Saturday, 17 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      हाफकिन संस्थेला कोव्हॅक्सिन लस बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून मान्यता.

·      औरंगाबाद इथं रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड. 

·      परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अंबाजोगाईला हलवणार.

·      राज्यात काल ६३ हजार ७२९ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात काल १२३ रुग्णांचा मृत्यू तर नव्या सात हजार ७०१ रुग्णांची नोंद.

·      कोविड योद्ध्यांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत - औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा इशारा.

·      परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात निर्बंध आणखी कठोर; हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी.

आणि

·      देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस - हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज.

****

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन लस बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनानं ही परवानगी दिल्यानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकतं, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून, कोव्हॅक्सिन लस तयार करण्यास एक वर्षांचा कालावधी दिला असल्याचं, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं आहे.

****

औरंगाबाद इथं रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात चढ्या भावान विकणारा शासकीय रुग्णालयातला कर्मचारी, आणि त्याच्या दोन साथीदारांना काल सापळा रचून अटक करण्यात आली. शहरातल्या पुंडलिक नगर पोलिस ठाणे आणि औषध निरीक्षक कार्यालयानं ही कारवाई केली. शासकीय रुग्णालयाचा कर्मचारी अनिल बहोते हा, मंदार भालेराव आणि खाजगी औषधी विक्री दुकानाचा मालक अभिजीत तौर यांच्या साथीनं, रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात विकत होता. ही माहिती खबऱ्या द्वारे पोलिसांना मिळाली असता ही कारवाई करण्यात आली. ही टोळी रेमडेसिवीर हे औषध १५ हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथं असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा लक्षात घेऊन, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून, हा निर्णय घेतला आहे. या प्राणवायू प्रकल्पात दर तासाला ८६ हजार लीटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई इथल्या ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण ३०० जम्बो सिलिंडर प्राणवायू तयार होईल, आणि यामुळे इथला प्राणवायूचा तुटवडा दूर होण्यास मदत होईल.

****

नांदेड जिल्ह्यात १३ तालुक्यांच्या ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. काल यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. मालेगाव आणि अर्धापूर इथं कोविड सुश्रुषा केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

****

उस्मानाबाद इथल्या प्राणवायू प्रकल्पास परवाना तसंच ना हरकत प्रमाणपत्र तत्काळ देण्याची मागणी, खासदार ओमराजेनिंबाळकर यांनी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या प्रकल्पाद्वारे सध्या ३५० रूग्णांना प्राणवायू पुरवला जाऊ शकतो. मात्र परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा प्रकल्प चालू झालेला नाही, असं निंबाळकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल जालना औद्योगिक वसाहतीमधल्या प्राणवायू प्रकल्प केंद्राला भेट दिली. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडून सध्याची प्राणवायूची गरज आणि उपलब्ध साठा याबाबतही केंद्रेकर यांनी माहिती घेतली. 

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी नागरिकांना कोविड लस घेण्याचं आवाहन केलं आहे –

लस लावल्यानंतर आपल्याला कोरोना होत नाही असं नाही. पण झालाच तर नक्कीच त्याची लक्षणं कमी असतात. लवकर स्टेजमधे आपण बरे होतो. त्यामुळे लसीकरणाचा फायदा आहे. आणि आता तर आपल्याकडे शासनाने ४५ वर्षांच्या वर सगळ्यांना लस खुली केलेली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जर लस घेतली, तर हा कोरोना लवकर कंट्रोलमधे येईल.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे यांचं काल दुपारी नागपूर इथं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरू होते. डॉ.कांबळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्करोग विभागात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत होते.  

****

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तसंच लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या पत्रकार संघाचे संस्थापक नागनाथ निडवदे यांचं काल निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्ष तसंच लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे माजी सचिव प्राध्यापक सुरेश बाजीराव कुलकर्णी, यांचं काल ठाणे इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. जालना इथल्या जेइएस महाविद्यालयातून निवृत्त झालेले कुलकर्णी यांनी, सरस्वती भुवन शिक्षण संस्था, योगेश्वरी शिक्षण संस्थेसह विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवरही त्यांनी काम पाहिलं होतं.

****

राज्यात काल ६३ हजार ७२९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३७ लाख तीन हजार ५८४ झाली आहे. काल ३९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५९ हजार ५५१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६१ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजार ३३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३० लाख चार हजार ३९१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ३८ हजार ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ७०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २७, नांदेड जिल्ह्यातल्या २५, उस्मानाबाद २३, लातूर २०, परभणी १६, हिंगोली पाच, बीड चार, तर जालना जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३८८ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ३५१, लातूर एक हजार ७६७, बीड एक हजार पाच, परभणी ७३५, जालना ६४१, उस्मानाबाद ५८०, तर हिंगोली जिल्ह्यात २३४ नवे रुग्ण आढळून आले.

****

आरोग्य विभागातल्या पाच संवर्गातली दहा हजार १२७ पदं तातडीने भरण्याची मागणी राज्याचे महसूल तसंच ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सत्तार यांनी वित्त विभागाकडे सादर केला आहे. यामध्ये तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची भरती करण्याची मागणी सत्तार यांनी केली आहे.

****

कोविड योद्धांवरील हल्ले सहन केले जाणार नाही, असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात बिडकीन इथं शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेले आरोग्य अधिकारी संजय गोरे यांना स्थानिक गुंडाकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काल डॉ.गोरे यांची भेट घेतली. तसंच संबंधित गुंडाविरोधात गुन्हा दाखल करत, आरोपीला त्वरित अटक करण्याची सूचना केली. ग्रामीण रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

दरम्यान, औरंगाबाद इथं विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोविड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाची १२ फिरती पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती, आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी दिली. या चाचणीत कोविड बाधित आढळलेल्या रुग्णांना तत्काळ कोविड केंद्रात दाखल केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

परभणी जिल्ह्यात पूर्ण टाळेबंदीला आजपासून सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व बॅंका, किराणा सामान दुकानं, भाजी बाजार, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य वस्तुंसह सर्व प्रकारची दुकानं, येत्या २२ तारखेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आता दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरु राहतील. नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्यानं, हा निर्णय घेतल्याचं, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं. नागरिकांनी निर्बंधांचं पालन करून, प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले –

दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. दोन नंतर फक्त मेडिकल सर्विसेस, पेट्रोल आणि परिवहन इतक्याच सर्विसेस चालू राहतील, इतर सर्विसेसना मनाई असणार आहे. दोन नंतर कृपा करून आम्हाला कडक कारवाई करायला भाग पाडू नका. कारण हे निर्बंध हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी आहे आणि असं करतांना कठोर निर्बंधांमुळे नागरिकांना काही त्रास व्हावा ही प्रशासनाची नक्कीच इच्छा नाही.

****

हिंगोली शहरात संचारबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. यामध्ये काल दोघे जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. त्यांना कोविड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.

****

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात आज शनिवार आणि उद्या रविवारी, रुग्णालय तसंच औषधी दुकानं वगळता प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. तालुक्यात वाढता कोविड संसर्ग पाहता, तहसीलदार विपीन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे आदेश काढले आहेत.

****

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातल्या कोविड केंद्राला भेट देऊन, कोविड उपचार सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी रुग्णाखाटांची संख्या वाढवणं, तपासणी यंत्रणा सक्षम करणं, औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणं, आदी सूचना देशमुख यांनी दिल्या.

****

टाळेबंदीच्या काळात सर्व मंदिरं बंद ठेवण्यात आल्यामुळे, मंदिराचे पुजारी आणि पौरोहित्य करणारे पुजारी यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातले नगरसेवक मकरंद जोशी यांनी केली आहे. याबाबतचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेलं निवेदन त्यांनी प्रशासनाकडे सादर केलं.

****

देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज, केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागानं जाहीर केलं आहे. प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे, देशात मोसमी पाऊस समाधानकारक राहणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ८४ ४६ ११ ७५ ०० या मोबाईल क्रमांकावर तसंच १८०० २३ ३४ ००० या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. 

****

राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वसंत चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ पैकी १७ जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले होते.

****

बीड तालुक्यात पांगरबावडी शिवारातल्या एका खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. यात दोघांचे मृतदेह सापडले असून एका मृतदेहाचा शोध सुरु आहे. काल सायंकाळी ही घटना घडली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहर पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून ४३ लाख ४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कारासाठी विद्युत शवदाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन वाघमारे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.

****

परभणी जिल्ह्यात कोविड साथीच्या काळात काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी म्हटलं आहे. ते काल असोला या गावी कोविड लसीकरण कार्यक्रमात बोलत होते.

****

महाआवास अभियानांतर्गत निर्धारित उद्दीष्ट पूर्तीमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यास १५ हजार २५१ घरांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं.या पैकी १५ हजार ११ घरं पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळालं आहे.

****

परवानाधारक रिक्षा चालकांसहीत रिक्षा चालवण्याचा परवाना असलेल्या आणि बॅच धारक रिक्षा चालकांना संचारबंदीच्या काळात दरमहा १० हजार रुपये अर्थसहाय्य तातडीनं देण्याची मागणी लालबावटा रिक्षा चालक युनियननं केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...