Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
आतापर्यंत
१३ कोटी लाभार्थ्यांना लसीकरण करुन भारत सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश ठरला आहे.
देशभरात काल जवळपास ३० लाख नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान,
देशात काल नव्या दोन लाख ९५ हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन
हजार २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या
एक कोटी ५६ लाख १६ हजार १३० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ८२ हजार ५५३
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल एक लाख ६५ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले, देशात
आतापर्यंत, एक कोटी ३२ लाख ७६ हजार ३० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ८५ पूर्णांक एक दशांश टक्के इतका आहे. देशात सध्या २१ लाख ५७ हजार ५३८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
भारत
आणि ब्रिटन दरम्यान सर्व विमान उड्डाणे येत्या २४ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत रद्द
करण्यात आली आहे. ब्रिटननं जाहीर केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात
आला असल्याचं एयर इंडियानं सांगितलं आहे. विमानांच्या उड्डाणांविषयी माहिती, तिकीटाचे
पैसे परत करण्यासंर्भातली माहिती प्रवाशांना कळवण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
वाढत्या
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं महाराष्ट्र-गोवा सीमा
बंद केली आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन
चाचणी करणं बंधनकारक असणार आहे.
****
श्रीरामनवमी
आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या राम मंदीरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रामजन्म
सोहळा साजरा झाला. भाविकांना दर्शनासाठी मंदीरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या
सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करु या, असं उपमुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
****
विविध
शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी माल वाहतूकदारांकडून जी वाहतूक करण्यात येते, त्यातील
२५ टक्के माल वाहतूकीचं काम, राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी,
शंभर जलदगती न्यायालयांना, एक एप्रिल, २०२१ ते ३१ मार्च २०२२ या एक वर्षाच्या कालावधीकरता
मुदतवाढ देण्यास, तसंच सदर न्यायालयांकरता जिल्हा न्यायाधीश आणि कर्मचारी वर्गासह,
एकूण ५०० पदे पुढे सुरु ठेवण्यास, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्य
शासनाच्या आदिवासी विकास विभागानं अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना, केंद्रीय लोकसेवा
आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी, नवीन योजना जाहीर केली आहे. यामध्ये
१०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना दिल्ली अथवा महाराष्ट्रातील
नामवंत खासगी संस्थांमध्ये, पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांचं प्रशिक्षण
दिलं जाणार आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा द्रवरूप प्राणवायू खाटा
उपलब्ध करून देण्याची मागणी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी
केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना निवेदन दिलं आहे.
जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक लोक शहरापर्यंत
उपचार घेण्यासाठी येण्यास तयार होत नाहीत, यामुळे तात्काळ अशी सुविधा प्राथमिक आरोग्य
केंद्रात करण्यात यावी, या मागणीवर कदम यांनी भर दिला.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी, जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर यांनी, उस्मानाबाद शहरातल्या एक, कळंब शहरातल्या एक आणि उमरगा शहरातल्या
तीन खासगी रुग्णालयांच्या इमारतींना, समर्पित कोविड सुश्रुषा केंद्राचा दर्जा दिला
आहे. या खाजगी रुग्णालयातल्या १३५ पैकी ८५ खाटा, कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात
आल्या आहेत. याशिवाय उस्मानाबाद शहरातल्या दोन खासगी रुग्णालयांमधल्या रुग्णखाटांची
संख्या वाढवण्यास, आणि वाशी इथल्या दोन खाजगी कोविड सुविधा केंद्रातल्या वाढीव रुग्णखाटांनाही,
जिल्हाधिकाऱ्यांनी आज मान्यता दिली.
****
राज्याचे
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात,
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं, नवीन ५०० रुग्णखाटाचं
कोविड सुश्रुषा केंद्र सुरू केलं जाणार आहे. थोरात यांनी काल संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या
प्रशासकीय तसंच आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
घेतला.
****
रेमडेसिवीर
इंजेक्शन औषध विक्रेताच्या मदतीने चढ्या भावात विकणाऱ्या दोघांना अहमदनगरच्या स्थानिक
गुन्हे शाखेनं अटक केली. ३७ हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती
मिळाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment