आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हरीद्वार
इथं सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी यांच्याशी
संवाद साधून, कुंभमेळ्याची स्थिती जाणून घेतली. पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर
स्वामी अधवेशानंद गिरी यांनी लोकांना कुंभमेळ्यात न येण्याचं आणि कोविड प्रतिबंधाचे
नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
प्रकाश जावडेकर यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये
आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे
केलं आहे.
****
राज्यात ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेचीही
प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा
वापर करुन धान्याचं वाटप केलं जातं. शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करुन
लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरित केलं जातं. एप्रिल २०२० ते मार्च
२०२१ या कालावधीत ९४ लाख ५६ हजार शिधापत्रिकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे
धान्याचा लाभ घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी
आज मतदान होत आहे. ५२४ मतदान केंद्रावर हे मतदान सुरु असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा
पूर्णांक ४२ टक्के मतदान झालं.
****
नाशिक शहरात सिडको भागातली सहा मुलं
वालदेवी धरणात बुडाली असून, त्यातील एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, इतर मुलांचा
शोध सुरु आहे. काल सायंकाळी ही घटना घडली.
****
नांदेड शहरात काल संचारबंदीच्या दुसऱ्या
दिवशीही संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य रस्त्यावरील दुकानं बंद दिसून आली. मात्र रस्त्यावर
रहदारी अखंडितपणे सुरू होती.
****
मराठवाड्यात काल नव्या सात हजार ७०१
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३८८ रुग्ण आढळले.
****
No comments:
Post a Comment