Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ एप्रिल
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
· राज्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी
सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्र सरकारची राज्याला सूचना.
· औरंगाबादमध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतची
स्थिती असमाधानकारक, नांदेड-जालना-औरंगाबादमध्ये मनुष्यबळ अपुरे तर उस्मानाबाद - लातूरमध्ये
ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या.
· राज्यात वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्याची मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची सूचना.
· देशभरात कोविड लसीकरण उत्सवाला प्रारंभ; राज्याचा
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा एक कोटीचा टप्पा पार.
· रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ते बनवण्यासाठी लागणाऱ्या
घटकांवर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय.
· राज्यात ६३ हजार २९४ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
१११ जणांचा मृत्यू तर ७ हजार ४५४ बाधित
आणि
· उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्याच्या काही
भागात पाऊस.
****
राज्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक
पावलं उचलण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. केंद्र सरकारनं राज्यात
पाठवलेल्या आरोग्य पथकांनी दिलेल्या अहवालानुसार औरंगाबाद, सातारा, आणि सांगली जिल्ह्यात
प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतची स्थिती समाधानकारक नाही. बुलडाणा, सातारा, औरंगाबाद
आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे, दक्षता आणि रुग्णांच्या संपर्कात
आलेल्यांचा शोध घेण्याचं काम पुरेस झालेलं नाही. काही जिल्ह्यांमध्ये चाचणी क्षमता
कमी आहे. अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयांमध्ये
उपलब्ध खाटा भरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. भंडारा, पालघर, उस्मानाबाद आणि पुणे या
जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या आहे. सातारा आणि लातूर जिल्ह्यांमध्ये
बंद पडलेल्या व्हेंटिलेटरचा प्रश्न आहे. जवळजवळ सर्वच पथकांना राज्यात कोविड अनुरुप
वर्तनाचा अभाव आढळून आला, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य
विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांना लिहलेल्या पत्रात नमूद केलं आहे. याबाबत तपशीलवार
तक्ता या पत्रासोबत दिला असून त्याची खातरजमा करुन घेत, राज्य आणि जिल्हा प्रशासनानं
योग्य त्या उपाययोजना कराव्या, असं या पत्रात म्हटलं आहे. राज्यातल्या लस उपलब्धतेच्या
प्रश्नांची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे. उपलब्ध साठ्यानुसार, पुरवठा वाढवण्यासाठी
आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही या पत्रातून देण्यात आली आहे. औरंगाबाद,
नंदुरबार, यवतमाळ, सातारा, पालघर, जळगांव आणि जालना जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची
कमतरता असल्याचंही या पथकानं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यातल्या
कोरोना संक्रमण असलेल्या सर्वात जास्त प्रभावित ३० जिल्ह्यांमध्ये ३० केंद्रीय पथकं
पाठवली होती.
****
राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात वैद्यकीय सुविधा अधिक बळकट
करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल कृती दलासोबतच्या बैठकीत
मुख्यमंत्री बोलत होते. कोविड प्रतिबंधासाठी निर्बंध लावल्यावर राज्यात, ऑक्सिजन प्लांट
उभारणी, रुग्णखाटा तसंच इतर वैद्यकीय सुविधा वाढवणं, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं, लसीकरण
वाढवणं, विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं, यादृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याचे
निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा
व्हावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना परत एकदा करणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य
सचिव सीताराम कुंटे, यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते.
रेमडीसीव्हीरचा अति तसंच अवाजवी वापर थांबवणं आवश्यक असल्याचं मत कृती
दलाने व्यक्त केलं. शेजारील राज्यांमधून ऑक्सिजन तातडीने मागवण्याची कार्यवाही करण्यावरही
कालच्या बैठकीत चर्चा झाली. मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणं,
रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातले विद्यार्थी तसंच आयुष
डॉक्टरांच्या सेवा घेणे, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
राज्यात १५ दिवसांची टाळेबंदी लावण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी दिले आहेत. ते काल जालना इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी
सर्व घटकांशी चर्चा केली आहे. मात्र निर्णय झाला तरी, टाळेबंदी तातडीनं लावली जाणार
नाही, आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. टाळेबंदी
लागल्यावर उद्योजकांनी आपल्या कामगारांची काळजी घ्यावी, तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या
कामगारांनी घाबरू नये, तसंच आपल्या गावी जायची घाई करू नये असं आवाहनही टोपे यांनी
केलं.
****
कोविड लसीकरणाचा चार दिवसीय उत्सव कालपासून सुरू झाला. काल महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालेला हा उत्सव येत्या बुधवारी भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत चालणार आहे. हा लसीकरण उत्सव म्हणजे कोविड विरोधात
दुसरी मोठी लढाई असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पात्र नागरिकांनी
लसीकरण करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सर्व नागरिकांसाठी पंतप्रधानांनी एक
चतु:सुत्री जाहीर केली. अल्पशिक्षित तसंच वृद्धांना लसीकरणात मदत करणं, कोविड उपचारांबाबत
इतरांना सहकार्य करणं, स्वत:सोबत इतरांचाही कोविडपासून बचाव करणं, आणि सुक्ष्म प्रतिबंधित
क्षेत्रासाठी समाजाचा पुढाकार, या चतु:सुत्रीवर भर देण्याचं आवाहन मोदी यांनी केलं.
****
राज्यानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात विक्रमी नोंद करत काल एक कोटीचा
टप्पा पार केला. लसीकरणात राज्य सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आतापर्यंत १ कोटी
३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास
यांनी ही माहिती दिली. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं.
****
कोविड संसर्गाच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत रेमडेसिविर इंजेक्शन
आणि ते बनवण्यासाठी लागणाऱ्या घटकांवर निर्यात बंदी लागू केली आहे. देशात कोविड रुग्णांच्या
संख्येत अचानक वाढ झाली असून सध्या ११ लाखाहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर
रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीत मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात ही मागणी आणखी वाढण्याची
शक्यता आहे, त्यामुळे ही निर्यात बंदी लावण्यात येत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
म्हटलं आहे. रेमडेसिविरच्या सर्व उत्पादकांना त्यांच्या सर्व वितरकांची माहिती इंटरनेट
वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल ६३ हजार २९४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या ३४ लाख ०७ हजार २४५ झाली आहे. काल ३४९ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५७ हजार ९८७
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. काल ३४ हजार ८ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २७ लाख ८२ हजार १६१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले
असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच
लाख ६५ हजार ५८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या ७ हजार ४५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर १११ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
३३, नांदेड जिल्ह्यातल्या २७, परभणी २०, जालना ९, बीड ११, हिंगोली ५ तर लातूर आणि उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २८० रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात
एक हजार ८५९, लातूर एक हजार ६४७, परभणी ४०५, बीड एक हजार ६२, जालना ४९५, उस्मानाबाद
५७३, तर हिंगोली जिल्ह्यात १३३ नवे रुग्ण आढळून आले
****
राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या येत्या १९ तारखेपासून सुरु होणाऱ्या
परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली
आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता ही परीक्षा
पुढे ढकलावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार चव्हाण यांनी केली आहे.
****
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये तसंच त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या
सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक असल्याचं मत केंद्रीय पथकानं व्यक्त केलं
आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात काल कोविड-19 च्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक
झाली. ऑक्सिजन खाटा आवश्यक त्या रुग्णांनाच मिळाव्यात, विनाकारण ऑक्सिजन खाटा अडवणाऱ्यांवर
प्रशासनानं कारवाई करण्याच्या सूचना पथकाने केल्या. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने योग्य
त्या उपाययोजना केल्या असल्याचं सांगत, केंद्रीय पथकाने प्रशासनाच्या कामाबाबत समाधानही
व्यक्त केलं.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या सप्ताहांत टाळेबंदीला काल दुसऱ्या
दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र बाजारपेठा बंद असतांनाही काही नागरिक विनाकारण
बाहेर फिरतांना दिसून येत होते. ग्रामीण भागातही टाळेबंदीला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
****
टाळेबंदी संदर्भात औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र
चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक
झाली. या बैठकीत सर्व व्यापारी संघटनांनी टाळेबंदीला विरोध केला असून, आज सोमवार पासून
दुकाने सुरु करण्याचा इशारा दिला असल्याचं व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे
यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातली टाळेबंदी उठवण्यात यावी आणि छोट्या व्यापाऱ्यांना
व्यापार सुरू करू द्यावेत या आणि अन्य मागण्यांसाठी काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
महात्मा फुले चौकात निदर्शनं करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद यांच्या नेतृत्वाखाली
कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश मोडून, मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी
या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
****
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन इथं कोविड रुग्णांच्या
नातेवाईकांसाठी निवासासह, चहा, नाष्टा तसंच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महात्मा
ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, कोविड
काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद
शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात शहरातील जवळपास शंभर रक्तदात्यांनी रक्तदान
केलं.
****
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काल महानगरपालिकेच्या कोविड
केंद्रांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. समाज कल्याण वसतीगृह, तसंच पुरणमल लाहोटी
तंत्रनिकेतन वसतीगृह, इथं ७०० रुग्णखाटा उपलब्ध आहेत. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातही
कोविड केंद्र तयार करण्यात आले असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित होईल, असं महापौर
गोजमगुंडे यांनी सांगितलं
****
परभणी शहरासह जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्रांमध्ये स्वच्छता,
पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा, मागणीच्या
प्रमाणात पुरवठा आदी बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,
असा इशारा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या
आढावा बैठकी ते बोलत होते.
****
कोविड आजारात उपयुक्त असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन आता परभणी जिल्ह्यात
२ हजार २०० रुपयांमध्ये रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक
मुगळीकर, अन्न आणि औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मरेवाड यांच्यात झालेल्या बैठकीत
हा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यात रेमडीसिव्हीर इंजेक्शन वितरण आणि सनियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी
डॉ विपिन ईटनकर यांनी काल वैद्यकीय वितरक, ठोक विक्रेते आणि किरकोळ विक्रीसाठी मार्गदर्शक
सुचना जारी केल्या. रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णालयांची असून
रुग्णाच्या नातेवाईकांना ते आणण्यास सांगू नयेत असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले
आहेत.
****
उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नागरिकांना कोविड
प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
त्रिसुत्रीचा अवलंब करावा. हात स्वच्छ धुवावेत. मास्क कायम
स्वरूपी आपल्या चेहऱ्यावर लावावा. आणि सोशल डिस्टंसिंगचं त्या ठिकाणी पालन करावं. नगर
परिषद प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न या महामारला
थोपवण्यासाठी करत आहेत. परंतू नागरिकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात काळजी घेणं आणि प्रशासनाला
सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनास सहकार्य करा. आणि या त्रिसुत्रीचा
वापर करा. कोरोना या महामारीला दूर ठेवण्यासाठी प्रशासनास मदत करा.
****
उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं
हजेरी लावली. उस्मानाबाद शहरानजीक असलेल्या आळणी परिसरात जोरदार पाऊस झाला, उस्मानाबाद
तालुक्यातील खेड इथं शेतात काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा
मृत्यू झाला. या पावसामुळे द्राक्ष तसंच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून
काढणीला आलेला हरभरा तसेच ज्वारी या पिकांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे.
लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या काही भागातही या पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यात
माजलगाव आणि आष्टी तालुक्यात फळबागांचं नुकसान झालं तर लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर
तालुक्यात गारपीट झाल्यानं झाडं उन्मळून पडली.
दरम्यान, मराठवाड्यात पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता
हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विभागातल्या सर्वच जिल्ह्यांत खबरदारी घेण्याचं आवाहन
करण्यात आलं आहे.
****
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र
त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी
महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महात्मा फुले यांचे
विचार, कार्यकर्तृत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक असून त्यांनी स्वातंत्र्य, समता
आणि बंधुभाव ही मूल्यं रुजवण्यासाठी आय़ुष्य वेचलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी,
उस्मानाबाद, नांदेडसह मराठवाड्यात सर्व शासकीय कार्यालयांत तसंच विविध सामाजिक संघटनांच्या
वतीनं महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या जवळी इथं काल ऊस तोडणी
सुरु असतांना उसाच्या फडात बिबिट्याचे दोन बछडे आढळले. यासंबंधी वनविभागाला माहिती
देण्यात आली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष रामराव राऊत नेरलीकर
यांचं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. राऊत गुरूजी या नावानं ते नांदेड इथं परिचित
होते. शिक्षकीपेशासह नाट्यकलावंत म्हणूनही ओळखले जात.
****
औरंगाबाद इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब कोळगे यांचं काल निधन
झालं. ते ६५ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात
आलं होतं. काकासाहेब कोळगे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी काँग्रेस
पक्षामध्ये अनेक पदं भूषविली आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथून ४३ हजार ६५०
रुपयांचा तर पाथरी येथून ५४ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा छापा टाकून काल ताब्यात घेतला.
याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment