Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ एप्रिल
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे
संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने
सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ
ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
· कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी सहा
राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक.
· विशेष उद्योग वगळता देशात औद्योगिक
वापरासाठीच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
· रेमडेसीवीर औषधाचा साठा केल्याप्रकरणी एका औषध
उत्पादक कंपनीचा संचालक चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात; राजकीय पक्षांमध्ये
आरोप प्रत्यारोप.
· राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोविड रुग्णांची
नोंद; मराठवाड्यात १३७ जणांचा मृत्यू तर सात हजार ७३७ बाधित.
· जालना जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी, आणि लसीकरण
वाढवण्यासाठी गावं निहाय ग्राम दक्षता समित्या गठीत.
· उस्मानाबाद जिल्ह्यात ‘माझं गाव कोरोना मुक्त
गाव’ अभियानांतर्गत गावागावात बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीची शोध मोहीम.
आणि
· अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची मुख्य राष्ट्रीय
सामाईक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली.
****
कोरोनाच्या नवा विषाणुचा महाराष्ट्रातला शिरकाव रोखण्यासाठी केरळ,
गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्ली या सहा राज्यातून महाराष्ट्रात
येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रवासापूर्वी
४८ तासांत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या प्रवाशांनाच,
महाराष्ट्रातल्या रेल्वे स्थानकांवर उतरता येणार असल्याचं, राज्याचे मुख्य सचिव
सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. या सहा राज्यांतून येणाऱ्या
प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करावी, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी
घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, चाचणी निगेटिव्ह असली तरी या
राज्यातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना १५ दिवसांचं गृह विलगीकरण बंधनकारक करण्यात
आलं असून, तसे शिक्केही प्रवाशांच्या हातावर मारण्याच्या सूचना, या आदेशात देण्यात
आल्या आहेत.
****
काही विशेष उद्योग वगळता देशात औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजन
पुरवठ्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव
अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिलं आहे. हा
निर्णय २२ एप्रिल पासून अंमलात येणार आहे. देशातल्या काही राज्यात कोरोना
विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू
नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. औषधांची हवाबंद कुपी, औषधी, पेट्रोलियम
रिफायनरी, स्टील प्लांट, अणुऊर्जा, ऑक्सिजन सिलिंडर निर्माते, पाणी प्रक्रिया
प्रकल्प, खाद्य आणि जल शुद्धीकरण, प्रक्रिया उद्योग हे उद्योग वगळता इतर
उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा होणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
रेमडेसीवीर औषधाचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका औषध
उत्पादक कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. याप्रकरणाची चौकशी सुरु
असतानाच कंपनीच्या संचालकाला सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोलिस
स्थानकात दाखल झाले. या प्रकरणावरुन काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप
प्रत्यारोप सुरु होते. दमण इथल्या ब्रुक फार्मा या औषध निर्माण कंपनीकडे ६० हजार
रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई
करण्यात आली. या निर्यातदारांशी भाजप नेत्यांनी दमण मध्ये संपर्क साधून शिल्लक
साठा महाराष्ट्रासाठी देण्याची विनंती केली होती, आवश्यक परवानगीनंतर त्यांनी ती
विनंती मान्य केली होती, असं फडणवीस यांनी सांगितलं. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई
केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांवर दबाव टाकणे हा शासकीय कामकाजात हस्तक्षेप समजला जातो,
असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षानेही या
प्रकरणावरुन भाजपवर टीका केली आहे.
****
राज्यात काल ६८ हजार ६३१ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ झाली आहे. काल ५०३
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, ६० हजार ४७३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५८ शतांश टक्के झाला
आहे. काल ४५ हजार ६५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३१ लाख
सहा हजार ८२८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८० पूर्णांक
९२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ७० हजार ३८८ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या सात हजार ७३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर १३७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या
५०, नांदेड २७, औरंगाबाद २२, उस्मानाबाद १६, परभणी आठ, तर जालना आणि हिंगोली
जिल्ह्यातल्या प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे एक हजार ४२९ रुग्ण आढळले. लातूर
जिल्ह्यात एक हजार ८१३, नांदेड एक हजार २८७, बीड एक हजार १४५, जालना ९०९, परभणी
४८९, उस्मानाबाद ४७७, तर हिंगोली जिल्ह्यात १८८ नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातला वाढता संसर्ग रोखण्यासाठी, प्रशासनामार्फत
जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या सुधारित वेळ मर्यादेचं नागरिकांनी कटाक्षानं
पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. जिल्ह्यात
रुग्णसंख्येचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकानं जबाबदारीनं स्वयंशिस्त पाळणं
आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विनाकारण घराबाहेर पडून नियमांचं उल्लंघन केल्यास
दंडात्मक कारवाईचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
औरंगाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तू तसंच सेवा देणाऱ्या आस्थापना
दुपारी एक वाजेनंतर बंद ठेवण्याच्या निर्णयाची, कालपासून अंमलबजावणी सुरू झाली.
त्यानुसार काल दुपारी एक वाजेनंतर दूध, भाजीसह सर्वच दुकानं बंद दिसून आली.
दरम्यान, पेट्रोल पंपावर दुपारी एक वाजेनंतर शासकीय वाहनं, पोलीस,
आरोग्य, तसंच इतर अत्यावश्यक सेवेतल्या वाहनाव्यतिरिक्त, कोणालाही पेट्रोल विक्री
करता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातले सर्व उपाहारगृहं संचारबंदी
कालावधीत बंद राहणार असून, फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहील. सर्व आठवडी बाजार एक
मे पर्यंत बंद राहतील, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या रमजान सुरु
असल्यानं, मुस्लिम बांधवांसाठी सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते आठ या
कालावधीत, दूध तसंच फळविक्री व्यवस्था सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी
दिली.
दरम्यान, सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड नियमावलीचं पालन करुन
रुग्णांची वर्गवारी करत, उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन, अत्यवस्थ रुग्णांना
प्राधान्यानं द्यावं, आणि याबाबतची माहिती विहित नमुन्यात जिल्हा प्रशासनास सादर
करणं, बंधनकारक असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या खासगी रुग्णालयांना
रेमडेसिवीरची आवश्यकता आहे, त्यांनी त्यासाठी रुग्णनिहाय आपली मागणी सविस्तर
अर्जाद्वारे जिल्हाधिकारी मदत कक्षात नोंदवावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली
आहे.
****
औरंगाबाद शहरात ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या
नागरीकांना लस घेतल्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, असा निर्णय घेण्याचा विचार
महानगरपालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचं
आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे. सामाजिक संपर्क
माध्यमाद्वारे ते काल बोलत होते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनाही लस घेतल्याशिवाय
दुकानं उघडता येणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून ३० एप्रिलपर्यंत भाजीपाला, बाजार,
किराणा, मिठाई, फळं तसंच बेकरी पदार्थांची दुकानं, सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत
चालू ठेवता येतील. जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
दरम्यान, जिल्ह्यात काल सप्ताहांत संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
बीड जिल्ह्यातील भाजीबाजार, फळबाजार तसंच मटन, चिकन आणि बेकरीची
दुकानं, आजपासून सकाळी सात ते ११ यावेळेतच सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र
जगताप यांनी याबाबतचे आदेश जारी केले, सायंकाळी पाच ते सात या वेळेत केवळ
हातगाड्यांवर फिरुन फळांची विक्री करता येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी इथल्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून एक
प्राणवायू प्रकल्प, परभणी इथं जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत स्थलांतरित केला
जाणार आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी या स्थलांतराला मंजुरी दिली असून,
परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. परभणी
जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, जिल्ह्याला दररोज २५
किलोलीटर प्राणवायूची गरज भासत आहे. नव्यानं कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन
प्रकल्पातून, ८० हजार लीटर प्रतितास एवढ्या क्षमतेनं प्राणवायू निर्मिती होणार
आहे.
दरम्यान, परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून अंबाजोगाईला हलवलेला
प्राणवायू प्रकल्प उभारण्याचं काम सुरू झालं असून, येत्या दहा दिवसांत या
प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना विषाणू संसर्ग
रोखण्यासाठी, तसंच कोविड लसीकरण वाढवण्यासाठी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार
गावं निहाय ग्राम दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. गावचे सरपंच या समितीचे
अध्यक्ष असतील, तर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका,
आशा स्वयंसेविका, यांचा समितीमध्ये समावेश आहे. लसीकरण करुन घेण्यासाठी
गावकऱ्यांचं प्रबोधन करणं, कोविड चाचणी करुन घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मदत
करणं, ताप-सर्दी-खोकला-घशात खवखव, वगैरे लक्षणं असलेल्या व्यक्तींचं सर्वेक्षण
करण्यासाठी गठीत केलेल्या पथकांना मदत करणं, या जबाबदाऱ्या या समितीला पूर्ण
कराव्या लागणार आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडिसीवीर इंजेक्शन, जिल्हाधिकारी कोरोना
वॉर रुममधून संबंधित रुग्णाच्या नावे रुग्णालयास वितरीत करण्यात येईल आणि त्याच
रुग्णासाठी इंजेक्शन वापरणं बंधनकारक असेल, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी
सांगितलं आहे. निंबाळकर यांनी काल जिल्ह्यातल्या कोविड उपचाराबाबत आढावा बैठक
घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासंदर्भात तात्काळ
उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत निंबाळकर यांनी कोविड
लसीच्या पुरवठ्याबाबत माहिती जाणून घेत, लसीच्या मात्रा मिळवण्यासाठी पाठपुरावा
करण्यात येईल, असं सांगितलं.
****
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल शहरातल्या कोविड केंद्रांची
पाहणी करून आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधून त्यांनी व्यवस्थेची माहिती घेतली.
रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता
घेण्याच्या सूचना खासदार जाधव यांनी, आरोग्य विभागाला दिल्या. रेमडेसिव्हीर
इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची ग्वाही देत, आपण परभणी जिल्ह्यासाठी
जास्तीच्या इंजेक्शनची मागणी केल्याचं, खासदार जाधव यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या महाविकास आघाडीचे नेते कोविड लस उपलब्ध नसल्याचा आव
आणत राजकारण करत असून, प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचं, नांदेडचे खासदार
प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. चिखलीकर यांनी लसीसंदर्भात केंद्रीय
आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन, आणि आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रदिप हलदर
यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, लस उपलब्धतेविषयी माहिती जाणून घेतली. राज्य
तसंच नांदेड जिल्ह्यासाठी लागेल तेवढी लस उपलब्ध करुन देण्याची ग्वाही केंद्र
शासनानं दिली असल्याचंही, चिखलीकर म्हणाले.
****
महाविकास आघाडी सरकारनं कोविड महामारीच्या आपत्कालीन काळात
उस्मानाबाद जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिलं असल्याची टीका, आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी केली आहे. ते काल तुळजापूर इथं बोलत होते. इतर जिल्ह्याच्या तुलनेत
उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हर औषधाचा पुरवठा केला जात असून,
उमरगा, तुळजापूर, परांडा या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी, अनेक दिवसांपासून या
औषधाचा पुरवठाच होत नसल्याचं ते म्हणाले. उस्मानाबादेतही गरजेच्या ५० टक्केही
पुरवठा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या कार्यप्रणालीमध्ये नियोजन
नसल्यामुळे, राज्यभरात प्राणवायूचा तुटवडा जाणवत असल्याचं, पाटील म्हणाले.
दरम्यान, आमदार पाटील यांनी काल तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी
केली.
****
उस्मानाबाद शहरात एक हजार रुग्ण क्षमतेचं आणि कळंब शहरात २०० रुग्ण
क्षमतेचं जम्बो कोविड केअर सेंटर उभारावं, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली
आहे. या मागणीचं निवेदन पाटील यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर
केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ‘माझं गाव कोरोना मुक्त गाव’ या
अभियानांतर्गत गावागावात कोरोना संपर्क व्यक्ती शोध आणि जनजागृती केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
ग्राम कोरोना समित्यांच्या माध्यमातून गावातल्या ५० कुटुंबांसाठी त्या गावातले
शिक्षक, आशा अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा आरोग्य सेविका यांचा एक गटासह ग्राम कोरोना
पर्यवेक्षकांनी त्या ५० जणांच्या कुटुंबात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास त्यांच्या संपर्कातील
व्यक्तींचा शोध घेणं परिसर निर्जंतुकीकरण करून घेणं, तसंच आरोग्यविषयक खबरदारी घेण्याची
माहिती दिली जात आहे. गावातल्या सर्व गावकऱ्यांना वारंवार हात धुणं, गर्दीत जाणं टाळा,
गावात मास्कशिवाय प्रवेश नाही यावर भर दिला जात असून त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना
रुग्णांची साखळी तोडण्यास तसंच जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूदर कमी होण्यास
मदत होणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर,
उस्मानाबाद
****
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा-
जेईईची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे काल ही
माहिती देण्यात आली. येत्या २७, २८ आणि २९ एप्रिलला ही परीक्षा होणार होती.
सध्याची कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे,
परीक्षेची नवी तारीख अजून निश्चित नसून, परीक्षेच्या १५ दिवस आधी नवी तारीख जाहीर
केली जाईल, असं संस्थेतर्फे सांगण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या महातपुरी, मरडसगाव, राणीसावरगाव तसंच चाटोरी
इथल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, ५० खाटांचं कोविड केंद्र सुरु करावं,
अशी मागणी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
****
No comments:
Post a Comment