथिलता देण्यात आली आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी
पूर्णतः उठवण्याच्या मागणीसाठी, लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपत भिसे यांच्यासह समविचारी
नागरिक आणि व्यापाऱ्यांनी, काल दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गोरगरीब,
कष्टकरी, सामान्य जनतेला रोजगारापासून वंचित ठेवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील छोटे व्यापारी, मजूर, भाजीपाला विक्रेते, हमाल यांच्यासह नागरिक आणि लाल सेनेचे
कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
****
बीड जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची
अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून, खाजगी रुग्णालयात अँटिजेन
चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. ही चाचणी केल्याशिवाय रुग्ण तपासणी करू नये, असे
आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. खासगी नर्सिंग होममध्ये दाखल रुग्णांची
तसंच बाह्यरुग्ण म्हणून आलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी संबंधित नर्सिंग होमला बंधनकारक
करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयातल्या रुग्णांची कोविड तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्य
चिकित्सकांनी एका नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचेही आदेश दिले आहेत. या तपासण्यांसाठी
खासगी रुग्णालयांनी आवश्यक किट विकत घ्यावे, मात्र तपासणीसाठी शासन निर्णयाच्या कमाल
मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केलं
आहे.
****
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना काल कोविड उपचारासाठी
मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या शनिवारी तेंडुलकर यांची कोरोना
विषाणू संसर्ग चाचणी बाधित आली होती. तेंडुलकर यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे
ही माहिती दिली असून, त्यांनी कोविडविषयक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन,
जनतेला केलं आहे.
****
राज्य शासनाच्या ‘मी जबाबदार’मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी
करण्यासाठी, शिवसेनेच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून नऊ मे पर्यंत जनजागृती अभियान
राबवलं जाणार आहे. जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी
बोलतांना ही माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केंद्र, प्रशासकीय
यंत्रणा, ज्या गावात कोविडचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या गावांना भेट देऊन, मदत कार्य
करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज कन्नड तालुक्यातून या मोहिमेची सुरवात होणार असल्याचं
दानवे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कोरोना विषाणू संसर्गाला
अटकाव करण्यात संपूर्ण अपयश आलं असून, या सरकारच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठल्याचा
आरोप माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत
होते. घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार, अशी टीकाही
त्यांनी केली.
****
राज्यात काल ४७ हजार ८२७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २९ लाख चार हजार ७६ झाली आहे. काल २०२ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
५५ हजार ३७९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९१ शतांश टक्के झाला आहे. काल २४ हजार
१२६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २४ लाख ५७ हजार ४९४ रुग्ण,
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक ६२ शतांश टक्के झाला
आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ८९ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या पाच हजार २५३ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाली, तर ८४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या ३३, नांदेड जिल्ह्यातल्या २३, जालना नऊ, लातूर सात, परभणी सहा, हिंगोली
चार तर बीड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४२७ रुग्ण आढळले. नांदेड
जिल्ह्यात एक हजार ३४६, लातूर ७६९, जालना ४९३, बीड ३८३, परभणी ३६७, उस्मानाबाद २९२,
तर हिंगोली जिल्ह्यात १७६ रुग्ण आढळून आले.
****
केंद्र सरकारचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले
असून, यामध्ये राज्यात सातारा जिल्हा परिषद, कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज आणि
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता या दोन पंचायत समित्यांसह, १६ ग्रामपंचायतींनी विविध
गटांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, सातारा
जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज तसंच राहाता दोन पंचायत समित्यांना मिळाला आहे. हाच
पुरस्कार ग्रामपंचायत गटात जालना जिल्ह्यातल्या पीरगैब वाडीला मिळाला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं नाथषष्ठी सोहळा काल मर्यादित
स्वरुपात सुरु झाला. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा सोहळा सार्वजनिक
स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. काल गावातल्या नाथ मंदिरातून मानाची दिंडी समाधी मंदिरात
नेण्यात आली. नाथ वंशज, आणि निवडक भाविकांचा यामध्ये सहभाग होता. आज नाथांच्या वाड्यातील
पादुकांची विधिवत पूजा करण्यात येणार असून, उद्या कालाष्टमीला नाथ समाधी मंदिरात नाथ
वंशजाच्या हस्ते दही हंडी फोडून, नाथषष्ठी सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती, नाथवंशज
योगीराज महाराज गोसावी यांनी दिली.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याच्या मढी इथल्या श्री क्षेत्र
कानिफनाथ यांची यात्रा कोविड संचारबंदीमुळे रद्द करण्यात आली आहे. मात्र भाविकांना
ऑनलाईन दर्शनाची सोय देवस्थानच्या वतीनं उपलब्ध करण्यात आल्याची माहिती, देवस्थानचे
अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली.
****
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिक सय्यद आजम सय्यद
हुसैन यांचं काल परभणी इथं निधन झालं, ते १०३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर
काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. १९ ऑगस्ट १९५५ रोजी इब्राहीमपूरमध्ये गोवा
मुक्ती समितीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या सत्याग्रह आंदोलनात, त्यांनी सहभाग नोंदवला
होता.
****
नांदेड इथले संस्कृत पंडीत, वसंत महाराज दीक्षित, यांचं
काल परभणी इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर संस्कृत भाषेचा प्रचार
आणि प्रसार करण्याचं काम केलं. या कार्याबद्दल त्यांना १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री
सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते, संस्कृत पंडीत हा राज्य पातळीवरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं होतं.
****
सांगलीतल्या एका कोविड सेंटरनं रुग्णालयात वापरलेले पीपीई
किट उघड्यावर टाकल्यामुळे, संतप्त नागरिकांनी काल रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. सदरची
गाडी ही आदित्य डायग्नोस्टीक सेंटरची असून, याप्रकरणी महापालिकेनं रुग्णालयाला एक लाख
रुपयांचा दंड ठोठावला आहे.
****
पुण्याचे
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचं आज पहाटे निधन झालं. औरंगाबाद इथले सरग यांनी,
देवगिरी तरुण भारत या दैनिकातून उमेदीच्या काळात पत्रकारिता केली होती.
****
लातूर इथं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काल महापालिकेच्या
कोविड सुश्रुषा केंद्रांना भेट देऊन, व्यवस्थेचा आढावा घेतला. इथं दाखल सर्व रुग्णांनी
मनपाच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. औषधी भवन इथल्या लसीकरण केंद्रास भेट
देऊन महापौरांनी लसीकरण व्यवस्थेची पाहणी केली. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लस घेण्याचं
आवाहन महापौर गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काल झालेल्या
मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. २१ संचालकांसाठीच्या निवडणुकीत काल जवळपास ९८ टक्के
मतदान झालं. कंधार, धर्माबाद, हदगाव, भोकर, मुखेड आणि माहूर या तालुक्यात १०० टक्के
मतदान झालं. या निवडणुकीत तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. १८ जागांसाठी
४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, विरूद्ध
भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या दोन नेत्यांच्या गटात ही निवडणूक होत आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं खाजगी बसने चोरुन प्रवासी
वाहतूक करणाऱ्या तीन बसचालकांविरूद्ध, कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात आंतरजिल्हा प्रवासाला बंदी आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या बनशेंद्रा इथं
काल एका बिबट्यानं शेतकऱ्यावर हल्ला केला. महेश मोतिंगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
गावकरी मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाला याची कल्पना दिली असल्याचं
गावकऱ्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment