Wednesday, 21 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यांना सल्ला; नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करण्याचं आवाहन.

·      राज्यात १५ दिवसांच्या पूर्ण टाळेबंदीचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा; मुख्यमंत्री आज घोषणा करण्याची शक्यता.

·      राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ आणि भारतीय शालांत प्रमाणपत्र परिषदेची दहावीची परीक्षा रद्द; राष्ट्रीय पात्रता परीक्षाही पुढे ढकलली.

·      अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याबाबतचा सुधारित आदेश जारी, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात नियमभंग झाल्यास रहिवाशांना दहा हजार रुपयांचा दंड.

·      राज्यात ६२ हजार ९७ कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १५७ जणांचा मृत्यू तर सात हजार ५६५ बाधित.

आणि

·      ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन.

****

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान देशाला संबोधित करत होते. देशाला संकल्प, साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले. नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करावं, देश या आपत्तीतून नक्कीच बाहेर पडेल, आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू, मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घरातल्या बालकांनी आपल्या आईवडिलांना विनाकारण घराबाहेर जाऊ देऊ नये, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. कोविडवरच्या औषधांसह प्राणवायूचं उत्पादन वाढवण्यात येत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.

कोरोना संकट में देश के अनेक हिस्से में ऑक्सिजन की डिमांड बहोत ज्यादा बढी है। इस विषय पर तेजी से और पुरी संवेदनशीलता के साथ काम किया जा रहा है। केंद्र सरकार, राज्य सरकारें, प्रायव्हेट सेक्टर सभी की पुरी कोशिश है की हर जरूरतमंद को ऑक्सिजन मिलें। ऑक्सिजन प्रॉडक्शन और सप्लाई को बढाने के लिए भी कई स्तरों पर उपाय किये जा रहे है। देश के फार्मा सेक्टर ने दवाईयों का उत्पादन और बढा दिया है। आज जनवरी-फरवरी की तुलना मे देश मे कई गुना ज्यादा दवाईयोंका प्रॉडक्शन हो रहा है।

देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या कामगारांनी स्थलांतर न करता, आहेत त्या ठिकाणीच थांबावं. कामगारांचं काम बंद होणार नाही, तसंच ते असतील तिथेच त्यांना कोविड लस मिळेल, याचा राज्य सरकारांनी कामगारांना विश्वास द्यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले –

मेरा राज्य प्रशासन से आग्रह है की ओ श्रमिकों का भरोसा जगाये रखे। उनसे आग्रह करें की वो जहां है वहीं रहें। राज्योंद्वारा दिया गया ये भरोसा उनकी बहोत मदत करेगा। वो जिस शहर मे है, वहीं पर अगले कुछ दिनों में व्हॅक्सिन भी लगेगी और उनका काम भी बंद नही होगा।

****

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांच्या पूर्ण टाळेबंदीचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. याबाबत मुख्यमंत्री आज घोषणा करण्याची शक्यता असल्याचं टोपे यांनी सांगितलं. मंत्रीमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी कोरोना विषाषू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात पूर्ण टाळेबंदी लावण्याची मागणी केली आहे.  

****

कोविड संसर्गामुळे यंदाची राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या –

शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की, दहावीचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे, ते इंटरनल ॲसेसमेंट करून त्या संदर्भात कशा पुढे गेल्या पाहिजे, या संदर्भामधे आम्ही चर्चा करू आणि त्यासंदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करून. या ठिकाणी मला सांगायलाच पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असतील अशा विद्यार्थ्यांसंदर्भातसुध्दा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पुढे जायचं या संदर्भातला सुध्दा निर्णय आम्ही भविष्यामधे सांगू.

भारतीय शालांत प्रमाणपत्र परिषद - आयसीएसईनंही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचं पत्रक काल प्रसारित करण्यात आलं.

****

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेट पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी हा निर्णय जाहीर केला. ही परिक्षा दोन ते १७ मे या काळात घेतली जाणार होती.

****

राज्यात अत्यावश्यक वस्तूंची दुकानं आता सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील. याबाबतचा सुधारित आदेश राज्य शासनानं जारी केला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. किराणा, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मिठाई, मांस तसंच अंडी, यासह कृषी अवजारे, कृषी उत्पादनं, पशूखाद्याची दुकानं तसंच मान्सूनपूर्व कामांच्या साहित्याच्या दुकानांनाही, हा नियम लागू असणार आहे. मात्र या सर्व दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी, सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.

दरम्यान, राज्यात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र-मायक्रो कंटेन्टमेंट झोनमध्ये नियम मोडल्यास सुरवातीला दहा हजार रुपये आणि त्यानंतर आणखी दंड ठोठावला जाणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोविड बाधित रुग्ण आढळलेल्या गृहनिर्माण संस्था मायक्रो कंटेन्टमेंट झोन असतील. रहिवाशांकडून दंडाची वसूली करण्याचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यास देण्यात आले आहेत.

****

रामनवमी उत्सव आज साजरा होत आहे. राज्यातल्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, आजच्या रामनवमीसह येत्या २५ एप्रिलला महावीर जयंती, आणि २७ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी, राज्य शासनानं मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केली आहे. यानुसार भाविकांना पूजा किंवा दर्शनासाठी मंदिरांमधे जायला बंदी असेल. याशिवाय मंदिरांमधे कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही. नागरिकांना रामनवमीच्या उत्सवानिमीत्त प्रभात फेरी किंवा मिरवणुका काढायला मनाई आहे. मंदीर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास भाविकांसाठी, ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात काल ६२ हजार ९७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३९ लाख एक हजार ३५९ झाली आहे. काल ५१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६१ हजार ३४३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. काल ५४ हजार २२४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ८३ हजार ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ५६५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३७, लातूर २६, नांदेड २५, उस्मानाबाद २१, परभणी १८, बीड १६, जालना दहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३३७ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ४७७, परभणी एक हजार २११, नांदेड एक हजार १५७, बीड एक हजार २४, उस्मानाबाद ६४५, जालना ५२९, तर हिंगोली जिल्ह्यात १८५ रुग्ण आढळून आले. 

****

अनुसूचित जमातीच्या कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च सरकार उचलणार आहे. आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी काल ही माहिती दिली. आदिवासी बांधवांकडील आर्थिक उत्पन्नाची साधनं आणि त्यांची मर्यादा विचारात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक प्रकल्प अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांना न्युक्लिअस बजेट अर्थात केंद्रवर्ती अर्थसंकल्पातून, १० लाख रुपयांपर्यंत निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती, पाडवी यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या गैरसोयीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्येच्या तुलनेत आरोग्य विषयक सोयी सुविधा कमी पडत आहेत, शासकीय रुग्णालयात प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा उपलब्ध होत नाहीत, प्राणवायूचा तुटवडा भासतो आहे, रेमडेसिवीर औषधही वेळेवर उपलब्ध होत नसून, या औषधाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप, आमदार मुटकुळे यांनी केला आहे.

****

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तीसाठी वॉररूमची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी तसंच कोविड रुग्णालयात येणाऱ्या अडचणींची नोंद या वॉररूममधून घेतली जाणार आहे. ही सेवा २४ तास सुरू राहणार असून, यासाठी ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

नांदेड शहरात गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीनं आजपासून महाराजा रणजितसिंह यात्री निवासात कोविड मार्गदर्शन सेवा केंद्र सुरू करण्यात येत आहे. सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी ही माहिती दिली आहे. हे सेवा केंद्र दररोज सकाळी ९ ते रात्री ९ असे बारा तास सुरू राहणार असून इथे कोविड तपासणी, सिटी स्कॅन या सारख्या सुविधा निःशुल्क राहणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोविड रुग्णांच्या सुविधेसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन खरेदी करण्यासाठी वैयक्तिक ११ लाख रुपये निधी दिला आहे. गडाख यांनी हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला असून, यातून तत्काळ संबंधित संयंत्र खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू संचारबंदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस आयुक्त निखील गु्प्ता हे नाकाबंदी ठिकाणच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. ग्रामीण भागातही संचारबंदीला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून कोविड जनजागृती व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे  जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियम आणि संचारबंदीचं पालन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या आणि वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

****

परभणी जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महसूल विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकरणाच्या सुनावण्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूनावणी करीता ये-जा करणारे नागरीक आणि अधिकारी-कर्मचारी हे कोरोना प्रादुर्भावापासून दूर रहावेत, म्हणून हा निर्णय घेत असल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भातील आदेशात म्हटलं आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं काल ठाणे इथं कोविड संसर्गानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. नांदलस्कर यांनी ४० नाटकं, १०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट, तसंच २० हून अधिक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं कालपासून बँक खासगीकरणाविरोधात अभियान सुरु करण्यात आलं. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार चव्हाण आणि सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली. बँकांचे खासगीकरण झालं तर सामान्य माणसांनी बँकेत जमा केलेली बचत असुरक्षित होईल, ग्रामीण भागातून बँका काढता पाय घेतील, यासह बँक खासगीकरणाविरोधात संघटनेची भूमिका, या अभियानाअंतर्गत नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहे. बँकेचे ३० हजार कर्मचारी सुमारे २५ लाख लोकांच्या भेटी घेणार आहेत.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातला प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गणेशराव गुंडरे याला १५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराचे थकीत भत्ते आणि देयकं काढण्यासाठी गुंडरे यानं २५ हजार रुपये लाच मागितली होती. यापैकी दहा हजार रुपये तक्रारदारानं पूर्वीच दिले होते, उर्वरित १५ हजार रुपये घेताना गुंडरे याला काल अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूर इथली शंभू महादेवाची चैत्र यात्रा कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. या यात्रेस सातारा-सोलापूर-सांगलीसह, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात, मात्र यंदा कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, येणाऱ्या भाविकांना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर अडवण्यात येईल, असं साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कऴवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...